Thursday, February 23, 2023

अद्वितीय नेसुबो !

 



अद्वितीय नेसुबो !

 डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर

          माणसाच्या जीवनात आई, वडील, कुटुंब, गुरूगृह यांना पर्याय नसतो. नेसुबो महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या या यादीत अजून एक नाव अगदी सहज वाढते आणि ते म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, नांदेड.

          शिक्षण आणि नोकरी या निमित्त अनेक चांगल्या, उत्कृष्ट संस्थांचा माझा संबंध आला. मात्र नेसुबो महाविद्यालयाचे जे रेशीमबंध माझ्या भावविश्वात सदैव असतात, ते अवर्णनीय होत.

          माहिती कुठेही मिळू शकते. आज तर अशी माहिती इंटरनेटवर अगदी बोटाच्या एका क्लिकचा अवकाश, लगेच मिळते. या अत्युत्तम माहिती समवेत मायेचा ओलावा, राष्ट्रप्रेमी विचारांचे पाथेय आणि अनुभवसंपन्नता मिळाली, तर? अहाहा! असे झाले, तर अजून प्राप्तव्य तरी काय असणार? “सर्वस्वं प्राप्तं” अर्थात सर्व काही मिळाले, असेच मनोमन वाटते. नेसुबो महाविद्यालयाने नेमके हेच आम्हाला दिलेय.

          विद्यार्थ्यांवर निस्सीम प्रेम करणारे आदरणीय बालासाहेब पांडे, कै. मु. वा. जोशी, कै. कृ. म. जोशी असे संस्थाचालक दुर्मिळात दुर्मिळ होत. विद्यार्थ्यांना आपला बहिश्चर प्राण मानणारे तत्कालीन प्राचार्य डॉ. दिलीप वैद्य सर, गुरुवर्य डॉ. सी. ना. जोशी सर, गुरुवर्य प्रा. सत्यकाम पाठक सर, प्रा. अ. मु. जोशी सर, प्रा. कापसे सर, ज्येष्ठ बंधुतुल्य डॉ. शंतनू कस्तुरे सर, प्रा. आडगावकर सर, प्रा. टी. ए. जोशी सर, प्रा. राहेगावकर सर, प्रा. गच्चे सर, प्रा. एंगडे सर, प्रा. कोत्तापल्ले सर, प्रा. मामीडवार सर, प्रा. कौसडीकर सर अशा सर्वच गुरुवर्यांचे प्रेम, आशीर्वाद आम्हाला लाभले.

          आपला विद्यार्थी हा सांस्कृतिक, सामाजिक अशा सर्वच क्षेत्रात यशस्वी व्हावा, यासाठी निरंतर प्रयत्नरत असणारे गुरुवर्य डॉ. दीपक कासराळीकर सर, गुरुवर्य डॉ. साकरकर सर, गुरुवर्य प्रा. सुनील नेरळकर सर,  प्रा. आंबेकर सर, प्रा. परिहार सर, डॉ. मनीष देशपांडे सर, प्रा. चौधरी सर, प्रा. चितानंद महोदया, प्रा. किनगावकर महोदया, प्रा. महाजन महोदया यांच्याविषयी मनात सदैव कृतज्ञताभाव आहे. आपले मोठेपण विसरून आमच्यात सहभागी होणारे, शिस्तीला कडक पण विनोदाला भारी असे आदरणीय आणि विद्यमान प्राचार्य           डॉ. सुधीर शिवणीकर सर यांच्या तालमीत राहण्याचे भाग्य आम्हाला लाभले.

          संस्थाचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचा इतका स्नेहबंध अन्यत्र कुठेही पाहायला मिळणे केवळ अशक्य. एल. के. कुलकर्णी सर, मंगनाळे सर, बंडेवार सर, कमटलवार सर, विजय जोशी सर, पळनाटे सर, संतोष कौलवार यांनी आम्हाला फार जीव लावला. या महाविद्यालयाने अक्षरश: आम्हाला घडवलेय. आयुष्यात यश, अपयश पुन्हा यश हे चक्र सहन करण्याचे बळ आम्हाला नेसुबो महाविद्यालयाने दिलेय.

          आज जेव्हा आमचे विद्यार्थी आमच्याबद्दल चार शब्द चांगले बोलतात, चांगले लिहितात, पुरस्कार, सत्कार होतात, तेव्हा नेसुबो महाविद्यालयाच्या आठवणीने डोळ्यांतून नकळत अश्रू बाहेर पडतात.

