वेदांग म्हणजे काय?
डॉ. चंद्रहास शास्त्री
सोनपेठकर
वेदांग
म्हणजे वेदांचे अंग. वेदपुरुषाची संकल्पना अशी आहे की, सहा शास्त्रे ही त्याची सहा
अंगे आहेत. अङ्ग्यन्ते ज्ञायन्ते
अमीभिरिति अङ्गानि | म्हणजे ज्यांच्या द्वारे वेदांच्या अर्थज्ञानाची प्रक्रिया
सुलभ होते, त्यांना वेदांचे अंग असे म्हणतात.
छन्दः पादौ तु वेदस्य
हस्तौ कल्पोऽथ पठ्यते
ज्योतिषामयनं
चक्षुर्निरुक्तं श्रोत्रमुच्यते ।
शिक्षा घ्राणं तु वेदस्य
मुखं व्याकरणं स्मृतम्
तस्मात्सांगमधीत्यैव
ब्रह्मलोके महीयते ॥
या श्लोकात सहा वेदांगांचे नामाभिधान आणि
वेदपुरुषाच्या बाबतीत त्या वेदांगांची स्थाने स्पष्ट करण्यात आली आहेत.
सहा वेदांगांची नावे:
१. शिक्षा
२. कल्प
३. व्याकरण
४. निरुक्त
५. छंद
६. ज्योतिष
सहा वेदांगांचे स्वरूप:
शिक्षा :
शिक्षा
या वेदांगाला वेदपुरुषाचे नासिकेंद्रिय म्हटले आहे. सायणाचार्य शिक्षा या संज्ञेचा
अर्थ स्पष्ट करताना म्हणतात की, स्वर आणि वर्ण आदींच्या उच्चारण प्रकाराचे शिक्षण किंवा
उपदेश जेथे दिला जातो, त्याला शिक्षा असे म्हणतात.
अर्थात
ऋग्वेदादि वेद मंत्रांच्या उच्चारणाचे प्रतिपादन शिक्षा शास्त्रात केले जाते.
वेदांच्या समुचित उच्चारणासाठी स्वर ज्ञान अनिवार्य आहे. मुख्यत: स्वर तीन असतात:
उदात्त, अनुदात्त आणि स्वरित. यांच्या अयोग्य उच्चारणामुळे शब्दांचे अर्थ बदलू
शकतात. अत: सम्यक् उच्चारणाच्या दृष्टीने मार्गदर्शनपर असे काही शिक्षा ग्रंथ आहेत.
प्रत्येक वेदाचे असे शिक्षाग्रंथ आहेत.
या
विषयावर अनेक ऋषीमुनींनी ग्रंथ लिहिले आहेत, ज्यांना
प्रतिशाख्य आणि शिक्षा असे म्हणतात. महर्षी पाणिनी विरचित शिक्षा विशेष
प्रसिद्ध आहे. याच वाङ्मयात विषयानुसरण करणाऱ्या प्रातिशाख्य ग्रंथांचाही समावेश होतो.
कल्प:
कल्प
या वेदांगाला वेदपुरुषाचे हस्त म्हटले आहे. कल्पो वेदविहितानां
कर्मणमानुपूर्व्येण कल्पनाशास्त्रम् | अर्थात कल्प वेदविहित कर्म, अनुष्ठान यांची
क्रमपूर्वक कल्पना करणारे शास्त्र आहे. कल्प शास्त्रात वेदांतील कोणता मंत्र
कोणत्या कर्मासाठीसाठी वापरावा, हे सांगितले आहे. श्रौतसूत्र, गृह्यसूत्र आणि
धर्मसूत्र या तीन शाखा आहेत. प्रत्येक वेदाचे असे कल्प शास्त्रीय ग्रंथ आहेत.
व्याकरण:
मुखं
व्याकरणं स्मृतम् | असे म्हटले जाते. अर्थात व्याकरण हे वेदपुरुषाचे मुख आहे. व्याकरण महाभाष्य आदि ग्रंथांत
व्याकरण अध्ययनाची आवश्यकता सुस्पष्ट प्रतिपादित केली आहे. व्याकरणामुळे प्रकृती आणि प्रत्यय इत्यादींचा संयोग, शब्दांची सिद्धी
आणि उदात्त, अनुदात्त आणि स्वरयुक्त स्वरांची स्थिती समजते. वेद आणि
शास्त्रांचे प्रयोजन जाणून घेण्यासाठी आणि शब्दांचे अचूक ज्ञान होण्यासाठी त्याचा
अभ्यास आवश्यक आहे. रक्षा, ऊह, आगम, लघु, असंदेह अशी व्याकरण अध्ययनाची प्रयोजने
सांगितली आहेत.
