Thursday, June 1, 2023

नचिकेता: एक आदर्श विद्यार्थी

 

लेखांक: १२

नचिकेता: एक आदर्श विद्यार्थी

डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर

 

          कठोपनिषदामध्ये नचिकेताचे आख्यान येते. या आख्यानाचा सारांश थोडक्यात असा आहे की, वाजश्रवा ऋषींचे पुत्र उद्दालक यांनी एकदा विश्वजीत नामक यज्ञ केला, यज्ञ संपन्नझाल्यानंतर दक्षिणा म्हणून गोधन देण्यात येत होते. त्या ठिकाणी उद्दालक मुनींचा पुत्र नचिकेता हा देखील उपस्थित होता. नचिकेताने पाहिले आणि आपल्या मनात विचार केला की, वृद्ध अशा प्रकारच्या गाई दान देण्यात येत आहेत. असे झाले तर आपले पिता उद्दालक हे पुण्याचे नव्हे तर पापाचे धनी होतील. म्हणून त्याने आपल्या पित्याला विचारले की, पिताश्री तुम्ही मला कोणाला देत आहात?” हे ऐकून मुनी रागावले आणि म्हणाले -

 मी तुला मृत्यूला देत आहे.”

         पित्याचे हे क्रोधपूर्ण वचन ऐकून नचिकेता आपल्या मनात विचार करू लागला की, शिष्य आणि पुत्र यांच्या तीन श्रेणी असतात. उत्तम मध्यम आणि कनिष्ठ. गुरूंचा अभिप्राय समजून घेऊन त्यांनी आज्ञा करण्याच्या आधीच त्यांची सेवा करतात ते उत्तम होत. गुरूंनी आज्ञा दिल्यावर जे त्यांची सेवा करतात ते मध्यम होत. आणि गुरूंच्या आज्ञेचा जे भंग करतात ते कनिष्ठ होत. मग माझ्यासारख्या गुणसंपन्न पुत्राला पित्याने मृत्यू देवता यमराजाला का बरे दिले असावे? कदाचित मी उत्तम नसेलही पण मध्यम तर नक्कीच आहे. कदाचित पिताश्रींनी रागाच्या भरात असे म्हटले असेल. परंतु त्यांचे वचन सत्य झाले पाहिजे. मी मराजाकडे जातो. पुत्राची अवस्था पाहून मुनींना देखील वाईट वाटत होते. परंतु नचिकेताने त्यांना समजावून सांगितले आणि त्यांची आज्ञा घेऊन तो यमराजाकडे निघाला.

         नचिकेता यमराजाच्या घरी जातो. आणि पाहतो तर यमराज बाहेर गेलेले असतात. नचिकेताला तीन रात्र अन्न पाण्याशिवाय यमराजाची प्रतीक्षा करावी लागली. तिसऱ्या दिवशी यमराज घरी आले. त्यांनी नचिकेताला पाहिलं. यमदेवाच्या घरच्या लोकांनी त्यांना नचिकेता बद्दल सांगितलं. यमदेवाने नचिकेताचे आदरातिथ्य केले. आणि तीन रात्री अन्न पाण्याशिवाय तेथे थांबल्यामुळे नचिकेताला तीन वर मागण्यास सांगितले. नचिकेताने पहिला वर मागितला की, माझ्या पित्याचा राग शांत व्हावा.” यमदेवाने तसा वर दिला. यमदेवाने तपस्या करून स्वर्ग साधनभूत अग्नी विद्या मिळवली होती. दुसरा वर म्हणून नचिकेताने ही अग्निविद्या यमराजाला मागितली. यमदेवाने हा देखील वर नचिकेतला दिला.

