लेखांक: १२
नचिकेता: एक आदर्श विद्यार्थी
डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर
कठोपनिषदामध्ये
नचिकेताचे आख्यान येते.
या आख्यानाचा सारांश थोडक्यात असा आहे की,
वाजश्रवा ऋषींचे पुत्र उद्दालक
यांनी एकदा विश्वजीत नामक यज्ञ केला, यज्ञ संपन्नझाल्यानंतर दक्षिणा म्हणून गोधन देण्यात येत होते. त्या ठिकाणी उद्दालक मुनींचा पुत्र नचिकेता हा देखील
उपस्थित होता. नचिकेताने पाहिले आणि आपल्या मनात विचार केला की, वृद्ध अशा प्रकारच्या गाई दान देण्यात येत आहेत. असे झाले तर आपले पिता उद्दालक हे पुण्याचे नव्हे तर पापाचे धनी होतील. म्हणून त्याने आपल्या पित्याला विचारले की, “पिताश्री
तुम्ही मला कोणाला देत आहात?”
हे ऐकून मुनी रागावले आणि म्हणाले -
“मी तुला मृत्यूला देत आहे.”
पित्याचे हे क्रोधपूर्ण वचन
ऐकून नचिकेता आपल्या मनात
विचार करू लागला की, शिष्य आणि
पुत्र यांच्या तीन श्रेणी असतात.
उत्तम मध्यम आणि कनिष्ठ. गुरूंचा अभिप्राय समजून
घेऊन त्यांनी आज्ञा करण्याच्या आधीच त्यांची सेवा करतात ते उत्तम होत. गुरूंनी आज्ञा दिल्यावर जे त्यांची सेवा करतात
ते मध्यम होत. आणि गुरूंच्या आज्ञेचा जे भंग
करतात ते कनिष्ठ होत. मग माझ्यासारख्या गुणसंपन्न पुत्राला पित्याने मृत्यू देवता
यमराजाला का बरे दिले असावे?
कदाचित मी उत्तम नसेलही पण मध्यम तर नक्कीच आहे. कदाचित पिताश्रींनी रागाच्या भरात असे म्हटले असेल. परंतु त्यांचे वचन सत्य झाले पाहिजे. मी यमराजाकडे
जातो. पुत्राची अवस्था पाहून मुनींना देखील वाईट वाटत होते. परंतु नचिकेताने त्यांना समजावून सांगितले आणि त्यांची आज्ञा घेऊन तो यमराजाकडे
निघाला.
नचिकेता यमराजाच्या घरी
जातो. आणि पाहतो तर यमराज बाहेर गेलेले
असतात. नचिकेताला तीन रात्र अन्न
पाण्याशिवाय यमराजाची प्रतीक्षा करावी लागली. तिसऱ्या दिवशी यमराज घरी आले.
त्यांनी नचिकेताला पाहिलं.
यमदेवाच्या घरच्या लोकांनी त्यांना नचिकेता बद्दल सांगितलं. यमदेवाने नचिकेताचे आदरातिथ्य
केले. आणि तीन रात्री अन्न पाण्याशिवाय
तेथे थांबल्यामुळे नचिकेताला तीन वर मागण्यास सांगितले. नचिकेताने पहिला वर
मागितला की, “माझ्या पित्याचा राग शांत व्हावा.” यमदेवाने तसा वर दिला. यमदेवाने तपस्या करून स्वर्ग साधनभूत अग्नी
विद्या मिळवली होती.
दुसरा वर म्हणून नचिकेताने ही अग्निविद्या यमराजाला मागितली. यमदेवाने हा देखील वर नचिकेतला दिला.
पहिल्या वरांमध्ये पित्याचा
राग शांत झाला. दुसऱ्या
वराच्या माध्यमातून नचिकेताला स्वर्ग साधनभूत अशी अग्नी विद्या मिळाली. तेव्हा नचिकेताने विचार केला की,
या अग्निविद्येच्या माध्यमातून स्वर्गलोक जरी प्राप्त केला, तरी जीवाचे परम कल्याण होते का? तर नाही. कारण
पुण्य क्षण झाले असता पुनश्च मृत्यू लोकांमध्ये जन्म घ्यावा लागतो आणि म्हणून
नचिकेताने तिसरा वर म्हणून आत्मज्ञान राजाकडे मागितले. यमराजाने सुरुवातीला
आत्मज्ञानाचे काठीण्य समजावून सांगितले पण
नचिकेता आपल्या भूमिकेवर ठाम राहिला.
त्यानंतर आत्मज्ञान सोडून अन्य विविध प्रकारचे विषय भोग नचिकेतला देऊ केले. “शतायुषी
पुत्र पौत्र घे.
गोधन घे. पशुधन घे. दीर्घायुष्य घे. राज्य घे. सम्राटपद घे. जे जे भोग मृत्यूलोकी प्राप्त करणे
अवघड आहे, ते सर्व घे. पण
आत्मज्ञानाविषयी प्रश्न विचारू नको.”
नचिकेता आपल्या भूमिकेवर अढळ
होता. त्याने सांगितले की, “वरदान द्यायचं असेल तर मला तोच वर
दे. मला दुसरे
काही नको. मला
आत्मज्ञानच पाहिजे.”
अशा प्रकारे यमदेवाने नचिकेताची परीक्षा घेतली. त्या परीक्षेत नचिकेचा उत्तीर्ण झाला. आणि मग यमदेवाने आनंदित होऊन नचिकेताला आत्मज्ञान दिले. श्रेय म्हणजे काय? प्रेय
म्हणजे काय? याचा
विवेक दिला. ओंकार प्रणवाचा
उपदेश केला. परब्रह्माचे तत्व
सांगितले. आणि अशाप्रकारे नचिकेताने
आत्मज्ञान प्राप्त केले.
नचिकेताची ही कथा कठ
उपनिषदामध्ये येते.
आदर्श विद्यार्थी कसा असावा?
विद्यार्थ्याने आपल्या अध्ययन विषयासाठी एकनिष्ठ जिज्ञासू कसे असावे? याचे सुंदर चित्रण या ठिकाणी आले
आहे. किंबहुना
आदर्श विद्यार्थ्यांची भारतीय संकल्पना नचिकेताच्या रूपात सुस्पष्ट झाली आहे असे
म्हणता येईल.