यज्ञ संस्थेचे वर्णन करणारा यजुर्वेद
- डॉ.
चंद्रहास शास्त्री सोनपेठकर
यजुर्वेद हा प्रामुख्याने
गद्य ग्रंथ आहे. यज्ञात म्हटल्या जाणाऱ्या गद्य मंत्रांना ‘यजुस्’ म्हणतात. यजुस् + वेद =
यजुर्वेद अशी यजुर्वेद या शब्दाची व्युत्पत्ती सांगता येते. यजुस् या शब्दाची
शास्त्रीय व्याख्या “अनियताक्षरावसानो यजु:” म्हणजे ज्यात अक्षरांची
निश्चित संख्या नसते, तो यजुस् अशी सांगितली जाते. तसेच
“गद्यात्मको यजु:” म्हणजे यजुस् गद्यात्मक आहेत, असे
सांगितले आहे.
निरुक्तकार यास्काचार्य यजु
हा शब्द यज धातूपासून सिद्ध झाल्याचे मानतात. यजुर्वेदाच्या द्वारे
यज्ञाच्या स्वरूपाचे निर्धारण होते.
यजुर्वेदाचे स्वरूप:
पौराणिक ग्रंथानुसार यजुर्वेदीय शाखांची संख्या १०० च्या अधिक
आहे. यात कृष्णयजुर्वेदाच्या तैत्तिरीय, मैत्रायणी, कठ आणि कपिष्ठल या शाखा
प्रसिद्ध आहेत. तर शुक्ल यजुर्वेदाच्या वाजसनेयी
आणि काण्व या शाखा विशेष प्रसिद्ध आहेत.
शुक्ल यजुर्वेद:
महर्षी याज्ञवल्क्यांनी
सूर्याची आराधना करून शुक्ल यजुर्वेदाला प्राप्त केले. आणि शुक्ल यजुर्वेदाचा
उपदेश आपल्या काण्व इत्यादी १५ शिष्यांना केला.
माध्यंदिन शाखा:
महर्षी याज्ञवल्क्यांनी
ज्या १५ शिष्यांना यजुर्वेद शिकविला, त्यांत एक शिष्य माध्यंदिन नामक होते.
त्यांनी ज्या यजुषांचे प्रवचन केले, त्यास माध्यंदिन शाखा म्हणतात.
या विषयी आणखी एक कथानक
येते, ते असे की, वाजिरूप सूर्याच्या द्वारे महर्षी महर्षी याज्ञवल्क्यांनी
दिवसाच्या मध्यकाळी यजुर्वेदीय मंत्रांचे ज्ञान प्राप्त केले म्हणून या शाखेस
माध्यंदिन शाखा असे म्हटले जाते.
या शाखेची संहिता
वाजसनेयी माध्यंदिन शाखा म्हणून प्रसिद्ध आहे.
माध्यंदिन शाखेची
संरचना:
माध्यंदिन संहितेचा विभाग
अध्याय आणि कंडिका यांत विभाजित आहे. यात ४० अध्याय आहेत. ३०३ अनुवाक आहेत. १९७५
कंडिका आहेत.
प्रतिपाद्य विषय:
श्रौतकर्म हा मुख्य
प्रतिपाद्य विषय आहे. दर्श पूर्णमास, पिंडपितृयज्ञ, अग्निहोत्र, चातुर्मास्य, सोम
संस्था, सोमयाग, प्रकृतियाग, अग्निष्टोम, राजसूय, वाजपेय, अग्निचयन, शतरुद्रीय
होम, अश्वमेध, प्रवर्ग्य इत्यादींचे वर्णन यजुर्वेदाच्या माध्यंदिन शाखेत येतात.
काण्व संहिता:
यात सुद्धा ४० अध्याय
आहेत. ३२८ अनुवाक आणि २०८६ मंत्र यात आहेत. काण्व संहितेचे प्रतिपाद्य विषय हे
थोड्या फार फरकाने माध्यंदिन शाखेप्रमाणेच आहेत.
शुक्ल
यजुर्वेदाच्या संबंधित ग्रंथ:
शतपथ ब्राह्मण:
१०० अध्याय असल्याने या
ग्रंथास शतपथ ब्राह्मण असे म्हणतात. यात विविध यज्ञांच्या विधीचे सविस्तर आणि
परिपूर्ण वर्णन आहे. विषयांचे अनुधावन करणारी अशी आख्याने यात आहेत. प्राचीन
भारतीय संस्कृतीच्या अभ्यासकांसाठी शतपथ ब्राह्मण एक महत्वाचे दस्तऐवज मानले जाते.