          शिक्षण संपल्यानंतर “रे जाणाऱ्या दिवसांनो, परत फिरा रे” असा लेख मी श्रमिक एकजूट मध्ये लिहिला होता. तीच भावना आज १८ वर्षानंतरही तशीच आहे. आजही मनोमन वाटतं, नेसुबो महाविद्यालयात जावं. प्रा. गिरीश पांडे, प्रा. सांगवीकर सर, प्रा. दरगु, प्रा. धर्मापुरीकर, प्रा. राजेश उंबरकर, प्रा. कोटूरवार, प्रा. अष्टूरकर आणि सर्वांशीच खूप मनसोक्त गप्पा माराव्यात. त्याच वर्गात पुन्हा बसावं. शिकावं. शिकवावं. भावाकाश समृद्ध करावं.

          नेसुबो महाविद्यालयाने मला तर फार फार दिलं. ते वर्णनातीत आहे. विद्यार्थी संसदेतील माझं सूत्रसंचालन हा जीवनातील एक अविस्मरणीय ठेवा आहे. या कार्यक्रमामुळे वक्ता दशसहस्रेषु अशा गुरुवर्य आदरणीय श्री. विवेकजी घळसासी यांच्याशी स्नेहबंध जुळले. आजही त्यांचा आशीर्वादात्मक वात्सल्यवर्षाव माझ्यावर होतो. आणि मी आनंदाने चिंब होतो.

          २००४ साली बी.एड. झालं. नेसुबो महाविद्यालयात पदव्युत्तर संस्कृत विभागात नियुक्त झालो. सर्वच गुरुजनांचे वात्सल्य मिळत राहिले. आजही मिळतेय.

          नेसुबो महाविद्यालयातील अध्ययनकाळात मिळालेले सर्वच मित्र मैत्रिणी, एन.एस.एस. शिबिरातील सहभाग, अभाविप मधील सहभाग, अध्यापन काळात मिळालेले विद्यार्थी हे सर्व अतुलनीय आहे.

          जितकं लिहीन, तितकं कमी आहे. सीमा, मर्यादा लेखनाला असू शकेल, भावनेला नाही. नेसुबो महाविद्यालयाच्या प्रत्येक कणाकणाचे आमच्यावर उपकार आहेत. हा लळा, हा जिव्हाळा फक्त इथेच! हे आमचं माहेरंय. पूर्वसंचित चांगले, म्हणून आम्हाला नेसुबो महाविद्यालयात शिक्षण घेण्याची संधी मिळाली.

          अगदी प्रांजळपणे सांगतो, इतकं सरळ सोप्या भाषेत भरभरून अन्य विषयावर मी लिहू शकेन की नाही माहित नाही. पण नेसुबो महाविद्यालय म्हणजे जीव की प्राण आहे. या विषयावर लिहावं लागत नाही, ते लिहील जातं. हृदयस्थ भावबंध कधी बोटावर येऊन मुद्रित होतात, ते कळतंच नाही.

          या आमच्या माहेराचा, नेसुबो महाविद्यालयाचा असाच उत्तरोत्तर उत्कर्ष होवो. युथ फेस्टिवलमध्ये जसं सदैव विजयश्री आपणच खेचून आणायचो, तसंच या पुढेही सर्व क्षेत्रांमध्ये विजयश्री लाभो. आदरणीय प्राचार्य डॉ. शिवणीकर सर यांच्या करकमलामध्ये महाविद्यालय कोणत्याही मानांकनात अव्वल राहणार, हे तर नक्कीच आहे.

          लिहिण्याच्या ओघात आणि भावनेच्या आवेगात अनेक आदरणीय महोदयांचा नामोल्लेख राहून जाण्याचा संभव आहे. त्यांची क्षमा प्रार्थितो. नेसुबो महाविद्यालय ही माझी जीवनगाथा आहे. नेसुबो महाविद्यालय ही माझी जीवनगंगा आहे. पुण्यसलीला माता गोदावरीच्या तीरावर, श्रीगुरुगोविंदसिंहजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत, स्वा. सावरकरांच्या जाज्ज्वल्य राष्ट्रअभिमानाने ओतप्रोत अभिनव भारत शिक्षण संस्था संचलित आणि नेताजींचे नाम धारण करणारे हे महाविद्यालय खरोखर अद्वितीय, अद्वितीय, अद्वितीय होय!

          या महाविद्यालयाच्या सर्व घटकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जगद्गुरू संत श्रीतुकोबारायांचा अभंग उद्धृत करून हा लेखन प्रपंच थांबवितो.

मागणे ते एक तुजप्रती आहे।

देशील तरी पाहे पांडुरंगा॥

या संतासी निरवी हेचि मज देई।

आणिक दुजे काही न मागे देवा॥

तुका म्हणे आता उदार तू होई।

मज ठेवी पायी संताचिया॥

इति लेखनसीमा.

