संस्कृत साहित्य परिचय - लेखांक ४
संगीतशास्त्राशी
संबंधित सामवेद
डॉ. चंद्रहास
शास्त्री सोनपेठकर
सामवेदाची परंपरा
जैमिनी ऋषींपासून सुरु होते. वेदाचा गीति भाग असे सामवेदाला मानण्यात येते.
सहस्रवर्त्मा सामवेद:| अर्थात सामवेदाच्या १००० शाखा असाव्यात असे उल्लेख मिळतात.
या शाखांपैकी आज केवळ तीन शाखा आढळतात –
१. राणायन २. कौथुमीय आणि ३. जैमिनीय
राणायन शाखा विशेषत: दक्षिण प्रांतात प्रचलित आहे. कौथुमीय
शाखा उत्तर भारतात आढळते. तर केरळ प्रांतात जैमिनीय शाखा प्रचलित आहे.
आचार्य:
सामवेदाच्या परंपरेत १३ आचार्यांचे उल्लेख आढळतात:
१. राणायन २. सात्यमुग्री – व्यास ३. भागुरी – औलुंडी ४.
गौल्मुलवी ५. भानुमान ६. औपमन्यव
७. दाराल ८. गार्ग्य ९. सावर्णी १०. वार्षगणी ११. कुथुमी १२.
शालिहोत्र १३. जैमिनी
सामवेदाची संरचना:
मंत्रभागात आर्चिक आणि गान असतात. आर्चिकाचे पूर्व आणि
उत्तर असे दोन भाग असतात. दोहोंत एकूण २७ अध्याय १८७५ मंत्र आहेत. यापैकी ७५ मंत्र
वगळता अन्य १८०० मंत्र ऋग्वेदातही येतात.
गान भागात तीन प्रकारचे साम असतात. केवळ ऋचेच्या पदात
गायिलेला साम आवि: होय.
ऋक्पद आणि स्तोभ यांनी युक्त गायिलेला साम लेश होय.
अखिल स्तोभात गायिलेला साम छन्न होय. ऋक्पदातील अक्षरांहून
भिन्न पदांना स्तोभ असे म्हणतात.
ब्राह्मण ग्रंथ:
सामवेदाच्या आठ ब्राह्मण ग्रंथांचा उल्लेख सायणाचार्य भाष्यात
आढळतो. त्यानुसार त्यांची नावे पुढीलप्रमाणे –
१. प्रौढ (तांड्य) ब्राह्मण २. षड्विंश ब्राह्मण ३.
सामविधान ब्राह्मण ४. आर्षेय ब्राह्मण ५. देवताध्याय ब्राह्मण ६. छांदोग्य ब्राह्मण
७. संहितोपनिषद ब्राह्मण ८. वंश ब्राह्मण
तांड्य ब्राह्मण
ग्रंथाला पंचविंश किंवा महाब्राह्मण असेही म्हणतात. यातील पंचविंश हे नाव
अध्यायांच्या संख्येवरून आहे. तर महाब्राह्मण हे नाव आकारावरून आहे. याशिवाय
जैमिनी शाखेशी संबद्ध असेही काही ब्राह्मण ग्रंथ आहेत.
या ब्राह्मण ग्रंथात यज्ञीय स्तोत्रांच्या गायनाचे वर्णन
आहे. त्याला औदगात्र कर्म असे म्हणतात. उद्गाता, प्रस्तोता आणि प्रतिहर्ता नामक
साम गायक यज्ञात विविध देवतांची स्तुती गातात.
तसेच या ग्रंथांत विविध आख्याने, कथानक यांचाही समावेश आहे.
षड्विंश ब्राह्मण ग्रंथात स्मार्त याग आणि साम
यांचे विधी प्रतिपादित केले आहेत.