निरुक्त:
निरुक्तं
श्रोत्रमुच्यते | असे म्हटले जाते. अर्थात
निरुक्त म्हणजे वेदपुरुषाचे श्रवणेंद्रिय होय. अर्थ ज्ञानात निरपेक्षपणे पदांची
व्युत्पत्ती जिथे सांगितली जाते, त्याला निरुक्त असे म्हणतात. निरुक्त गद्य शैलीत
लिखित आहे. निघंटूत कठीण शब्दांचे अर्थ आहेत. त्यावरील भाष्य म्हणूनही निरुक्ताकडे
पाहणे शक्य आहे.
एखाद्या
शब्दाचा अर्थ करताना त्या शब्दाची व्युत्पत्ती माहित असणे आवश्यक असते. ही
व्युत्पत्ती कशी करावी, या संदर्भातील शास्त्रीय ज्ञान आपल्याला निरुक्तातून
मिळते. यास्काचार्य विरचित निरुक्त हा ग्रंथ अभ्यासकांमध्ये प्रसिद्ध आणि लोकप्रिय
असा ग्रंथ आहे. या ग्रंथात शाकटायन, गार्ग्य, शाकपूणि आदि
तज्ज्ञांचे मत यास्काचार्यांनी दिले आहे. काशिकावृत्तिनुसार, निरुक्ताचे पाच
प्रकार आहेत- वर्णागम (अक्षरे वाढवणे), वर्णविपर्यय
(अक्षरे पुढे-मागे बदलणे), वर्णाधिकार (अक्षरे बदलणे), नाश (अक्षरे लोप
पावणे) आणि धातूचा एक अर्थ सिद्ध करणे.
छंद:
छंद:
पादौ तु वेदस्य | अर्थात छंद शास्त्र हे
वेदाचे चरण आहेत. वेद मंत्रांच्या उच्चारणासाठी छंद शास्त्र ज्ञात असणे आवश्यक
आहे. छंद यास मराठीत आपण वृत्त असेही म्हणतो. संस्कृत साहित्यात छंद हा शब्द
साधारणपणे लयीचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. एखाद्या पद्यातील अक्षरांची संख्या
आणि स्थान यांच्याशी संबंधित विशिष्ट अर्थ किंवा नियमांना छंद असे म्हटले जाते.
यात वर्ण लघु आहेत की, गुरु त्यांना देखील महत्व असते. वेदात गायत्री, जगती
इत्यादी छंद आढळून येतात. पिंगलाचार्याचे छंद:सूत्र हा प्रस्तुत विषया वरील
महत्वपूर्ण आणि प्रामाणिक ग्रंथ मानला जातो.
ज्योतिष
ज्योतिषामयनं
चक्षु: | अर्थात ज्योतिष हे वेदपुरुषाचे
नेत्र आहेत, असे म्हटले जाते. वैदिक कर्म किंवा अनुष्ठान संपन्न करताना ते योग्य
समयी होणे आवश्यक असते. अमुक कर्मासाठी सुयोग्य समय कोणता, हे ज्योतिष
शास्त्रामुळे कळते. या बाबतीत
वेदा हि
यज्ञार्थमभिप्रवृत्ताः कालानुपूर्वा विहिताश्च यज्ञाः।
तस्मादिदं
कालविधानशास्त्रं यो ज्योतिषं वेद स वेद यज्ञान् ॥
हा श्लोक प्रसिद्ध आहे. चारही वेदांचे ज्योतिष
शास्त्र असावेत, असे मत अभ्यासक मांडतात. सामवेदाचे ज्योतिष शास्त्र आज उपलब्ध
नाही. तीन वेदांची ज्योतिष शास्त्रे उपलब्ध आहेत, ती पुढील प्रमाणे,
(१) ऋग्वेद ज्योतिष शास्त्र - आर्चज्योतिषम् : ३६ पद्य
(२) यजुर्वेद ज्योतिष शास्त्र – याजुषज्योतिषम् : ४४ पद्य
(३) अथर्ववेद ज्योतिष शास्त्र – आथर्वणज्योतिषम् : १६२ पद्य
एकंदर
वैदिक साहित्याच्या अभ्यासात सहा शास्त्रांच्या अभ्यासाचे महत्व आत्यंतिक अशा
स्वरूपाचे आहे. “वेद-शास्त्र-संपन्न” हे बिरूद वेद आणि प्रस्तुत सहा
शास्त्रांच्या संपन्नतेला ध्वनित करणारे आहे.
इति लेखनसीमा !
No comments:
Post a Comment