लेखांक ६. वैविध्यपूर्ण
अथर्ववेद
डॉ. चंद्रहास शास्त्री
सोनपेठकर
अथर्ववेदाला
ब्रह्मवेद असेही म्हणतात. यामध्ये देवतांच्या स्तुतीबरोबरच वैद्यक, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाचेही मंत्र आहेत. अथर्ववेदात
वर्ण्य विषयांचे वैविध्य दृष्टिगोचर होते. वर्ण्य विषयांच्या नुसार अथर्ववेदाला
विविध नामे प्राप्त झाल्याचे दिसून येते.
अथर्ववेदाची विविध नामे:
१) अथर्ववेद :
थुर्वी धातू हा हिंसा या अर्थी आहे.
त्याच्यापासून थर्व शब्द मिळतो. अत: अहिंसा या अर्थी अथर्व हा शब्द सिद्ध होतो.
२) अथर्वाङ्गिरोवेद:
मुनी अथर्व आणि मुनी अंगिरस यांच्या नावावरून या वेदाला प्रस्तुत
अभिधान प्राप्त झाल्याचे आख्यान प्राचीन संस्कृत साहित्यात (गोपथ ब्राह्मण
ग्रंथात) आढळते.
३) ब्रह्मवेद:
यज्ञकर्मात ब्रह्मत्व प्रतिपादन,
ब्रह्मविषयक तात्त्विक चिंतन आणि ब्रह्मा नामक मंत्रद्रष्टे ऋषी यांमुळे या वेदाला
ब्रह्मवेद असे अभिधान प्राप्त झाले असण्याची शक्यता आहे.
४) भिषग्वेद:
अथर्ववेदात अनेक औषधींचा उल्लेख आहे. भिषग् म्हणजे
औषधी होय. यासाठी प्रस्तुत नाम अथर्ववेदाला प्राप्त झाले आहे. आयुर्वेदाचे मूळ
देखील अथर्ववेदात असल्याचे दिसून येते.
५) क्षत्रवेद:
अथर्ववेदात स्वराज्य रक्षणासाठी
राजकर्मसंबंधित अनेक सूक्त आहेत. अत: क्षत्रवेद हे नामाभिधान अथर्ववेदाला प्राप्त
झाले आहे.
अथर्ववेदाच्या शाखा:
अथर्वसंहितेच्या नऊ शाखा उल्लिखित
आहेत:
१.
पैप्पलाद, २. तौद, ३. मौद,
४. शौनक, ५. जाजल, ६. जलद,
७.ब्रह्मवद, ८. देवदर्श ९. चारणवैद्य
मात्र
वर्तमान काळात अथर्ववेदाच्या पैप्पलाद आणि शौनक या दोनच शाखांची माहिती मिळते. यातही
पैप्पलाद शाखा पूर्ण उपलब्ध नाही.
शौनक शाखा:
शौनक शाखेची संहिता उपलब्ध आहे. यात २०
कांड, ७३० सूक्त, ३६ प्रपाठक आणि ६००० च्या जवळपास मंत्र अशी संख्यात्मक योजना
आहे.
प्रथम कांड ते सप्तम कांडपर्यंत लहान
सूक्ते आहेत. कांड ८ ते कांड १२ यांत विविध विषयांवरील मोठी सूक्ते आहेत. कांड १३
ते २० यांत मोठी सूक्ते आहेत, मात्र त्यांच्या वर्ण्यविषयांत अनुधावन असल्याचे
दिसून येते. अथर्ववेदाच्या शौनक शाखेतील १२ व्या कांडात पृथ्वी सूक्त आहे. ते
प्रसिद्ध असे सूक्त आहे. माता भूमि पुत्रोऽहं पृथिव्या:। अर्थात
भूमी ही आमची माता आहे, मी तिचा पुत्र आहे, असे वर्णन या सूक्तात येते. “भारतमाता”
या संज्ञेची वैचारिक पृष्ठभूमी आपल्याला या सूक्तात दिसून येत नाही काय?