         पहिल्या वरांमध्ये पित्याचा राग शांत झाला. दुसऱ्या वराच्या माध्यमातून नचिकेताला स्वर्ग साधनभूत अशी अग्नी विद्या मिळाली. तेव्हा नचिकेताने विचार केला की, या अग्निविद्येच्या माध्यमातून स्वर्गलोक जरी प्राप्त केला, तरी जीवाचे परम कल्याण होते का? तर नाही. कारण पुण्य क्षण झाले असता पुनश्च मृत्यू लोकांमध्ये जन्म घ्यावा लागतो आणि म्हणून नचिकेताने तिसरा वर म्हणून आत्मज्ञान राजाकडे मागितले. यमराजाने सुरुवातीला आत्मज्ञानाचे काठीण्य समजावून सांगितले पण नचिकेता आपल्या भूमिकेवर ठाम राहिला. त्यानंतर आत्मज्ञान सोडून अन्य विविध प्रकारचे विषय भोग नचिकेतला देऊ केले. शतायुषी पुत्र पौत्र घे. गोधन घे. पशुधन घे. दीर्घायुष्य घे. राज्य घे. सम्राटपद घे. जे जे भोग मृत्यूलोकी प्राप्त करणे अवघड आहे, ते सर्व घे. पण आत्मज्ञानाविषयी प्रश्न विचारू नको.” नचिकेता आपल्या भूमिकेवर ढळ होता. त्याने सांगितले की, “वरदान द्यायचं असेल तर मला तोच वर दे. मला दुसरे काही नको. मला आत्मज्ञानच पाहिजे.” अशा प्रकारे यमदेवाने नचिकेताची परीक्षा घेतली. त्या परीक्षेत नचिकेचा उत्तीर्ण झाला. आणि मग यमदेवाने आनंदित होऊन नचिकेताला आत्मज्ञान दिले. श्रेय म्हणजे काय? प्रे म्हणजे काय? याचा विवेक दिला. ओंकार प्रणवाचा उपदेश केला. परब्रह्माचे तत्व सांगितले. आणि अशाप्रकारे नचिकेताने आत्मज्ञान प्राप्त केले.

         नचिकेताची ही कथा कठ उपनिषदामध्ये येते. आदर्श विद्यार्थी कसा असावा? विद्यार्थ्याने आपल्या अध्ययन विषयासाठी एकनिष्ठ जिज्ञासू कसे असावे? याचे सुंदर चित्रण या ठिकाणी आले आहे. किंबहुना आदर्श विद्यार्थ्यांची भारतीय संकल्पना नचिकेताच्या रूपात सुस्पष्ट झाली आहे असे म्हणता येईल.

 

Thursday, May 25, 2023

वेदांग म्हणजे काय?

 

वेदांग म्हणजे काय?

डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर

 

         वेदांग म्हणजे वेदांचे अंग. वेदपुरुषाची संकल्पना अशी आहे की, सहा शास्त्रे ही त्याची सहा अंगे आहेत. अङ्ग्यन्ते ज्ञायन्ते अमीभिरिति अङ्गानि | म्हणजे ज्यांच्या द्वारे वेदांच्या अर्थज्ञानाची प्रक्रिया सुलभ होते, त्यांना वेदांचे अंग असे म्हणतात.

छन्दः पादौ तु वेदस्य हस्तौ कल्पोऽथ पठ्यते

ज्योतिषामयनं चक्षुर्निरुक्तं श्रोत्रमुच्यते

शिक्षा घ्राणं तु वेदस्य मुखं व्याकरणं स्मृतम्

तस्मात्सांगमधीत्यैव ब्रह्मलोके महीयते

या श्लोकात सहा वेदांगांचे नामाभिधान आणि वेदपुरुषाच्या बाबतीत त्या वेदांगांची स्थाने स्पष्ट करण्यात आली आहेत.

