Monday, November 1, 2021

वैदिकसाहित्यातील गौ-वर्णन

 

वैदिकसाहित्यातील गौ-वर्णन

- डॉ. चंद्रहासशास्त्री सोनपेठकर

               हिंदु संस्कृतीमध्ये गायीचे महत्व असाधारण आहे. पुराणांमध्ये पृथ्वीचे देखील धेनुरूपात वर्णन करण्यात आले आहे. वेदातही अनेक ठिकाणी गायींचे वर्णन आहे. उपनिषदांतही गायींचे वर्णन येते. हिंदु संस्कृतीतील अनेक सण-उत्सव यांत गोवंशाचे महत्व आहे. ‘गो-ग्रास’ म्हणजे गायीचा घास हा तर हिंदुसमाजाच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. आजही अनेक घरांमध्ये दररोज स्वयंपाक करताना गो-ग्रास तयार केला जातो.

        ऋग्वेदाच्या आठव्या मंडलातील एकशे एक व्या सूक्तात पंधराव्या ऋचेत व पारस्कर गृह्य सूत्रात वर्णन येते की,

               माता रुद्राणां दुहिता वसूनां स्वसादित्यानाममृतस्य नाभिः।

           प्र नु वोचं चिकितुषे जनाय मा गामनागामदितिं वधिष्ट।। पा. गृ. सू. 1-3-27

अर्थात गाय ही रुद्रांची माता आहे. वसूंची कन्या आहे. अदितिपुत्रांची म्हणजे सूर्यादिंची बहिण आहे. घृतरूपी अमृताचा निधी आहे. विचारशील जनांना मी समजावून सांगीतले आहे की, अवध्य अशा गायीचा वध करू नये.

        अथर्ववेदातील चौथ्या कांडात 21 वे सूक्त हे गोसूक्त आहे. यात ब्रह्मा हे ऋषी आहेत. या सूक्ताची देवता धेनु म्हणजेच गाय आहे. या सूक्तात वर्णन येते की,

               आ गावो अग्मन्नुत भद्रमक्रन्त्सीदन्तु गोष्ठे रणयन्त्वस्मे।

               प्रजावतीः पुरुरूपा इह स्युरिन्द्राय पूर्वीरुषसो दुहानाः।।

गायींनी आमचे कल्याण केले आहे. गायींनी आमचे गोठे आपल्या सुंदर शब्दांनी गुंजित करावेत. विविध रंगांच्या अशा या गायींनी चांगल्या वासरांना जन्म द्यावा. इंद्राच्या यज्ञासाठी त्यांनी सूर्योदयापूर्वी दूध द्यावे.

        अशा या गायींची काळजी घेताना ऋषी प्रार्थना करतात की,

               न ता नशन्ति न दभाति तस्करो नासामामित्रो व्यथिरा दधर्षति।

               देवांश्च याभिर्यजते ददाति च ज्योगित्ताभिः स च ते गोपतिः सह।।

अर्थात त्या गायी नष्ट होवू नयेत. चोरी होवू नयेत. शत्रूंनी त्यांना कष्ट देवू नयेत. गायींमुळेच त्यांचे स्वामी यज्ञ, दानादि कर्म करण्यास समर्थ होतात, त्यांचे समवेत त्यांनी चिरकाल रहावे.

        इन्द्राचा यज्ञ व गायीच्या दूधाचा संबंध स्पष्ट करताना ऋषी म्हणतात-

               गावो भगो गाव इन्द्रो म इच्छाद्गावः सोमस्य प्रथमस्य भक्षः।

               इमा या गावः स जनास इन्द्र इच्छामि हृदा मनसा चिदिन्द्रम्।।

गायी आमचे वैभव होवोत. इन्द्राने आम्हास गोधन प्रदान करावे. यज्ञाच्या प्रधान वस्तु सोमरसासोबत गायीचे दूध इन्द्राचा नैवेद्य व्हावा. ज्याच्या जवळ गायी आहेत, तो एक प्रकारे इन्द्रच आहे. मी श्रध्दायुक्त मनाने गव्य पदार्थ म्हणजे दूध दहि ताक इ. द्वारे इन्द्राचे यजन करतो.

        यानंतर गायींचा पवित्रतेशी असलेला संबंध उलगडून दाखविण्यात आला आहे.

               युयं गावो मेद यथा कृशं चिदश्रीरं चित्कृणुथा सुप्रतीकम्।

               भद्रं गृहं कृणुथ भद्रवाचो बृहद् वो वय उच्यते सभासु।।

गायींनो, तुम्ही कृश माणसाला पुष्ट करता. तेजोहीनास सुंदर करता. तुमच्या मंगलमय ध्वनीने म्हणजे हंबरण्याने आमचे घर मंगल म्हणजे पवित्र होते. त्यामुळेच सभांमध्ये म्हणजे विद्वत् जनांच्या चर्चेत तुमच्या कीर्तीचे गाणे गायिले जाते.