Tuesday, February 21, 2023

चंद्रामृत भाग १

                               

व्याख्याते, प्रवचनकार यांच्यासाठी उपयुक्त पुस्तक “चंद्रामृत भाग १”

सौ. रोहिणी पांडे

          सुप्रसिद्ध प्रवचनकार, कीर्तनकार ह.भ.प. डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर यांच्या सिद्धहस्त आणि चतुरस्त्र लेखणीतून साकारलेले एक निर्व्याज मनोरम पुस्तक म्हणजे चंद्रामृत भाग १. डॉ. शास्त्रींची अनेक व्याख्याने, प्रवचने सातत्याने होत असतात. तसेच अनेक वृत्तपत्रांमधून आणि समाज माध्यमात देखील ते सातत्याने लेखन करतात. या व्याख्याने, प्रवचने आणि लेख यांच्यावर आधारित पुस्तक म्हणजे चंद्रामृत भाग १होय.

          या पुस्तकात विविध विषयांवरील शास्त्रीजींचे लेख आणि मुलाखत यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांचा थोडक्यात सारांश असा की,

वैदिकसाहित्यातील गौ-वर्णन :                

          हिंदु संस्कृतीमध्ये गायीचे महत्व असाधारण आहे. पुराणांमध्ये पृथ्वीचे देखील धेनुरूपात वर्णन करण्यात आले आहे. वेदातही अनेक ठिकाणी गायींचे वर्णन आहे. उपनिषदांतही गायींचे वर्णन येते. हिंदु संस्कृतीतील अनेक सण-उत्सव यांत गोवंशाचे महत्व आहे. ‘गो-ग्रास’ म्हणजे गायीचा घास हा तर हिंदुसमाजाच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. आजही अनेक घरांमध्ये दररोज स्वयंपाक करताना गो-ग्रास तयार केला जातो. वैदिकसाहित्यात विविध ठिकाणी आलेल्या गोमातेच्या वर्णनाचा आढावा यात आहे.

महाकवी कालिदासाविषयी......!

          कोणत्याही भाषेच्या श्रीमंतीचा विचार करताना त्या भाषेचे व्याकरण, उच्चारणशास्त्र, दर्शनादि तत्त्वज्ञानपरक ग्रंथ, काव्य-नाटकादि साहित्य ग्रंथ, समीक्षा ग्रंथ यांचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. या सर्वच क्षेत्रात संस्कृतशारदेने भव्यतेचे सिंहासन आणि दिव्यत्वाचे नितांत सुंदर रूप धारण केल्याचे दिसून येते. वाल्मिकी, व्यासादि ऋषी, महाकवी भास, बाणभट्टासारखे साहित्यिक, बादरायण, शंकराचार्य यांसारखे तत्त्वज्ञ, आर्य चाणक्य, चरक, भरतमुनी यांसारखे शास्त्रकार, पाणिनी सारखे व्याकरण व उच्चारशास्त्राचे ज्ञाते अशी या संस्कृत सारस्वतांची मांदियाळी आहे. यातीलच एक विश्वप्रसिद्ध अभिधान म्हणजे कविकुलगुरु महाकवी कालिदास. महाकवी कालीदासाविषयी संग्रहणीय माहिती या लेखात वाचकांना ओघवत्या भाषेत प्राप्त होते.

लोकमान्यांना  अभिप्रेत  कर्मयोगाची  प्रासंगिकता

गीतारहस्याच्या   चौदाव्या   प्रकरणात   लोकमान्य   स्पष्ट   करतात   की,   ‘‘कर्मे   करीत   असताना अध्यात्मविचाराने  किंवा  भक्तीने  सर्वात्मैक्यरूप  साम्यबुद्धि  पूणपणे  संपादन  करणे  व  ती  प्राप्त झाल्यावरही  संन्यास  घेण्याच्या  भरीस  न  पडता  संसारात  शास्त्रतः  प्राप्त  झालेली  सर्व  कर्मे  केवळ कर्तव्य  म्हणून  नेहमी  करीत  राहणे  हाच  या  जगांत  माणसाचा  परम  पुरुषार्थ  किंवा  आयुष्यक्रमणाचा उत्तम   मार्ग   होय,   असे   भगवद्गीतेत   प्रतिपादन   केले   आहे.’’ लोकमान्य टिळकांच्या गीता रहस्यातील या विवेचनाविषयी प्रस्तुत लेखात कथन केलेले आहे.

तुम्हाला जिंकायचं असेल तर......

आपण एक ध्येय ठरवतो. त्या ध्येयासाठी स्वत:ला झोकून देतो. पण जीवन जगताना केवळ एक ध्येय म्हणजे सर्व काही असते का? तर नाही. आपल्या जीवनाचे अनेक पैलू असतात. वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक अशा स्तरांवर आपण जीवन जगत असतो. यातील प्रत्येक पैलू तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे जीवनात एका पेक्षा अधिक ध्येये, उद्दिष्टे असू शकतात. आर्थिक, शारीरिक स्वास्थ्य देखील महत्वाचे असते. या स्थितीत जिंकण्यासाठी काय केले पाहिजे, याचे सुंदर वर्णन या लेखात आहे.