 

सहा वेदांगांची नावे:

१.  शिक्षा

२.  कल्प

३.  व्याकरण

४.  निरुक्त

५.  छंद

६.  ज्योतिष

 

 

 

सहा वेदांगांचे स्वरूप:

शिक्षा :

         शिक्षा या वेदांगाला वेदपुरुषाचे नासिकेंद्रिय म्हटले आहे. सायणाचार्य शिक्षा या संज्ञेचा अर्थ स्पष्ट करताना म्हणतात की, स्वर आणि वर्ण आदींच्या उच्चारण प्रकाराचे शिक्षण किंवा उपदेश जेथे दिला जातो, त्याला शिक्षा असे म्हणतात.

         अर्थात ऋग्वेदादि वेद मंत्रांच्या उच्चारणाचे प्रतिपादन शिक्षा शास्त्रात केले जाते. वेदांच्या समुचित उच्चारणासाठी स्वर ज्ञान अनिवार्य आहे. मुख्यत: स्वर तीन असतात: उदात्त, अनुदात्त आणि स्वरित. यांच्या अयोग्य उच्चारणामुळे शब्दांचे अर्थ बदलू शकतात. अत: सम्यक् उच्चारणाच्या दृष्टीने मार्गदर्शनपर असे काही शिक्षा ग्रंथ आहेत. प्रत्येक वेदाचे असे शिक्षाग्रंथ आहेत.

         या विषयावर अनेक ऋषीमुनींनी ग्रंथ लिहिले आहेत, ज्यांना प्रतिशाख्य आणि शिक्षा असे म्हणतात. महर्षी पाणिनी विरचित शिक्षा विशेष प्रसिद्ध आहे. याच वाङ्मयात विषयानुसरण करणाऱ्या प्रातिशाख्य ग्रंथांचाही समावेश होतो.

 

कल्प:

         कल्प या वेदांगाला वेदपुरुषाचे हस्त म्हटले आहे. कल्पो वेदविहितानां कर्मणमानुपूर्व्येण कल्पनाशास्त्रम् | अर्थात कल्प वेदविहित कर्म, अनुष्ठान यांची क्रमपूर्वक कल्पना करणारे शास्त्र आहे. कल्प शास्त्रात वेदांतील कोणता मंत्र कोणत्या कर्मासाठीसाठी वापरावा, हे सांगितले आहे. श्रौतसूत्र, गृह्यसूत्र आणि धर्मसूत्र या तीन शाखा आहेत. प्रत्येक वेदाचे असे कल्प शास्त्रीय ग्रंथ आहेत.

 

व्याकरण:

         मुखं व्याकरणं स्मृतम् | असे म्हटले जाते. अर्थात व्याकरण हे वेदपुरुषाचे  मुख आहे. व्याकरण महाभाष्य आदि ग्रंथांत व्याकरण अध्ययनाची आवश्यकता सुस्पष्ट प्रतिपादित केली आहे. व्याकरणामुळे प्रकृती आणि प्रत्यय इत्यादींचा संयोग, शब्दांची सिद्धी आणि उदात्त, अनुदात्त आणि स्वरयुक्त स्वरांची स्थिती समजते. वेद आणि शास्त्रांचे प्रयोजन जाणून घेण्यासाठी आणि शब्दांचे अचूक ज्ञान होण्यासाठी त्याचा अभ्यास आवश्यक आहे. रक्षा, ऊह, आगम, लघु, असंदेह अशी व्याकरण अध्ययनाची प्रयोजने सांगितली आहेत.

 

निरुक्त:

        निरुक्तं श्रोत्रमुच्यते | असे म्हटले जाते. अर्थात निरुक्त म्हणजे वेदपुरुषाचे श्रवणेंद्रिय होय. अर्थ ज्ञानात निरपेक्षपणे पदांची व्युत्पत्ती जिथे सांगितली जाते, त्याला निरुक्त असे म्हणतात. निरुक्त गद्य शैलीत लिखित आहे. निघंटूत कठीण शब्दांचे अर्थ आहेत. त्यावरील भाष्य म्हणूनही निरुक्ताकडे पाहणे शक्य आहे.