बृहदारण्यक:
प्रस्तुत आरण्यक ग्रंथात
प्राणविद्या, प्रतीकोपासना यांचे वर्णन आले आहे. यज्ञातील आध्यात्मिक तथ्यांची
मीमांसा यात आहे.
उपनिषद:
शुक्ल यजुर्वेदाच्या
संबंधित उपनिषदांत मुख्यत्वे ईशावास्य आणि बृहदारण्यक यांचा समावेश होतो.
उपनिषदांत मुख्यत्वे परब्रह्माचे वर्णन आहे. बृहदारण्यक उपनिषद हे आकाराने मोठे
आहे. यात महर्षी याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी यांचा संवाद आहे. या संवादाच्या
माध्यमातून परब्रह्माचे प्रवचन प्रस्तुत करण्यात आले आहे. आत्म्याचे निदिध्यासन, मंत्रण
करावे, असा संदेश हे उपनिषद अतिशय मनोरम रीतीने प्रस्तुत करते.
कात्यायन श्रौत सूत्र:
यात श्रौत यागांचे
क्रमवार, संक्षिप्त, सुव्यवस्थित वर्णन आहे. यात २६ अध्याय आहेत. प्रथम अध्यायात
पारिभाषिक विषयांचे प्रतिपादन आहे. तर अन्य अध्यायांत विविध यागांचे वर्णन आहे.
पारस्कर गृह्य सूत्र:
प्रस्तुत ग्रंथ ३ कांडांत
विभक्त आहे. प्रथम कांडात विवाह इत्यादींचे वर्णन आहे. द्वितीय कांडात उपनयन इत्यादींचे वर्णन आहे.
तृतीय कांडात पंच महायज्ञ इत्यादींचे वर्णन येते.
कृष्ण यजुर्वेद:
कृष्ण यजुर्वेदाच्या ८६
शाखांपैकी आज केवळ ४ शाखा उपलब्ध आहेत. तैत्तिरीय, मैत्रायणी, कठ आणि कपिष्ठल या
शाखा उपलब्ध आहेत.
तैत्तिरीय
संहितेत ७ कांड, ४४ प्रपाठक, ६५१ अनुवाक आहेत. या शाखेत संहिता,
ब्राह्मण आणि आरण्यक यांचे एकत्रित अध्ययन केले जाते.
मैत्रायणीय शाखेत गद्य आणि पद्य
दोन्हींचाही समवेश आहे. या संहितेत ४ कांड आहेत. ५४ प्रपाठक आहेत. ६५४ अनुवाक
आहेत. यात विविध यागांचे वर्णन आहे.
कठ शाखेत ५ खंड आहेत. ४०
स्थानक, १३ अनुवाचन, ८४३ अनुवाक आणि ३०९१ मंत्र आहेत. असे मानले जाते. या शाखेचे
प्रवक्ता कठ मुनी होत.
कपिष्ठल शाखा आज पूर्ण
स्वरूपात उपलब्ध नाही. या शाखेचे प्रवक्ता कपिष्ठल मुनी होत.
कृष्ण
यजुर्वेदाच्या संबंधित ग्रन्थ:
तैत्तिरीय ब्राह्मण,
आपस्तंब इत्यादी श्रौत सूत्र, काठक इत्यादी गृह्य सूत्र, आपस्तंब इत्यादी धर्म
सूत्र, बौधायन आदी शुल्ब सूत्र यांचा
समावेश कृष्ण यजुर्वेदाच्या संबंधित ग्रंथात होतो. तसेच तैत्तिरीय आरण्यक,
तैत्तिरीय उपनिषद, कठोपनिषद इत्यादी उपनिषदे कृष्ण यजुर्वेदाच्या संबंधित आहेत.
यजुभि: यजन्ति असे म्हटले जाते. अर्थात
याजुर्वेदाचा संबंध हा यज्ञ संस्थेशी आहे. या वेदात आणि तत्संबंधित ग्रंथांत विविध
यज्ञ, त्यांचे विधी यांचे वर्णन येते. या वेदाच्या संबंधित ऋत्विकाला अध्वर्यु अशी
संज्ञा आहे. यजुर्वेदानंतर गायनाशी संबंधित अशा सामवेदाचा क्रमांक येतो. त्याचे
वर्णन पुढील भागात......
इति लेखनसीमा!
No comments:
Post a Comment