Sunday, April 23, 2023

प्रातिनिधिक वैदिक देवता

 

प्रातिनिधिक वैदिक देवता

-  डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर

 

          परब्रह्म तत्त्व अद्वितीय असले, तरी त्याच्या नाना रूपांची स्तुती नाना प्रकारे केली जाते. एकं सत् विप्राः बहुधा वदन्ति | अर्थात एक सत्य विद्वान लोक अनेक प्रकारे सांगतात, असे ऋग्वेदाच्या प्रथम मंडलातील १६४ व्या सूक्तात ४६ व्या मंत्रात म्हटले आहे. बृहद्देवता सारख्या ग्रंथांत देवतांविषयीचे सविस्तर वर्णन येते. वैदिक देवतांचा विचार करताना त्यांच्या स्थानांचा विचार करणे महत्वाचे ठरते. द्युस्थानीय देवता, अंतरीक्ष स्थानीय देवता आणि पृथ्वीस्थानीय देवता असा विचार केला जातो. संस्कृतमध्ये कोटी या शब्दाचा अर्थ प्रकार असा होतो. एकूण ३३ प्रकारच्या देवता आहेत. त्यांचे द्युस्थानीय देवता, अंतरीक्ष स्थानीय देवता आणि पृथ्वीस्थानीय देवता असे वर्गीकरण केले जाते. असेही मत अभ्यासक मांडतात.

          काही उल्लेखानुसार ८ वसू, ११ रुद्र आणि १२ आदित्य आणि २ अश्विनीकुमार  मिळून ३३ ही देवतांची संख्या सांगितली जाते.

          वेदातील या बहुतेक देवतांच्या विषयीचे सविस्तर वर्णन आपल्याला पुराणांत देखील आढळून येते.

काही प्रातिनिधिक वैदिक देवता म्हणून आपल्याला पुढील देवतांचा विचार करता येईल:

अग्नी:

अग्नी ही पृथ्वीस्थानीय देवता आहे. ऋग्वेदात अनेक (जवळपास २००) सूक्तांत अग्नी देवतेचे वर्णन येते. सनातन संस्कृतीत यज्ञप्रधानत्व आहे. त्यामुळे अग्नी सूक्तांची संख्या आधिक्याने दिसून येते. वैदिक साहित्यात अग्नीचे सुद्धा विविध प्रकार किंवा नामे आढळतात. ऋत्विक, होता, कवी, पुरोहित, अशी विविध विशेषणे आपल्याला वैदिक वाङ्मयात दिसून येतात.

सवितृ:

सवितृ ही द्युस्थानीय देवता आहे.  सवितृ म्हणजे प्रकाशाची देवता. सवितृ ही गायत्री मंत्राची उपास्य देवता आहे. हिरण्यपाणि, स्वर्णपाद, स्वर्णहस्त, स्वर्णनेत्र, स्वर्णजिह्व आदी विशेषणे सवितृ देवतेची वैदिक वाङ्मयात दिसून येतात.

विष्णु:

विष्णु ही द्युस्थानीय देवता आहे. सर्वव्यापकता असे या देवतेचे प्रमुख विशेषण वेदात आढळते. उरुक्रम, विक्रम, त्रिविक्रम इत्यादी विशेषणे वेदात आढळतात.

इंद्र:

इंद्र ही अंतरीक्ष स्थानीय देवता आहे. ऋग्वेदातील जवळपास २५० सूक्तांत इंद्र देवतेचे वर्णन आले आहे. तसेच अन्य सूक्तांत देखील इंद्र देवतेचे उल्लेख आहेत. वृत्रहा, शक्र, वज्रबाहु इत्यादी विशेषणांनी इंद्र देवतेचे वर्णन आढळून येते. सर्वच देवतांच्या बाबतीत एक गोष्ट ध्यानी घेतली पाहिजे की, ही त्यांची विशेषणे असली, तरी त्यांतील व्यवच्छेदकता महत्वपूर्ण असल्याने ही विशेषणे त्या त्या देवतांच्या नामाच्या रूपांत सुद्धा प्रयुक्त झाल्याचे दिसून येते.