यशस्वी होण्यासाठी ह्या चार गोष्टी ध्यानी ठेवा.

आपल्यापैकी प्रत्येकालाच यशस्वी व्हायला आवडतं. यशस्वी होण्यासाठी वयाचे बंधन नसते. यशाची संकल्पना मात्र स्थळ, काळ, स्थिती,वय या नुसार बदलू शकते. काही लोक जगण्यासाठी जिंकत असतात. काही लोक जिंकण्यासाठी जगत असतात. तर काही लोकांसाठी जगणं हेच जिंकणं असतं. कधी कधी एकाच व्यक्तीच्या आयुष्यात देखील या सर्व स्थिती अनुभवाला आलेल्या असू शकतात. यशश्री प्राप्त करण्याविषयीचे नितांत सुंदर वर्णन या लेखात आहे.

आपलं कार्यक्षेत्र आपलं प्रभावक्षेत्र झालं पाहिजे......!

जगातील कोणतेही कार्यक्षेत्र श्रेष्ठ अश्रेष्ठ अशी विभागणी करणे चूक आहे. तर आपण आपला प्रभाव आपल्या कार्यक्षेत्रात निर्माण केले पाहिजे. आपले कार्यक्षेत्र आपले प्रभावक्षेत्र व्हावे, यासाठी ध्यानी ठेवाव्या अशा काही गोष्टी या लेखात कथन केल्या आहेत.

संत विचारांतून मानसिक आरोग्य

संतांच्या प्रत्येक शब्दात, अक्षरात, उकारादि मात्रांतही एक विचार असतो. माणसांचे कल्याण व्हावे, त्याचे आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक अशा तीनही तापांची शांती व्हावी, यासाठी “बुडत हे जन देखवेना डोळा |” किंवा “ऐसी कळवळ्याची जाती। करी लाभेविण प्रीती।।”  या भूमिकेतून संतांनी लोकप्रबोधन केले आहे.  या विषयीचे कथन प्रस्तुत लेखात आहे.

ॐ पार्थाय प्रतिबोधिताम् |

श्रीमद्भगवद्गीता जयंती निमित्त संस्कृत भारती द्वारे आयोजित शास्त्रीजींच्या संस्कृत प्रवचनाचा सारांश या लेखात आहे.

चला, कमी राजकीय होऊ या......

दैनंदिन जीवनात आपण आवश्यकतेपेक्षा अधिक राजकीय विचार करतो आहोत का? राजकीय हा जीवनाचा एक पैलू आहे. जीवनात सांस्कृतिक, सामाजिक, मानसिक, आध्यात्मिक असे अनेक पैलू आहेत. याबद्दल विचार प्रवर्तक असा हा लेख आहे.

संस्कृतात लेखन होणे आवश्यक

संस्कृतविषयी बोलताना संस्कृतात आधुनिक काळात लिहिलं जात नाही, असा आक्षेप एका व्यक्तीने घेतला. शास्त्रीजींनी समोरच्या व्यक्तीला आपण कृतीतून उत्तर द्यायचं असं ठरवलं. आणि अक्षरश: वृत्तबद्ध अशा संस्कृत श्लोकांची रचना करण्यास प्रारंभ केला. आज सहस्रावधी श्लोक रचना शास्त्रीजींनी केल्या आहेत. डॉ. शास्त्रीजी रचित “श्रीरेणुकाशरणम्” हे संस्कृत काव्य शॉपिजेन प्रकाशन, अहमदाबाद यांचे द्वारे प्रकाशित करण्यात येत आहे, तसेच नुकतेच त्यांचा संस्कृतच्या क्षेत्रातील प्रतिष्ठेचा असा प्रज्ञाभारती स्मृती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला, त्या निमित्त ही खास मुलाखत घेण्यात आली होती. या मुलाखतीचाही समावेश प्रस्तुत पुस्तकात आहे.

         अर्थातच हे पुस्तक वाचताना देखील आपण शास्त्रीजींचे व्याख्यान ऐकत आहोत, असे वाटते, इतके हे लिखाण प्रभावी आणि सहजतापूर्ण आहे. संस्कृत अध्यापिका आणि अभिज्ञान, पुणे च्या संचालिका सौ. मानसी चंद्रहास शास्त्री सोनपेठकर यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी सुप्रसिद्ध साहित्यिक ऋचा पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

          चंद्रहास शास्त्री यांच्या अमृततुल्य शब्दांनी ओथंबलेले हे चंद्रामृत रसिकांना नक्कीच आवडेल.

चंद्रामृत भाग १

शॉपिजेन प्रकाशन, अहमदाबाद

पृष्ठे ६१

किंमत १५०

 

 

 




या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...