        शेवटी गायींचे सर्वतोपरी रक्षण करण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे, ती या प्रमाणे;

               प्रजावतीः सूयवसे रुशन्तीः शुद्धाः अपः सुप्रपाणो पिबन्तीः।

               मा व स्तेन ईशत माघशंसः परि वो रुद्रस्य हेतिर्वृणक्तु।।

हे गायींनो, तुम्हाला अनेक बछडे व्हावेत. सुंदर चारा प्राप्त व्हावा. पिण्यासाठभ्ी शुद्ध पाणी मिळावे. तुम्ही चोर व हिंसक जनावरांच्या जाळ्यात फसू नये. रुद्राच्या शस्त्रांनी तुमचे चहुबाजूंनी रक्षण करावे.

        या प्रमाणे अथर्ववेदात गायींविषयीचे सूक्त आहे, तसेच गायींच्या गोठ्याचे वर्णन करणारे गोष्ठ सूक्त या वेदात आहे. गायींच्या गोठ्याबद्दल अथर्ववेदातील वर्णन असे की,

               सं वो गोष्ठेन सुषदा सं रय््या सं सुभूत्या।

               अहर्जातस्य यन्नाम तेना वः सं सृजामसि।।

गायींसाठी प्रशस्त चांगली व स्चच्छ गोशाळा म्हणजे गोठा असावा. तेथे चांगले पाणी पिण्यास असावे. त्यांचेपासून चांगले प्रजोत्पादन होईल याची दक्षताघ्यावी. गायींवर इतके प्रेम करावे की, चांगल्यात चांगला पदार्थ त्यांना खाण्यास द्यावा.

पुढे ऋषी वर्णन करतात की, बृहस्पती, इन्द्र आदि देवांनी गायीला पुष्ट करावे. सं पुषा सं बृहस्पतिः। हे गोठे गायींसाठी आनंदकारी ठरावेत. शिवो वो गोष्ठो। अशा या गोठ्यांमध्ये आम्ही गायींचे पालन करू. भवन्तीर्जीवा जीवन्तीरूप वः सदेम।

        अथर्ववेदाप्रमाणे शुक्ल यजुर्वेदातही गायीचा महिमा सांगताना ‘‘गोस्तु मात्रा न विद्यते।’’(23-48) अर्थात गाय अनुपम आहे. तिला अन्य कशाची उपमा देता येत नाही; इतकी तिची थोरवी असल्याचे म्हणले आहे.

      गायीचा व आरोग्याचा निकटचा संबंध वेदात सांगीतला आहे. अश्विनीकुमार जे देवांचे वैद्य म्हणून ज्यांची प्रसिद्धी आहे; त्यांच्या निवासस्थानी मोठ्या शिंगांच्या गायी ‘यत्र गावो भूरिश्रृङ्गाः।’ असल्याचे वर्णन ऋग्वेदाच्या प्रथम मंडलाच्या एकशे चोपनाव्या सूक्तात सहाव्या ऋचेत येते. तसेच गायी असतात, तेथे भगवान विष्णूचा निवास असल्याचेही ‘विष्णोः परमं पदम्।’ असे वर्णन देखील शुक्लयजुर्वेदात आहे.

     छान्दोग्य उपनिषदात तर सत्यकामाने गोसेवमुळे ब्रह्मज्ञान प्राप्त केल्याची कथा आहे. महाभारतातही ‘गवां मध्ये वसाम्यहम्।’ म्हणजे गायींच्या मध्ये माझा निवास असावा’ असे वर्णन अनुशासन पर्वात आले आहे.

     तेव्हा एकंदरच वैदिक साहित्यात अनेक ठिकाणी गायीचे महत्व, तिची दिव्यता यांचे वर्णन आढळून येते. या वरून गोरक्षण म्हणजे गायींचे संरक्षण करणे हा वेदकालीन जीवनाचा अविभाज्य भाग होता; हे अगदी स्वतःसिद्ध आहे. या धरातलेवर आजही हिंदु संस्कृतीत धेनूचे महत्व धार्मिक, आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक अशा अनेक पैलूंनी अभिव्यक्त होते.

!!! माऊली की जय जय श्रीकृष्ण !!!

1 comment:

  1. 👏👏👌🙏अतिशय महत्त्वपूर्ण माहिती! 🙏

    ReplyDelete

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...