Sunday, March 26, 2023

नितांत सुंदर सूक्तांनी युक्त ऋग्वेद

 

संस्कृत साहित्य परिचय लेखांक २

नितांत सुंदर सूक्तांनी युक्त ऋग्वेद

डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर

       

        पैल ऋषींपासून ऋग्वेद अध्ययनाची परंपरा सुरु होते. सनातन वैदिक परंपरेत ऋग्वेदास आद्य ग्रंथ मानले जाते. ऋग्भि: स्तुवन्ति | अर्थात ऋग्वेदात विविध देवतांची स्तुतीपरक सूक्ते येतात. अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् । होतारं रत्नधातमम् ॥ हा ऋग्वेदाचा प्रथम मंत्र मानण्यात येतो. तर समानी व आकूति: समाना ह्रदयानि : । समानमस्तु वो मनो यथा : सुसहासति ॥ हा ऋग्वेदाच्या शाकल शाखेनुसार ऋग्वेदाचा अंतिम मंत्र मानण्यात येतो.

 

ऋग्वेदाची संरचना (Structure):

        ऋग्वेदाची संरचना समजून घेताना मंडल क्रम किंवा अष्टक क्रम मानला जातो. यात १० मंडल, ८ अष्टक, ६४ अध्याय, २००६ वर्ग, १००० हून अधिक सूक्त, १०,४४४ ऋचा आहेत, असे ढोबळमानाने सांगितले जाते. प्रत्यक्ष संख्येबाबत विद्वानांत मतवैविध्य आढळते. मंडलातील सूक्तांची संख्या प्रथम मंडलात १९१, द्वितीय मंडलात ४३, तृतीय मंडलात ६२, चतुर्थ मंडलात ५८, पंचम मंडलात ८७, षष्ठ मंडलात ७५, सप्तम मंडलात १०४, अष्टम मंडलात  १०३, नवम मंडलात ११४ आणि दशम मंडलात १९१ अशी मिळते. या अतिरिक्त ११ सुक्तांना बालखिल्य म्हणून ओळखले जाते.

 

ऋग्वेदाच्या प्रमुख शाखा:

        ऋग्वेदाच्या एकूण २१ शाखा असल्याचे उल्लेख प्राचीन ग्रंथांत आढळतात. तथापि आज प्रमुख पाच शाखा उपलब्ध आणि प्रसिद्ध आहेत. त्या पुढीलप्रमाणे-

१. शाकल, २. वाष्कल, ३. आश्वलायन, ४. शांखायन ५. माण्डूकायन

 

 

ऋग्वेदाचे ऋषी:

        वैदिक मंत्रांचा ज्यांना साक्षात्कार झाला, त्यांना ऋषी असे म्हणतात. साक्षात्कृत धर्माण ऋषयो बभूवु: । किंवा मन्त्रद्रष्टार: ऋषयः | अशा ऋषी शब्दाच्या व्याख्या शास्त्र ग्रंथांत आढळतात. यस्य वाक्यं स ऋषि: | अशी देखील व्याख्या सांगण्यात येते. गृत्समद, विश्वामित्र, वसिष्ठ आदि ऋषी आणि लोपामुद्राघोषाशची आदि ऋषिका यांचा संबंध ऋग्वेदाशी आहे.

 

ऋग्वेदाचे भाष्यकार:

        आपल्या ज्ञान परंपरेत भाष्य ग्रंथांचे मोठे योगदान आहे. वेद मंत्रांचा अर्थ कसा करावा, शब्दांची व्युत्पत्ती कशी लक्षात घ्यावी, यासाठी यास्काचार्यांनी निरुक्त नामक ग्रंथाची रचना केली. वेद मंत्रांच्या अर्थाविषयी प्राचीन काळापासून विद्वानांत चर्चा होत असे. स्कंदस्वामी, माधवभट्ट, वेंकटमाधव, धानुष्कयज्वा, आनंदतीर्थ, सायणाचार्य, महर्षी दयानंद सरस्वती अशी ऋग्वेदभाष्यकरांची श्रेष्ठ परंपरा दिसून येते.