         एखाद्या शब्दाचा अर्थ करताना त्या शब्दाची व्युत्पत्ती माहित असणे आवश्यक असते. ही व्युत्पत्ती कशी करावी, या संदर्भातील शास्त्रीय ज्ञान आपल्याला निरुक्तातून मिळते. यास्काचार्य विरचित निरुक्त हा ग्रंथ अभ्यासकांमध्ये प्रसिद्ध आणि लोकप्रिय असा ग्रंथ आहे. या ग्रंथात शाकटायन, गार्ग्य, शाकपूणि आदि तज्ज्ञांचे मत यास्काचार्यांनी दिले आहे.   काशिकावृत्तिनुसार, निरुक्ताचे पाच प्रकार आहेत- वर्णागम (अक्षरे वाढवणे), वर्णविपर्यय (अक्षरे पुढे-मागे बदलणे), वर्णाधिकार (अक्षरे बदलणे), नाश (अक्षरे लोप पावणे) आणि धातूचा एक अर्थ सिद्ध करणे.

 

छंद:

        छंद: पादौ तु वेदस्य | अर्थात छंद शास्त्र हे वेदाचे चरण आहेत. वेद मंत्रांच्या उच्चारणासाठी छंद शास्त्र ज्ञात असणे आवश्यक आहे. छंद यास मराठीत आपण वृत्त असेही म्हणतो. संस्कृत साहित्यात छंद हा शब्द साधारणपणे लयीचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. एखाद्या पद्यातील अक्षरांची संख्या आणि स्थान यांच्याशी संबंधित विशिष्ट अर्थ किंवा नियमांना छंद असे म्हटले जाते. यात वर्ण लघु आहेत की, गुरु त्यांना देखील महत्व असते. वेदात गायत्री, जगती इत्यादी छंद आढळून येतात. पिंगलाचार्याचे छंद:सूत्र हा प्रस्तुत विषया वरील महत्वपूर्ण आणि प्रामाणिक ग्रंथ मानला जातो.

 

ज्योतिष

         ज्योतिषामयनं चक्षु: | अर्थात ज्योतिष हे वेदपुरुषाचे नेत्र आहेत, असे म्हटले जाते. वैदिक कर्म किंवा अनुष्ठान संपन्न करताना ते योग्य समयी होणे आवश्यक असते. अमुक कर्मासाठी सुयोग्य समय कोणता, हे ज्योतिष शास्त्रामुळे कळते. या बाबतीत

वेदा हि यज्ञार्थमभिप्रवृत्ताः कालानुपूर्वा विहिताश्च यज्ञाः।

तस्मादिदं कालविधानशास्त्रं यो ज्योतिषं वेद स वेद यज्ञान् ॥

हा श्लोक प्रसिद्ध आहे. चारही वेदांचे ज्योतिष शास्त्र असावेत, असे मत अभ्यासक मांडतात. सामवेदाचे ज्योतिष शास्त्र आज उपलब्ध नाही. तीन वेदांची ज्योतिष शास्त्रे उपलब्ध आहेत, ती पुढील प्रमाणे,

(१) ऋग्वेद ज्योतिष शास्त्र - आर्चज्योतिषम् : ३६ पद्य

(२) यजुर्वेद ज्योतिष शास्त्र – याजुषज्योतिषम् : ४४ पद्य

(३) अथर्ववेद ज्योतिष शास्त्र – आथर्वणज्योतिषम् : १६२ पद्य

 

         एकंदर वैदिक साहित्याच्या अभ्यासात सहा शास्त्रांच्या अभ्यासाचे महत्व आत्यंतिक अशा स्वरूपाचे आहे. “वेद-शास्त्र-संपन्न” हे बिरूद वेद आणि प्रस्तुत सहा शास्त्रांच्या संपन्नतेला ध्वनित करणारे आहे.

इति लेखनसीमा !

