Tuesday, February 21, 2023

चंद्रामृत भाग १

                               

व्याख्याते, प्रवचनकार यांच्यासाठी उपयुक्त पुस्तक “चंद्रामृत भाग १”

सौ. रोहिणी पांडे

          सुप्रसिद्ध प्रवचनकार, कीर्तनकार ह.भ.प. डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर यांच्या सिद्धहस्त आणि चतुरस्त्र लेखणीतून साकारलेले एक निर्व्याज मनोरम पुस्तक म्हणजे चंद्रामृत भाग १. डॉ. शास्त्रींची अनेक व्याख्याने, प्रवचने सातत्याने होत असतात. तसेच अनेक वृत्तपत्रांमधून आणि समाज माध्यमात देखील ते सातत्याने लेखन करतात. या व्याख्याने, प्रवचने आणि लेख यांच्यावर आधारित पुस्तक म्हणजे चंद्रामृत भाग १होय.

          या पुस्तकात विविध विषयांवरील शास्त्रीजींचे लेख आणि मुलाखत यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांचा थोडक्यात सारांश असा की,

वैदिकसाहित्यातील गौ-वर्णन :                

          हिंदु संस्कृतीमध्ये गायीचे महत्व असाधारण आहे. पुराणांमध्ये पृथ्वीचे देखील धेनुरूपात वर्णन करण्यात आले आहे. वेदातही अनेक ठिकाणी गायींचे वर्णन आहे. उपनिषदांतही गायींचे वर्णन येते. हिंदु संस्कृतीतील अनेक सण-उत्सव यांत गोवंशाचे महत्व आहे. ‘गो-ग्रास’ म्हणजे गायीचा घास हा तर हिंदुसमाजाच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. आजही अनेक घरांमध्ये दररोज स्वयंपाक करताना गो-ग्रास तयार केला जातो. वैदिकसाहित्यात विविध ठिकाणी आलेल्या गोमातेच्या वर्णनाचा आढावा यात आहे.

महाकवी कालिदासाविषयी......!

          कोणत्याही भाषेच्या श्रीमंतीचा विचार करताना त्या भाषेचे व्याकरण, उच्चारणशास्त्र, दर्शनादि तत्त्वज्ञानपरक ग्रंथ, काव्य-नाटकादि साहित्य ग्रंथ, समीक्षा ग्रंथ यांचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. या सर्वच क्षेत्रात संस्कृतशारदेने भव्यतेचे सिंहासन आणि दिव्यत्वाचे नितांत सुंदर रूप धारण केल्याचे दिसून येते. वाल्मिकी, व्यासादि ऋषी, महाकवी भास, बाणभट्टासारखे साहित्यिक, बादरायण, शंकराचार्य यांसारखे तत्त्वज्ञ, आर्य चाणक्य, चरक, भरतमुनी यांसारखे शास्त्रकार, पाणिनी सारखे व्याकरण व उच्चारशास्त्राचे ज्ञाते अशी या संस्कृत सारस्वतांची मांदियाळी आहे. यातीलच एक विश्वप्रसिद्ध अभिधान म्हणजे कविकुलगुरु महाकवी कालिदास. महाकवी कालीदासाविषयी संग्रहणीय माहिती या लेखात वाचकांना ओघवत्या भाषेत प्राप्त होते.

लोकमान्यांना  अभिप्रेत  कर्मयोगाची  प्रासंगिकता

गीतारहस्याच्या   चौदाव्या   प्रकरणात   लोकमान्य   स्पष्ट   करतात   की,   ‘‘कर्मे   करीत   असताना अध्यात्मविचाराने  किंवा  भक्तीने  सर्वात्मैक्यरूप  साम्यबुद्धि  पूणपणे  संपादन  करणे  व  ती  प्राप्त झाल्यावरही  संन्यास  घेण्याच्या  भरीस  न  पडता  संसारात  शास्त्रतः  प्राप्त  झालेली  सर्व  कर्मे  केवळ कर्तव्य  म्हणून  नेहमी  करीत  राहणे  हाच  या  जगांत  माणसाचा  परम  पुरुषार्थ  किंवा  आयुष्यक्रमणाचा उत्तम   मार्ग   होय,   असे   भगवद्गीतेत   प्रतिपादन   केले   आहे.’’ लोकमान्य टिळकांच्या गीता रहस्यातील या विवेचनाविषयी प्रस्तुत लेखात कथन केलेले आहे.

तुम्हाला जिंकायचं असेल तर......

आपण एक ध्येय ठरवतो. त्या ध्येयासाठी स्वत:ला झोकून देतो. पण जीवन जगताना केवळ एक ध्येय म्हणजे सर्व काही असते का? तर नाही. आपल्या जीवनाचे अनेक पैलू असतात. वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक अशा स्तरांवर आपण जीवन जगत असतो. यातील प्रत्येक पैलू तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे जीवनात एका पेक्षा अधिक ध्येये, उद्दिष्टे असू शकतात. आर्थिक, शारीरिक स्वास्थ्य देखील महत्वाचे असते. या स्थितीत जिंकण्यासाठी काय केले पाहिजे, याचे सुंदर वर्णन या लेखात आहे.