 

ऋग्वेदातील छंद:

        ४४ अक्षरांचा त्रिष्टुप छंद, २४ अक्षरांचा गायत्री छंद आणि ४८ अक्षरांच्या जगती छंदांचे आधिक्य ऋग्वेदात दिसून येते. चार पाद, दोन पाद आणि तीन पादांनी युक्त मंत्र ऋग्वेदात आहेत.

 

ऋग्वेदीय सूक्तांचे विषय:

        ऋग्वेदात अनेकविध देवतांच्या स्तुतीसाठी विविध सूक्ते आहेत. त्याच प्रमाणे अन्य विषयांवर देखील सूक्ते आहेत. सवितृ, अग्नी, इंद्र, वरुण, उषा इत्यादी देवतांचे वर्णन करणारी सूक्ते आहेत. ऋग्वेदातील नासदीय सूक्त परब्रह्माचे तात्त्विक वर्णन करणारे आहे. भगवान विष्णूंच्या स्तुत्यर्थ ज्याचे पठन केले जाते, ते पुरुषसूक्त ऋग्वेदात आहे. श्रीसूक्त हा ऋग्वेदाच्या खिलसूक्ताचा भाग मानण्यात येतो. यात विश्वामित्र नदी इत्यादी संवाद सूक्ते देखील आहेत. श्रद्धा, मन्यु अशा भावात्मक देवतांचीही सूक्ते यात आहेत. एकंदर देवता स्तुती, संवाद, कथा, दानस्तुती, तत्त्वज्ञान, इत्यादी विषयवस्तू ऋग्वेद संहितेची आहे, असे म्हणता येईल.

 

यज्ञ आणि ऋग्वेद:

        होतृगण यज्ञप्रसंगी ऋग्वेदातील सूक्तांच्या द्वारे देवतांची स्तुती करतात. ऋग्वेदाच्या ऋत्विजास होता असे संबोधण्यात येते. होता, मैत्रावरूण, अच्छावाक आणि ग्राववस्तू हे चार ऋत्विज या संबंधित आहेत.

 

ऋग्वेदाच्या संबंधित ग्रंथ:

        संहिता, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यक आणि उपनिषद असे चार भाग वेदाचे विषयवस्तूस अनुसरून होतात. त्यांचे वर्णन मागील लेखात आले आहे. ऋग्वेदाच्या संहितेच्या संबंधित ब्राह्मण ग्रंथांत ऐतरेय आणि शांखायन ब्राह्मण ग्रंथांचा समावेश होतो. ऋग्वेदाच्या संबंधित आरण्यक ग्रंथांची नावे देखील ऐतरेय आणि शांखायन अशीच आहेत. ऐतरेय, कौषीतकी आणि बाष्कल ही ऋग्वेदाच्या संबंधित उपनिषदांची नावे आहेत. या शिवाय ऋग्वेदाच्या संबंधित शिक्षा ग्रंथांत पाणिनीय शिक्षा आणि ऋक् प्रातिशाख्य यांचा समावेश होतो.

 

ऋग्वेदाचे कालनिर्णय:

        यद्यपि श्रद्धावान आणि सनातन मतावलंबी वेद अपौरुषेय आणि नित्य सनातन असल्याचे मानतात तथापि काही पाश्चात्य किंवा आधुनिक विचारवंत यांनी ऋग्वेदाचा काळ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यात Max-Muller, Weber, Winternitz, Jacoby आणि लोकमान्य टिळक यांचे योगदान आहे. बहुतेक विचारवंतांनी ऋग्वेदाचा काळ हा इसवी सनाच्या पूर्वीचा आहे, हे मान्य केले आहे.

 

        एकंदरच ऋग्वेदास विश्वातील आद्य अक्षर वाङ्मय मानले जाते. यातील मंत्रांना ऋचा असे म्हणतात. यात विविध देवता, भावात्मक देवता यांच्या स्तुती करणाऱ्या सूक्तांचा समावेश होतो. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, स्तुती या शब्दाचा अर्थ “यथार्थ वर्णन” असा स्वीकारण्यात आला आहे. वेदक्रमांत ऋग्वेदानंतर यजुर्वेदाचा समावेश होतो. तर यजुर्वेदाची माहिती पुढील लेखात ......

               

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...