Thursday, April 6, 2023

शरण शरण जी हनुमंता । तुज आलो रामदूता ॥

 


शरण शरण जी हनुमंता । तुज आलो रामदूता ॥

- डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर

श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम्।

अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ॥

         असे वर्णन श्रीमद् भागवतात नवधा भक्तीचे येते. यातील जी दास्य भक्ती आहे, तिचे आचार्य म्हणून मारुतीरायांचा गौरव केला जातो. अखिल भारतात हनुमंताची आराधना केली जाते. महाराष्ट्रात देखील हनुमंताची प्राचीन मंदिरे आहेत. समर्थ रामदास स्वामींनी देखील हनुमंताच्या भक्तीचा प्रचार महाराष्ट्रात केल्याचे दिसून येते. त्यांनी अनेक ठिकाणी मारुतीरायांची मंदिरे स्थापन केली आहेत. त्याच बरोबर अनेक संतांनी आपल्या अभंगांमधून मारुतीरायांच्या विषयीची उत्कट श्रद्धा अभिव्यक्त केली आहे.

         जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून अगदी प्रासादिक शब्दांमध्ये मारुतीरायांच्या विषयीचा आपला आदरभाव व्यक्त केला आहे. तुकोबा म्हणतात –

शरण शरण जी हनुमंता । तुज आलो रामदूता ॥

काय भक्तीच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा ॥

शूर आणि धीर । स्वामिकाजी तू सादर ॥

तुका म्हणे रुद्रा । अंजनीचिया कुमरा ॥

         अर्थात हे हनुमंतराया, आपण भगवान श्रीरामाचे दूत आहात. मी आपल्याला शरण आलो आहे. आपण मला भक्तीच्या वाटा दाखवाव्यात. अर्थात भक्तीच्या मार्गातील आपण आदर्श आहात. आचार्य आहात. आपण शूर आहात. आपण धैर्यसंपन्न आहात. आपण साक्षात रुद्र म्हणजे महादेवाचे अवतार आहात. आपण अंजनी मातेच्या पोटी जन्म घेतला आहे.

         या ठिकाणी तुकोबांनी हनुमंतांचे भक्ती मार्गातील आचार्यत्व अधोरेखित केले आहे. आपल्या संस्कृतीत व्यक्तीला आपल्या जन्माचे सार्थक करण्यासाठी तीन योग सांगितले आहेत. ते योग म्हणजे ज्ञान योग, कर्म योग आणि भक्ती योग. श्रीगुरू भगवान शास्त्री महाराज सोनपेठकर सांगत असत की, जे असतं, ते ज्ञान. जे केलं जातं, ते कर्म आणि जी होते, ती भक्ती. भक्तीमध्ये सहजता असते.

         प्रभू रामचंद्रांना भेटण्यासाठी हनुमत्-कृपा आवश्यक असते. म्हणून जगद्गुरू तुकोबाराय विनम्रपणे मारुतीरायांना भक्तीविषयी मार्गदर्शन करण्याविषयी प्रार्थना करतात. भक्तीत स्वत:च्या इंद्रियांवर विजय मिळविण्याचे शौर्य आणि प्रभूच्या भेटीसाठी प्रतीक्षा करण्याचे धैर्य असावे लागते. म्हणून तुकोबा शूर आणि धीर अशी मारुतीरायांची दोन विशेषणे प्रतिपादन करतात. हनुमानजी आपल्या आराध्य स्वामींच्या म्हणजे प्रभू रामरायांच्या कार्यामध्ये अतिशय दक्ष असत. हनुमंतांच्या या स्वामी-कार्य-दक्षतेच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत.

शिवाय विष्णुरूपाय शिवरूपाय विष्णवे |
शिवस्य हृदयं विष्णुं विष्णोश्च हृदयं शिवः
||

         असे वर्णन ग्रंथांमध्ये येते. तेव्हा राम भक्ती करिता भगवान महादेवांनी मारुतीरायाचा अवतार घेतला, अशी मान्यता आहे. म्हणून तुकोबा “रुद्र” असे नामाभिधान मारुतीरायांना उद्देशून सांगतात.