        

केनोपनिषद आख्यान

 

केनोपनिषद आख्यान

डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर

 

         विविध उपनिषदांमध्ये ब्रह्मज्ञान वर्णिले आहे. मात्र बहुतेक उपनिषदांत ब्रह्मज्ञान वर्णन करताना त्या संबंधित एखादे आख्यान म्हणजे कथा येते. केनोपनिषदातील हे आख्यान उमा हैमवती आख्यान म्हणून देखील प्रसिद्ध आहे. उपनिषदांची ही आख्यान शैली ध्यानी घेण्यासाठी प्रस्तुत आख्यान महत्वाचे ठरते. त्या आख्यानाचा सारांश पुढीलप्रमाणे-

         एकदा देव आणि असुर यांचा संघर्ष झाला. यात परमात्म्याच्या कृपेने देवांचा विजय झाला. त्यामुळे देवांची सर्वत्र प्रशंसा होऊ लागली. त्यामुळे देवतांना गर्व झाला आणि हा विजय आमच्यामुळेच झाला, असे ते म्हणू लागले. वास्तवात ज्याच्या इच्छेविना झाडाचे पानही हलत नाही, त्या परमात्म्याला देवांनी विसरायला नको होते.

         परमात्म्याने विचार केला की, देवांचे गर्वहरण आवश्यक आहे. म्हणून त्यांनी एखाद्या यक्षासारखे रूप घेतले. त्यांचे ते रूप पाहून देव आश्चर्यचकित झाले. देवतांनी या अद्भुत व्यक्तिमत्वाचा ठाव घेण्याची विनंती अग्निदेवाकडे केली. अग्निदेव त्या यक्षरूप परमात्म्याकडे गेले. त्याचे तेज साक्षात अग्निलाच सहन होई ना. परमात्म्याने स्वत:च अग्नीला त्याचा परिचय विचारला. तेव्हा अग्नीने मी जातवेदस आहे. माझे सामर्थ्य असे आहे की, मी विश्वातील कोणतीही वस्तू जाळू शकतो. तेव्हा परमात्म्याने विचार केला की, आता याचे गर्व हरण करू या. परमात्म्याने अग्नीमधील आपली शक्ती काढून घेतली. आणि त्यःच्या समोर एका वाळलेल्या गवताची काडी टाकली. आणि त्या काडीला जाळण्यास सांगितले. परंतु ब्रह्मशक्तीविहीन अग्नी त्या गवताच्या काडीला जाळू शकला नाही.

         त्या नंतर देवांनी परमात्म्याच्या यक्ष रूपाच्या शोधासाठी वायूला पाठविले. पण वायूची स्थिती देखील अग्नीप्रमाणे झाली. तो त्या काडीला जागचे हालवू शकला नाही.

         तेव्हा सर्व देवतांनी आपला राजा जो इंद्र, त्याला विनंती केली की, आता आपण स्वत: यक्ष रूपाच्या शोधासाठी जावे.  इंद्र त्या यक्षाच्या जवळ गेले. तेव्हा इंद्राच्या गर्वाचे हरण करण्यासाठी यक्ष तेथून गुप्त झाले. ते इंद्राशी बोलले देखील नाहीत. इंद्राने हार मानली नाही. ते ध्यान करू लागले. इतक्यात त्यांनी पाहिले की, अंतराळात सर्व प्रकारच्या अलंकारांनी विभूषित, हिमवानकन्यका देवी पार्वती उमा उपस्थित आहे. देवी पार्वतीच्या दर्शनाने इंद्राला आनंद झाला त्यांनी विचार केला की, देवी पार्वती नित्य ज्ञानबोधस्वरूप अशा भगवान महादेवांच्या समवेत असतात. त्यांना त्या यक्षाविषयी अवश्य माहित असेल. त्यांनी अत्यंत विनम्रतेने देवी पार्वती मातेला विचारले की, हे माते, आत्ता जे यक्ष आम्हा देवतांना दर्शन देऊन अंतर्धान झाले, ते कोण आहेत?