सामविधान ब्राह्मण ग्रंथात क्रुष्ट, प्रथम, द्वितीय, तृतीय,
चतुर्थ मंद्र, अतिस्वार या सात स्वरांनी देव, मानव. पशु, गंधर्व, अप्सरा, पितृ गण,
पक्षी, असुर, सर्व स्थावर जंगम वस्तू यांची तृप्ती होते, असे वर्णन येते.
आर्षेय ब्राह्मण ग्रंथात सामांच्या नावांच्या संबंधित
ऋषींचे नामोल्लेख आहेत. मंत्रद्रष्ट्याऋषींच्या वर्णनामुळे या ग्रंथाचे नाव आर्षेय
असे रूढ झाले असावे.
देवताध्याय ब्राह्मण ग्रंथात साम संबंधित देवतांचे उल्लेख
आहेत.
छांदोग्य उपनिषद ब्राह्मण ग्रंथात १० प्रपाठक आहेत. प्रपाठक
१ आणि २ मध्ये विवाहादि मंत्रांचे उल्लेख आहेत. आणि उर्वरित ८ प्रपाठक उपनिषद आहे.
यात सामाच्या सारतत्वाला स्वर असे म्हणले आहे. यात सामगानाचे महत्व प्रतिपादन
करण्यात आले आहे.
संहितोपनिषद ब्राह्मण ग्रंथात सामसंहितेचे रहस्य सांगितले
आहे. याचे पाच खंड आहेत.
वंश ब्राह्मण ग्रंथात तीन खंड आहेत. यात साम अध्ययन परंपरा
प्रतिपादन करण्यात आली आहे.
सूत्र ग्रंथ :
द्राह्यायण, लाट्यायन हे दोन श्रौत सूत्र, खादिर, गोभील हे
दोन गृह्य सूत्र आणि गौतम धर्म सूत्र प्रस्तुत वेदाशी संबंधित आहेत. गौतम धर्म सूत्र यात २८ अध्याय आहेत. यात
राजधर्म, नित्यकर्म इत्यादींचे वर्णन आहे.
शिक्षा ग्रंथ:
सामवेदाच्या उच्चारणाचे वर्णन करणारे काही शिक्षा ग्रंथ आहेत:
यात नारदीय शिक्षा ग्रंथ, गौतम शिक्षा ग्रंथ आणि लोम शिक्षा ग्रंथ यांचा समावेश
होतो. तीनही शिक्षा ग्रंथांत दोन प्रपाठक, १६ कंडिका, आहेत. सामवेदीय प्रातिशाख्य
ग्रंथ सुद्धा साम वेदाच्या उच्चारणाचे मार्गदर्शक आहेत. तसेच यासाठी साम तंत्र, ऋक् तन्त्र इत्यादी ग्रंथ
आहेत.
आरण्यक ग्रंथ:
तवलकार आरण्यक जे जैमिनीयोपनिषद म्हणून देखील प्रसिद्ध आहे.
यात चार अध्याय आहेत.
उपनिषद ग्रंथ:
केनोपनिषद आणि छांदोग्य उपनिषद ही सामवेदाशी संबंधित अशी उपनिषदे
आहेत. यात ब्रह्म विद्या निरूपण करण्यात आले आहे.
विशेष:
सामवेदापासून संगीताची उत्पत्ती मानण्यात येते.
संगीतरत्नाकर या ग्रंथातही ब्रह्मदेवाने सामवेदापासून गीतांचा संग्रह केला, असे
वर्णन येते. सामवेदादिदं गीतं संजग्राह पितामह: | असे म्हटले आहे. भरत मुनींनी
देखील अशाच प्रकारचे प्रतिपादन केले आहे. भगवान श्रीकृष्णांनी गीतेतही साम वेदाचे
महत्व प्रतिपादन केले आहे.
चतुर्वेदात
सामवेदानंतर अथर्ववेदाचा क्रमांक येतो. त्याचे वर्णन पुढील लेखांकात ......!
इति लेखनसीमा.
No comments:
Post a Comment