 रुद्र:

त्र्यंबक, पशुपती, शिव, भव, शर्व इत्यादी विशेषणांनी किंवा नावांनी रुद्र देवतेचे वर्णन येते. महामृत्युंजय मंत्राचे हे उपास्य दैवत आहे. रुद्र सुद्धा अंतरीक्ष स्थानीय देवता होय. ऋग्वेद, यजुर्वेद यांत रुद्र देवतेचे वर्णन दिसून येते.

बृहस्पती:

बृहस्पती ही पृथ्वीस्थानीय देवता आहे. ऋग्वेदातील जवळपास ११ सूक्तांत बृहस्पती देवतेचे वर्णन आले आहे. सप्तरश्मी, सप्तजिह्व, ब्रह्मणस्पति आदी विशेषणे बृहस्पती देवतेसाठी प्रयुक्त आहेत. पौराणिक साहित्यात बृहस्पती हे देवराज इंद्राचे गुरु म्हणून वर्णित आहेत.

अश्विनीकुमार:

द्युस्थानीय देवता आहेत. युगल देवता म्हणून यांच्याकडे पाहिले जाते. सुंदर, युवक अशा या देवता आहेत. मधुयुवा, सुदानु इत्यादी नामे किंवा विशेषणे अश्विनीकुमारांची आढळून येतात.

वरुण:

वरुण ही द्युस्थानीय देवता आहे. ऋग्वेदात जवळपास १२ सूक्तांची देवता वरुण देवता आहे. ते जगताचे संचालन करतात. ते नियामक आहेत. असे वरुण देवतेचे वर्णन येते. धृतव्रत, ऋतगोपा, स्वराट् इत्यादी नामे किंवा विशेषणे वरुण देवतेची आढळून येतात.

उषस् किंवा उषा:

ही द्युस्थानीय देवता आहे. सुभगा, हिरण्यवर्णा, सुजाता, अमृता इत्यादी विशेषणे या देवतेची आढळून येतात. जवळपास २० सूक्ते या देवतेच्या विषयीची ऋग्वेदात आहेत. अत्यंत मनोरम असे वर्णन उषा देवतेचे आढळून येते.

सोम:

सोम ही पृथ्वीस्थानीय देवता आहे. ऋग्वेदातील जवळपास १५० सूक्तांत सोम देवतेचे वर्णन आले आहे. वनस्पतींमध्ये प्रमुख, इंद्रप्रिय, अमरत्व प्रदायक, रोग निवारक असे वर्णन सोम देवतेचे येते. अमर्त्य, सहस्रधार, शुद्ध आदी विशेषणे किंवा नामे यांच्या द्वारे सोम देवतेचे सुंदर वर्णन आले आहे. पुढील साहित्यात सोम देवतेचा समन्वय चंद्राशी वर्णित असल्याचे दिसून येते.

          वैदिक देवतांचा अभ्यास करताना शौनक ऋषी विरचित बृहद्देवता हा महत्वपूर्ण ग्रंथ आहे. यात १२०० श्लोक आणि ८ अध्याय आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायात ग्रंथाची भूमिका आहे. यात प्रत्येक देवतेचे रूप, स्थान आणि महिमा यांचे वर्णन आहे.

          वेद हे मूळ आहे. आणि यावर आपल्या संस्कृतीचा वृक्ष उभा आहे. या लेखात काही प्रातिनिधिक देवतांचा समावेश आहे. या देवतांचे स्वरूप पुढे पौराणिक कथांमधून सुंदर रीतीने वर्णित आहे. वैदिक संहितेच्या धावत्या विवेचनानंतर पुढील लेखांत आपण उपनिषदांचे वर्णन करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

          एक गोष्ट या ठिकाणी विशेषत्वाने नमूद करावी वाटते की, संस्कृत साहित्य परिचयाचा हा स्तंभ अनेक वाचकांना आवडला आहे. त्यांनी तसे अभिप्राय कळविले आहेत. संस्कृत साहित्य अथांग आहे. त्यातील काही अमृतकण दै. राष्ट्रसंचारच्या वाचकांपर्यंत पोचविण्याचा किंवा (आधुनिक भाषेत) शेअर करण्याचा हा एक प्रयत्न आहे. वैदिक संहिता हा उपविषयाचे समापन या लेखाने करीत आहोत. पुढील लेखांकात भारतीय तत्त्वज्ञानाच्या आधारभूत असे ज्यांना मानले जाते, ती उपनिषदे हा विषय असेल.

इति लेखनसीमा.

 

 

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...