तेव्हा देवी उमा (माता पार्वती) म्हणाली की, तो यक्ष म्हणजे साक्षात ब्रह्म होते. त्या ब्रह्माच्या शक्तीमुळे देवांनी असुरांवर विजय मिळविला. तुम्ही केवळ निमित्तमात्र आहात. तुम्ही हा विजय स्वत:चा मानता, हा मिथ्या अभिमान आहे. त्याचा त्याग करा. आणि समजून घ्या की, जे काही होते, ते परब्रह्माच्या सत्तेने होते. यानंतर माता उमेने इंद्राला ब्रह्मज्ञान दिले.

         परब्रह्म तत्त्व हे इंद्रियांचा विषय होऊ शकत नाहीत. त्यांच्या पर्यंत वाणी पोचू शकत नाही. दृष्टी पोचू शकत नाही.

न तत्र चक्षुर्गच्छति न वाग्गच्छति नो मनो
न विद्मो न विजानीमो यथैतदनुशिष्यात्।
अन्यदेव तद्विदितादथो अविदितादधि।
इति शुश्रुम पूर्वेषां ये नस्तद्व्याचचक्षिरे ॥

पुढे असे वर्णन येते की,

यद्वाचानभ्युदितं येन वागभ्युद्यते।
तदेव ब्रह्म त्वं विद्धि नेदं यदिदमुपासते ॥

         अर्थात ते परब्रह्म वाणीमुळे अभिव्यक्त होत नाही, तर वाणी त्या परब्रह्म तत्त्वामुळे अभिव्यक्त होते. असेच मन इत्यादींच्या बाबतीत आहे. चक्षु, श्रोत्र, प्राण यांचेही असेच आहे. अर्थात ते परब्रह्म तत्त्व सर्व जगताचे कारण आहे.

         पुढे अत्यंत सुंदर शब्दांत वर्णन येते की,

प्रतिबोधविदितं मतममृतत्वं हि विन्दते।
आत्मना विन्दते वीर्यं विद्यया विन्दतेऽमृतम्‌ ॥    

         अर्थात ब्रह्मविद्ये मुळे व्यक्ती अमृत प्राप्त करते.

         अर्थात ब्रह्माचे स्वरूप सच्चिदानंद असे आहे. ब्रह्मबोध झाल्या नंतर व्यक्तीचा जन्म मरण फेरा चुकतो. व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो. व्यक्तीला त्रिकालाबाधित असा आनंद प्राप्त होतो.

         एकंदरच उपनिषदीय आख्यानांत परब्रह्म तत्त्वाचे सुंदर असे व्याख्यान केलेले आपल्याला दिसून येते. अहंकार हा आपण आणि परमात्मा यांच्या मधील सर्वात मोठा अडथळा आहे, असे म्हणता येणे शक्य आहे. वास्तविक आपण  परब्रह्म तत्त्वापासून वेगळे नाहीत. पण देहाचा अभिमान आणि प्राप्त भौतिक पदार्थांच्या विषयीचा आपला कर्तृत्वभाव आणि अहंकार या मुळे आपण परब्रह्म तत्त्वापासून दूर जातो.

         इति लेखनसीमा.

Tuesday, May 9, 2023

कृतार्थ जीवनाची भारतीय संकल्पना

 


कृतार्थ जीवनाची भारतीय संकल्पना

भारतीय लोक कृतार्थ जीवन कशाला म्हणतात? जीवनाच्या कृतार्थतेची लक्षणे कोणती? अवश्य वाचा, परीक्षण करा. पटले, तर शेअर करा.


अनायासेन मरणं, विना दैन्येन जीवनम् । 

देहान्ते तव स्मरणं, देहि मे परमेश्वर ||

कृतार्थ जीवनाची ही भारतीय संकल्पना आहे. जीवन दैन्याविना व्यतीत करता यावे. कोणत्याही रोग किंवा व्याधी यांच्या शिवाय मरण यावे आणि मरताना परमेश्वराचे स्मरण असावे, अशी प्रार्थना या श्लोकात करण्यात आली आहे. 


