अमृताची फळे अमृताची वेली । ते चि पूढे चाली बीजाची ही || या जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे, ह.भ.प. डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर हे विसाव्या शतकातील थोर संत वै. श्रीगुरू भगवानशास्त्री महाराज सोनपेठकर यांचा वारसा समर्थपणे चालवीत आहेत. आधुनिक संस्कृतकवी डॉ. सोनपेठकर यांनी २००० हून अधिक संस्कृत श्लोकरचना केल्या आहेत.
शास्त्रीजींचे पूर्ण नाव डॉ. चंद्रहास
दुर्गादासशास्त्री सोनपेठकर असे आहे. शास्त्रीजींचे लौकिक शिक्षण एम. ए. संस्कृत (स्वा.रा.ती.म.विद्यापीठ
सर्वप्रथम), एम.एड. सेट संस्कृत, सेट व नेट शिक्षणशास्त्र, पीएच. डी. (उपनिषद) असे
झालेले आहे. संस्कृत अध्ययनातील प्रावीण्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र शासनाने
सन्मान केलेला आहे. तसेच परभणीचे माननीय आमदार डॉ. राहुल पाटील यांनी त्यांना
परभणी रत्न पुरस्कार देऊन गौरविले आहे.
डॉ. शास्त्रीजींच्या सांप्रदायिक शिक्षणाचा शुभारंभ वै. श्रीगुरू भगवानशास्त्री महाराज सोनपेठकर यांचेकडे झाला. वयाच्या चौथ्या वर्षी चंद्रहास शास्त्रींनी संत श्री ज्ञानेश्वर माऊली जन्मस्थान, आपेगाव येथे पहिले प्रवचन केले. हे प्रवचन वै. ह.भ.प. श्री. विष्णूमहाराज कोल्हापूरकर गुरुजी यांनी आयोजित केले होते. आपेगाव येथे वै. कोल्हापूरकर गुरुजींनी अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले होते. या सप्ताहात दररोज प्रात:स्मरणीय श्रीगुरुंचे जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या गाथेवर चिंतन संपन्न होत असे. एक दिवस आदरणीय कोल्हापूरकर गुरुजी श्रीगुरुंना म्हणाले की, आज आपल्या आधी थोडा वेळ आपल्या नातवाचे चंद्रहासचे प्रवचन आयोजित करू या, श्रीगुरुंनी या प्रस्तावाला आनंदाने संमती दिली. चंद्रहासला आशीर्वाद दिले. दुपारच्या चारच्या सत्रात हे प्रवचन होते. आदरणीय कोल्हापूरकर गुरुजींचे शिष्य ह.भ.प. उत्तम महाराज यांनी चंद्रहासला खांद्यावर घेऊन माऊलींच्या सभा मंडपात नेले. आणि तिथून हा प्रवास सुरु झाला. ही आठवण सांगतांना आजही शास्त्रीजींना गहिवरून येते. पुढे माघ दशमी, इ.स. १९८७ साली प्रात:स्मरणीय श्रीगुरुंनी चंद्रहासला तुळशी माळ घातली. प्रात:स्मरणीय श्रीगुरूंचा शिष्य परिवार खूप मोठा आहे. मात्र त्यात श्रीगुरूंचा अंतिम शिष्य म्हणजे चंद्रहास शास्त्री. माघ व. नवमीचे दिवशी श्रीगुरु ब्रह्मलीन झाले. या नंतर ह.भ.प. श्री रेणुकादास महाराज यांच्याकडे चंद्रहास शास्त्रींचे आध्यात्मिक शिक्षण संपन्न झाले.
डॉ. शास्त्रीजी हे एक सिद्धहस्त लेखक आहेत.
त्यांची अनेक पुस्तके, लेख इत्यादी प्रसिद्ध आहे. समाज माध्यमांवरही ते क्रियाशील
असतात. शास्त्रीजींच्या काही पुस्तकांचा परिचय पुढीलप्रमाणे:
१. नारदभक्तीसूत्र:
संस्कृत सूत्र आणि मराठी अर्थ असे या पुस्तकाचे स्वरूप आहे.