जोडुनिया कर । उभा सन्मुख समोर ॥

तुका म्हणे जपे । वायुसुता जाती पापे ॥

         असे देखील मारुतीरायांचे वर्णन तुकाराम महाराजांनी केले आहे. मारुतीराय भगवान श्री रामचंद्रांच्या समोर दोन्ही हात जोडून म्हणजे नमस्कार करीत उभे असतात. अशा या वायुपुत्र हनुमंतांचे नामस्मरण कल्याणकारी आहे, असे तुकोबा सांगतात.

         तुकोबांनी जी मारुतीरायांची स्तुती आपल्या अभंगातून केली आहे, ती नितांत सुंदर आणि उत्कट अशा प्रकारची आहे. तुकोबांच्या लेखन शैलीचे सुद्धा हे वैशिष्ट्य आहे, की तुकोबा अतिशय गहन अर्थ देखील सर्व सामान्यांना समजेल, अशा सोप्या शब्दांत कथन करतात.

तुकोबा म्हणतात-

काम घातला बांदोडी । काळ केला देशधडी ॥

तया माझे दंडवत । कपिकुळी हनुमंत ॥

शरीर वज्रा ऐसे । कवळी ब्रह्मांड जो पुच्छे ॥

रामाच्या सेवका । शरण आलो म्हणे तुका ॥

         या ठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या चरणात मारुतीरायांचे ब्रह्मचर्य, चिरंजीवत्व आणि वानरयुथ प्रमुखत्व अशा गुणांचे सुतोवाच केले आहे. पुढे तुकोबा मारुतीरायांच्या वज्रासम शक्तीसंपन्न शरीर आणि व्यापकत्वाविषयी प्रतिपादन करतात. आणि शेवटच्या चरणात मारुतीरायांच्या सेवकत्वाविषयी सांगून त्यांना शरण आलो आहे, असे प्रतिपादन करतात. व्यक्तीमध्ये अनेक गुण आणि शक्ती यांची संपन्नता असली, तरी त्याचे उपयोजन सेवेत झाले पाहिजे. तरच ती व्यक्ती भक्तीपंथातील आचार्य होऊ शकते.

         तुकोबांनी एके ठिकाणी मारुतीरायांच्या लंकादहन प्रसंगाचे वर्णन केले आहे.

हनुमंत महाबळी । रावणाची दाढी जाळी ॥

तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ॥

करोनी उड्डाण । केले लंकेचे दहन ॥

जाळीयेली लंका । धन्य धन्य म्हणे तुका ॥

अशा बाणेदार, भारदस्त आणि प्रगल्भ शब्दांमध्ये तुकोबा व्यक्त होतात.

         सकल संत ज्या मारुतीरायांना आपला आदर्श मानतात, आपले आचार्य मानतात, त्या मारुतीरायांची महती सामान्य माणूस काय सांगणार? ती महती शब्दातीत आहे. लोककथा, पुराणकथा इत्यादी सर्वत्र हनुमंताची महती व्यक्त होते आहे. राम चरित मानस ज्यांनी रचले, ते संत तुलसीदास होत. त्यांच्यावर देखील मारुतीरायांनी कृपा केल्याचे सांगण्यात येते. संत तुलसीदासांचा हनुमान चालीसा देखील अत्यंत प्रसिद्ध आहे. रामायणाच्या सुंदरकांडात मारुतीरायांचा पराक्रम वर्णन करण्यात आला आहे. “भीमरूपी महारुद्रा ......” हे समर्थ रामदासस्वामीमहाराजांचे मारुती स्तोत्र देखील प्रसिद्ध आहे. संत शिरोमणी नामदेव महाराजांचा मारुतीरायांच्या जन्माचे वर्णन करणारा अभंग देखील प्रसिद्ध आहे.

संत श्री नामदेव महाराज म्हणतात-

पिंड घारीनें झडपिला । अंजनीनें तो सेविला ॥
अंजनीच्या तपासाठीं । महारुद्र आले पोटीं ॥
चैत्र शुद्ध पौर्णिमेसी । सुर्योदय समयासी ॥
महारुद्र प्रगटला । नामा म्हणे म्यां वंदिला ॥

         अशा भक्त मेरुमणी मारुतीरायांना आपणही शरण जावे आणि त्यांच्याकडून भक्तीचे वरदान मागून घ्यावे, हे खरोखर श्रेयस्कर होय.

शरण शरण जी हनुमंता । तुज आलो रामदूता ॥

 

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...