अनायासेन मरणम् :

अर्थात कष्टाशिवाय मरण. स्वर्ग किंवा नरक याविषयी अनेकदा आपण ऐकतो. परंतु एखाद्या व्याधीग्रस्त माणसाला विचारले, तर तो सांगेल की, आरोग्य हा स्वर्ग आहे. आणि अनारोग्य म्हणजे रोगपीडा या नरक यातना आहेत. आरोग्य संपन्न व्यक्ती आरोग्याचे जेवढे महत्व जाणतो, त्यापेक्षा आरोग्याचे महत्व एखादी व्याधीग्रस्त व्यक्ती तुम्हाला सांगू शकेल. अशा प्रकारच्या कोणत्याही व्याधीशिवाय मरण यावे, अशी प्रार्थना या श्लोकात करण्यात आली आहे.


विना दैन्येन जीवनम् :

दैन्य म्हणजे दुर्बलता. ही दुर्बलता आर्थिक असू शकते. शारीरिक असू शकते. सामाजिक असू शकते. आर्थिक चणचण हा दैन्याचा भाग आहे, तसेच तुम्ही कितीही यशस्वी झालात, तरी तुमचे कौतुक करणारे लोक नसणे किंवा संख्येने कमी असणे, हा दैन्याचा भाग आहे. तुम्हाला सतत एखाद्या व्यक्तींचा व्यक्ती-समूहाचा द्वेष करावा लागणे, हा सुद्धा वैचारिक म्हणा किंवा मानसिक दैन्याचा भाग आहे. अशा दैन्याशिवाय जीवन जगता यावे, अशी प्रार्थना या श्लोकात करण्यात आली आहे. महाभारतात दुर्योधनाकडे आर्थिक दैन्य नव्हते, पण तो पांडूपुत्रसमूहाचा म्हणजे पांडवांचा द्वेष करीत असल्याचे दिसून येते. म्हणजे त्याच्याकडे बंधुभावाच्या अभावाच्या विषयक दैन्य होते, असे म्हणता येईल.


देहान्ते तव स्मरणम् :

देह सोडताना परमेश्वराचे स्मरण घडून आले पाहिजे. मात्र ही गोष्ट तेवढी सोपी नाही. आयुष्यभर ज्या चांगल्या किंवा वाईट गोष्टीचा ध्यास तुम्ही घेतला आहे, त्याचेच स्मरण तुम्हाला अंतकाळी घडणार आहे. म्हणून आयुष्यात निरंतर नामस्मरण केले, तरच अंतकाळी भगवंतांचे स्मरण घडून येईल. अन्यथा पुढच्या पिढीविषयी चिंता, काळजी करीत असताना किंवा अप्राप्त विषयाबद्दलच्या असमाधानी अवस्थेत प्राण पाखरू उडून जाऊ शकते. सारांशत: एक कृतार्थता अंतिम समयी असली पाहिजे, अशी प्रार्थना या श्लोकात करण्यात आली आहे. 


देहि मे परमेश्वर :

कष्टाशिवाय मरण, दैन्याशिवाय जीवन, देह सोडताना परमेश्वराचे स्मरण या तीनही गोष्टी प्राप्त करणे म्हणजे खऱ्या अर्थाने कृतार्थ जीवनाची संकल्पना साकार होणे आहे. या तीनही गोष्टी प्राप्त करण्यासाठी निरंतर प्रयत्न आवश्यक आहेत. अशा प्रकारचे प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना परमेश्वराचे कृपाशीर्वाद असणे आवश्यक आहे. म्हणून या तीनही गोष्टी परमेश्वराने आपल्याला द्याव्यात, अशी प्रार्थना या श्लोकात करण्यात आली आहे. 

इति लेखनसीमा!


(पोस्ट आवडल्यास forward किंवा कॉपी पेस्ट करून पुढे पाठवू शकता.)

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...