अथर्ववेदाचे वर्ण्य विषय:
भूगोल,
खगोलशास्त्र, वनस्पतिशास्त्र, असंख्य वनौषधी, आयुर्वेद, रोगांचे
निदान आणि उपचार, अर्थशास्त्राची मूलभूत तत्त्वे, राजकारणातील गुह्य विषय, राष्ट्रभूमी, राष्ट्रभाषा,
शस्त्रक्रिया, विविध रोगांवरील उपचार
इत्यादींचे वर्णन अथर्ववेदात आहे. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून अथर्ववेदाचे
महत्त्व अत्यंत वाखाणण्याजोगे आहे. अथर्ववेदात शांती-पुष्टी कर्म आणि अभिचार कर्म
या दोन्हींचे वर्णन आहे. अथर्ववेदात विविध विषयाचे वर्णन आले आहे. त्यांचा
थोडक्यात परिचय पुढीलप्रमाणे:
१) ब्रह्म सिद्धांत:
अथर्ववेदात ब्रह्म म्हणजे काय? त्याचे
स्वरूप कसे आहे? अशा अनेक आध्यात्मिक विषयांचे चिंतन आढळते. वैदिक वाङ्मयाच्या ज्ञानकांडाची
पार्श्वभूमी जणू अथर्ववेदात सिद्ध झाल्याचे दिसून येते. परब्रह्मविषयक अत्यंत
सूक्ष्म अशा प्रकारचे चिंतन अथर्ववेदात दिसून येते.
२) भैषज्य कर्म:
विविध रोगांच्या उपचारासाठी प्रयोग
केले जाणारे भैषज्य सूक्त यांचे वर्णन अथर्ववेदात
येते. या सूक्तांत विविध देवतांचे आवाहन,
प्रार्थना तसेच रोगांची नावे आणि त्यांच्या निराकरणार्थ विविध औषधींची नावे येतात.
३) शांतिक पौष्टिक मंत्र:
विविध
प्रकारच्या अवांछित गोष्टींपासून मुक्त होण्यासाठी शान्तिक मंत्र असतात. तर
ऐश्वर्याच्या अभिसिद्ध्यर्थ पौष्टिक मंत्र असतात. त्यांचाही समावेश अथर्ववेदात
आहे.
४)
राजकर्म:
राजाची
कर्तव्ये, दंडविधान, राजाचे अधिकार, राज्याभिषेक इत्यादी विषयांचे सविस्तर वर्णन
अथर्ववेदात आहे.
५)
सांमनस्य कर्म:
अथर्ववेदात
राष्ट्रीय, सामाजिक, कौटुंबिक सामंजस्य राहावे, यासाठी विविध सूक्तांच्या स्मरणाचे
विधान प्रतिपादन करण्यात आले आहे. परस्पर सामंजस्याला या वेदात विशेष महत्व
प्रतिपादन करण्यात आल्याचे दिसून येते.
६)
प्रायश्चित्त:
विविध
कर्मातील ज्ञात अज्ञात त्रुटी, या दृष्टीने क्षमा प्रार्थना, प्रायश्चित्त
इत्यादींचे वर्णन अथर्ववेदात दिसून येते.
७)
आयुष्कर्म:
स्वास्थ्य,
आरोग्य, दीर्घायू यांसाठी विविध सूक्त, विविध कर्म यांचे वर्णन अथर्ववेदात आहे.
८)
अभिचार कर्म:
अथर्ववेदात
काही मंत्र अभिचारविषयक आहेत. मात्र त्यांची संख्या कमी आहे. मारण, उच्चाटन
आदींसाठी अभिचार ही संज्ञा प्रयुक्त केली जाते.
अथर्ववेद – संबंधित ग्रंथ:
गोपथ
ब्राह्मण ग्रंथ अथर्ववेदाच्या पैप्पलाद शाखेशी संबंधित आहे. यात पूर्व आणि उत्तर
असे दोन भाग आहेत.
वैतान
सूत्र हे अथर्ववेदाच्या संबंधित श्रौत सूत्र आहे. ते शौनक शाखेशी समन्वित आहे.
संहिताविधि
नामक गृह्य सूत्र अथर्ववेदाच्या संबंधित आहे. यात शौनक संहितेचे विनियोग
प्रतिपादित आहेत.
मांडुकी
शिक्षा हा अथर्ववेदाच्या संबंधित उच्चारणाचे मार्गदर्शन करणारा शिक्षा ग्रंथ आहेत.
याशिवाय
नक्षत्रकल्प इत्यादी कल्पग्रंथ देखील अथर्ववेदाच्या संबंधित आहेत.
प्रश्न,
मुंड, मांडुक्य ही उपनिषदे अथर्ववेदाच्या संबंधित आहेत. या उपनिषदांत परब्रह्म
तत्त्वाचे निरूपण करण्यात आले आहे.
एकंदरच
अथर्ववेद
हा वेदराशीचा चतुर्थ भाग आहे. यातील वर्ण्यविषय हे आध्यात्मिक आणि लौकिक असे
दोन्ही दृष्टीने महत्वपूर्ण आहेत.
वेदांमध्ये विविध देवतांचे वर्णन येते.
त्या वैदिक देवताविषयक वर्णन पुढील लेखांकात......
इति लेखनसीमा.
No comments:
Post a Comment