यशस्वी होण्यासाठी ह्या चार गोष्टी ध्यानी ठेवा.

आपल्यापैकी प्रत्येकालाच यशस्वी व्हायला आवडतं. यशस्वी होण्यासाठी वयाचे बंधन नसते. यशाची संकल्पना मात्र स्थळ, काळ, स्थिती,वय या नुसार बदलू शकते. काही लोक जगण्यासाठी जिंकत असतात. काही लोक जिंकण्यासाठी जगत असतात. तर काही लोकांसाठी जगणं हेच जिंकणं असतं. कधी कधी एकाच व्यक्तीच्या आयुष्यात देखील या सर्व स्थिती अनुभवाला आलेल्या असू शकतात. यशश्री प्राप्त करण्याविषयीचे नितांत सुंदर वर्णन या लेखात आहे.

आपलं कार्यक्षेत्र आपलं प्रभावक्षेत्र झालं पाहिजे......!

जगातील कोणतेही कार्यक्षेत्र श्रेष्ठ अश्रेष्ठ अशी विभागणी करणे चूक आहे. तर आपण आपला प्रभाव आपल्या कार्यक्षेत्रात निर्माण केले पाहिजे. आपले कार्यक्षेत्र आपले प्रभावक्षेत्र व्हावे, यासाठी ध्यानी ठेवाव्या अशा काही गोष्टी या लेखात कथन केल्या आहेत.

संत विचारांतून मानसिक आरोग्य

संतांच्या प्रत्येक शब्दात, अक्षरात, उकारादि मात्रांतही एक विचार असतो. माणसांचे कल्याण व्हावे, त्याचे आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक अशा तीनही तापांची शांती व्हावी, यासाठी “बुडत हे जन देखवेना डोळा |” किंवा “ऐसी कळवळ्याची जाती। करी लाभेविण प्रीती।।”  या भूमिकेतून संतांनी लोकप्रबोधन केले आहे.  या विषयीचे कथन प्रस्तुत लेखात आहे.

ॐ पार्थाय प्रतिबोधिताम् |

श्रीमद्भगवद्गीता जयंती निमित्त संस्कृत भारती द्वारे आयोजित शास्त्रीजींच्या संस्कृत प्रवचनाचा सारांश या लेखात आहे.

चला, कमी राजकीय होऊ या......

दैनंदिन जीवनात आपण आवश्यकतेपेक्षा अधिक राजकीय विचार करतो आहोत का? राजकीय हा जीवनाचा एक पैलू आहे. जीवनात सांस्कृतिक, सामाजिक, मानसिक, आध्यात्मिक असे अनेक पैलू आहेत. याबद्दल विचार प्रवर्तक असा हा लेख आहे.

संस्कृतात लेखन होणे आवश्यक

संस्कृतविषयी बोलताना संस्कृतात आधुनिक काळात लिहिलं जात नाही, असा आक्षेप एका व्यक्तीने घेतला. शास्त्रीजींनी समोरच्या व्यक्तीला आपण कृतीतून उत्तर द्यायचं असं ठरवलं. आणि अक्षरश: वृत्तबद्ध अशा संस्कृत श्लोकांची रचना करण्यास प्रारंभ केला. आज सहस्रावधी श्लोक रचना शास्त्रीजींनी केल्या आहेत. डॉ. शास्त्रीजी रचित “श्रीरेणुकाशरणम्” हे संस्कृत काव्य शॉपिजेन प्रकाशन, अहमदाबाद यांचे द्वारे प्रकाशित करण्यात येत आहे, तसेच नुकतेच त्यांचा संस्कृतच्या क्षेत्रातील प्रतिष्ठेचा असा प्रज्ञाभारती स्मृती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला, त्या निमित्त ही खास मुलाखत घेण्यात आली होती. या मुलाखतीचाही समावेश प्रस्तुत पुस्तकात आहे.

         अर्थातच हे पुस्तक वाचताना देखील आपण शास्त्रीजींचे व्याख्यान ऐकत आहोत, असे वाटते, इतके हे लिखाण प्रभावी आणि सहजतापूर्ण आहे. संस्कृत अध्यापिका आणि अभिज्ञान, पुणे च्या संचालिका सौ. मानसी चंद्रहास शास्त्री सोनपेठकर यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी सुप्रसिद्ध साहित्यिक ऋचा पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

          चंद्रहास शास्त्री यांच्या अमृततुल्य शब्दांनी ओथंबलेले हे चंद्रामृत रसिकांना नक्कीच आवडेल.

चंद्रामृत भाग १

शॉपिजेन प्रकाशन, अहमदाबाद

पृष्ठे ६१

किंमत १५०

 

 

 




No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...