Saturday, March 11, 2023

 


संस्कृत साहित्य परिचय

- डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर

 


संस्कृत साहित्य हे व्यापक आहे, सर्वस्पर्शी आहे, असे आपण म्हणतो. अनेकदा ऐकतो. त्याविषयी आदरभाव देखील व्यक्त करतो. संस्कृत साहित्य कसे व्यापक आहे किंवा कसे सर्वस्पर्शी आहे? हे जाणून घेणे म्हणूनच महत्वपूर्ण ठरते. या पार्श्वभूमीवर संस्कृत साहित्याचा धावता परिचय अभिव्यक्त करणारे सदर आजपासून दर रविवारी प्रकाशित करीत आहोत. हे सदर खास दै. राष्ट्रसंचारच्या वाचकांसाठी सुप्रसिद्ध प्रवचनकार, संस्कृत अभ्यासक डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर लिहिणार आहेत.

- संपादक  

 

          संस्कृत साहित्य हे विश्वातील एक व्यापक आणि विस्तृत अशा प्रकारचे साहित्य आहे. या साहित्यात प्राचीन कालीन वेद, उपनिषद आहेत. या साहित्यात व्याकरणकार पाणिनी, महाभाश्याकार पतंजली आदींचे साहित्य आहे. वेदांत इत्यादी दर्शन साहित्य आहे. पौराणिक ग्रंथ आहेत. आदि शंकराचार्य, निम्बार्काचार्य इत्यादी आचार्यांचे भाष्य वाङ्मय आहे. शिल्पशास्त्र, नाट्यशास्त्र आहे. कालिदास, भास अशा अनेक सिद्धहस्त आणि प्रतिभासंपन्न कवींची नाटके, खंडकाव्ये, महाकाव्ये आहेत. एकंदरच संस्कृत साहित्याची व्याप्ती ही मानवी जीवनाचे आकाश भरून टाकणारी अशी आहे.

          काही अभ्यासक संस्कृत साहित्याचे वर्गीकरण यातील साहित्यप्रकारानुसार करतात. तर काही अभ्यासक वैदिक आणि लौकिक असे वर्गीकरण करतात. प्रस्तुत सदरात आपण क्रमश: वेद, उपनिषद, वेदांग, पुराण, दर्शन, विविध शास्त्र, काव्य असे विवेचन करणार आहोत.

          वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलों ।   असे महावैष्णव कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबाराय म्हणतात. अर्थात सर्व आस्तिक दर्शनांनी वेद प्रामाण्य मानले आहे. ऋग्वेद हा जगातील आद्य साहित्याचा भाग असल्याचे देखील बहुतेक विद्वान मानतात.

          वेदातील ज्ञान हे त्रिकालाबाधित असे आहे. अत: वेदांचा रचनाकार कोणी नाही. तर वेदातील ज्ञानाचा साक्षात्कार ऋषींना झाला. वेद हे अपौरुषेय आहेत. अशी मान्यता श्रद्धावंतांची आहे.

अनादिनिधना नित्या वागुत्सृष्टा स्वयम्भुवा ।
आदौ वेदमयी विद्या यतः सर्वा: प्रवृत्तयः ॥

अशा शब्दांत महाभारतकार व्यासमुनींनी वेदांचे नित्यत्व प्रतिपादन केले आहे.

          वेद शब्दाचा अर्थ ज्ञान असा होतो. ‘विद’ या ज्ञानार्थक धातूला घञ् प्रत्यय जोडून वेद हा शब्द सिद्ध होतो. त्याचा अर्थ ज्ञान असा होतो. विदलृ लाभे या धातूला घञ् प्रत्यय जोडून सुद्धा वेद शब्द तयार होतो. त्याचा अर्थधर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ प्राप्त करून देणारे ज्ञान असाही केला जातो. श्रीमद्भागवताच्या तृतीय स्कंधात सृष्टीरचनेच्या प्रसंगी विधाता वेदांच्या निर्देशानुसार सृष्टी रचना करतात, असे वर्णन येते.

          अर्थात वेद शब्दाचा समन्वय हा ज्ञान, नित्यता आणि पुरुषार्थसिद्धी यांचेशी असल्याचे दिसून येते. वेद राशीचे चार भाग त्यातील वर्ण्य विषयांनुसार केले जातात. ते असे,

१. संहिता - यज्ञनुष्ठानामध्ये उपयुक्त मंत्रांचा यात समावेश होतो.

२. ब्राह्मण-ग्रंथ – यज्ञनुष्ठानप्रसंगी प्रयुक्त मंत्रांच्या विधींचे गद्य स्पष्टीकरण यात येते. वैदिक मंत्रांना देखील ब्रह्म अशी संज्ञा आहे. म्हणून या मंत्रांविषयी अधिक माहिती सांगणारे जे वाङ्मय त्यास ब्राह्मण अशी संज्ञा आहे. शतपथ, ऐतरेय आदी ब्राह्मण ग्रंथ प्रसिद्ध आहेत.

३. आरण्यक – सृष्टीतत्त्वान्वेषण हा आरण्यकांचा मुख्य विषय मानला जातो. अरण्ये भवम् आरण्यकम् | असे म्हटले जाते. अर्थात आरण्यकांचे पाठ अरण्यात म्हणजे वानप्रस्थी जन करत असावेत. कर्मकांडीय यज्ञ म्हणजे संहिता आणि ब्राह्मण आणि ज्ञानयज्ञ म्हणजे उपनिषद यांच्यातील दुवा म्हणून अभ्यासक आरण्यक वाङ्मयाकडे पाहतात. यात वैदिक यज्ञांचे दार्शनिक, आध्यत्मिक वर्णन आहे. ऐतरेय, शांखायन, तैत्तिरीय, बृहदारण्यक, तवलकार इत्यादी आरण्यक प्रसिद्ध आहेत.  

४. उपनिषद – ब्रह्म, माया आणि ईश्वर, अविद्या, विद्या, आत्मा आणि जगत यांचे तात्त्विक वर्णन यात येते. उपनिषदे ही वेदाच्या अंती म्हणजे शेवटी येतात. म्हणून त्यांना वेदांत असेही म्हणतात. उपनिषदांचा फार मोठा प्रभाव हा भारतीय तत्त्वज्ञानावर दिसून येतो. वेदांताच्या प्रस्थानत्रयीमध्ये देखील उपनिषदांचा समावेश होतो. ईश, केन, कठ इत्यादी उपनिषदे प्रसिद्ध

आहेत.

          असे सांगितले जाते की, पूर्वी ही वेदराशी एकच होती. परंतु मानवाची परिमितता ध्यानी घेऊन व्यासांनी या वेदराशीचे चार भाग केले. आणि ते चार भाग आपल्या चार शिष्यांना शिकविले. पैल, वैशंपायन, जैमिनी आणि सुमन्तु हे ते चार शिष्य होत, असे वर्णन काही ठिकाणी आढळते.  ते चार भाग म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे होत. यांचा परिचय पुढील भागात......

क्रमश:

(दै. राष्ट्रसंचार, दि. १२/०३/२०२३)

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...