Thursday, March 14, 2024

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

 

(फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम)

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट...... 

खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आज हा फोटो समाज माध्यमांत पाहिला. काही सेकंद पाहिला. आणि मनात काही सुंदर विचारांचं स्पंदन सुरु झालं. नेमकं काय आहे, या चित्रात?

हनुमानजी आहेत. हनुमानाच्या हृदयात राजीवलोचन असे प्रभू रामचंद्र आणि श्रीरामशक्तीस्वरूपा अशा सीतामाता विराजमान आहेत. हनुमंतराय ऊर्ध्व दिशेने पाहत आहेत. आणि त्यांच्या समोर साक्षात प्रभू रामचंद्र आणि सीता माता प्रकट झाले आहेत. 

हनुमंतरायांनी आकाशी रंगाची मेखला कमरेला बांधली आहे. आकाशाची जणू मेखला केली आहे. यातून हनुमंतरायांचा ध्येयवाद प्रकट होत आहे, असे वाटले. 

आणि एक महत्वाचे वाक्य सुचले. –

“भगवंत आधी हृदयात प्रतिष्ठित होतात आणि नंतर समोर प्रकट होतात.”

भगवंत हृदयात कधी आणि कसे प्रकट होतील? मला सांगा आत्ता तुमच्या हृदयात काय आहे? ते केव्हा कसे विराजमान झाले आहे? सांगू शकाल? त्याचे कारण मात्र सांगता येईल की, ज्या गोष्टीचा किंवा व्यक्तीचा ध्यास तुमच्या मनात आहे, त्या गोष्टीचा निवास तुमच्या हृदयात होणे अगदी स्वाभाविक आहे. बरं, असा ध्यास कसा निर्माण होईल, तर त्यासाठी अभ्यास आवश्यक आहे. आणि तो अभ्यास कोणता? तर अखंड नामस्मरण!

जगद्गुरू संत श्रीतुकाराममहाराज हनुमंतरायांचा उल्लेख भक्तीचे आचार्य म्हणून करतात. हनुमंतराय हे नवधा भक्तीच्या प्रकारांमधील दास्य भक्तीचे आचार्य मानले जातात. 

हनुमंतरायांना रामनामाची अशी आवड आहे की, एकदा हनुमंतराय राग संगीत सादर करत होते. त्यावेळेस त्यांनी फक्त दोन अक्षरांचा शब्द राम यामध्येच सर्व आलाप इत्यादी सादर केले, अशी गोष्ट उल्लिखित आहे. थोडक्यात रामनामाचे अखंड नामस्मरण करीत असल्याने हनुमंतरायांच्या हृदयात आपल्या शक्तीसह भगवंतांनी निवास करण्यास प्रारंभ केला आहे. आणि नंतर भगवंत हनुमंतरायांच्या समोर आपल्या शक्तीसह प्रकट होतात.

जय वीर हनुमान ! जय श्रीराम! जय श्रीकृष्ण!!!

भागवतरसिक चंद्रहास शास्त्री सोनपेठकर

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...