२. Values in Raghuvansham:
संस्कृत महाकवी कालिदासाच्या रघुवंशातील जीवनमूल्यांचा आढावा घेणारे असे हे
संशोधनात्मक पुस्तक आहे.
३. Essays on Education:
या पुस्तकाचे सहलेखन शास्त्रीजींनी केले आहे. यात शिक्षणव्यवस्थेवरील विविध
लेख आहेत.
४. भगवती रंगचंद्र गाथा:
या पुस्तकात माहूरगडनिवासिनी जगदंबा रेणुकामातेवरील भक्तिपूर्ण रचना आहेत.
विशेष म्हणजे या रचना स्वत: डॉ. शास्त्रीजींच्या आहेत.
५. स्तोत्ररत्नानि: या पुस्तकात डॉ. शास्त्रींनी रचलेल्या विविध स्तोत्रांचा
समावेश आहे.
६. श्रीरेणुकाशरणम्: या पुस्तकात श्री रेणुका मातेचे १०० हून अधिक
श्लोकांचे शास्त्री विरचित स्तोत्र आहे. हे पुस्तक बुक गंगावर देखील उपलब्ध आहे.
या शिवाय एम एड. परिपूर्ण
अभ्यास, बी.एड. परिपूर्ण अभ्यास इत्यादी पुस्तकांचे लेखन/संपादन शास्त्रीजींनी
केले आहे.
आकाशवाणी, दूरचित्रवाहिनी इ.
माध्यमातूनही शास्त्रीजींचे कार्यक्रम संपन्न होत असतात. तसेच व्याख्यान, प्रवचन,
कीर्तन, भागवत आदि कार्यक्रमांसाठी शास्त्रीजींची भ्रमंती सतत सुरूच असते.
भगवद्भक्ती हा शास्त्रीजींचा
स्थायीभाव आहे. रसाळ वाणीचे वरदान त्यांना लाभलेले आहे. व्यासंग, निरंतर वाचन-लेखन
हा त्यांचा नित्यक्रम आहे. सात्विक आचरण, सतत नामस्मरण यात ते रत असतात. ज्योतिष
शास्त्राचाही त्यांचा अभ्यास आहे. शास्त्रीजी
वर्गात असोत किंवा व्यासपीठावर, अध्यापनाचा विषय कितीही अवघड असला, तरी तो सोपा
करून सांगण्याची त्यांची हातोटी आहे.
वै. श्रीगुरू संत श्री. भगवानशास्त्री
महाराज आणि ब्र. भू. संत श्री रंगनाथ
महाराज गुरुजी यांचेवर डॉ. शास्त्रीजींची अतीव निष्ठा आहे. या दोन विभूतींच्या
स्मरणार्थ त्यांनी वारकरी संत विचार परिक्रमा सुरू केलेली आहे. सकारात्मकता हे डॉ.
शास्त्रीजींच्या कार्यशैलीचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. वारकरी संत विचार परिक्रमा
यात्रे निमित्त ते प्रवास करीत होते. आणि lock down सुरु झाले. तेव्हा त्यांनी हार
न मानता परिक्रमेचे कार्य फेसबुक पेजच्या माध्यमातून सुरु ठेवले. शास्त्रीजींच्या
या उपक्रमांमध्ये त्यांच्या सहधर्मचारिणी सौ. मानसी वहिनींचे देखील खूप सहकार्य
असते. संस्कृतच्या क्षेत्रात, आध्यात्मिक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग
करण्यावर शास्त्रीजींचा भर असतो.
अहंकाराचा वारा न लागो राजसा।
या प्रमाणे त्यांचे वागणे असते. विनम्रता,
मधुर संभाषण, माणसे जोडण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. या बळावरच त्यांचे
अध्यात्मिक कार्य सुरु आहे. स्वत:चा मोठेपणा, प्रशंसा हे शास्त्रीजींच्या आवडीचे
विषय नाहीत. पण शास्त्रीजींचे कार्य हे लोकोपयोगी कार्य आहे. ते सर्वांसमोर यावे,
म्हणून हा लेख समाज माध्यमांत प्रकाशित करताना आम्हाला मनापासून आनंद होत आहे.
लेखक:
विराज आडे
संचालक,
श्री सिद्धिविनायक एज्युकेशन्स, नांदेड
No comments:
Post a Comment