Wednesday, January 25, 2023

संत विचारांतून मानसिक आरोग्य - डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर

 

|| श्री: ||



संत विचारांतून मानसिक आरोग्य

       - डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर

        संतांच्या प्रत्येक शब्दात, अक्षरात, उकारादि मात्रांतही एक विचार असतो. माणसांचे कल्याण व्हावे, त्याचे आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक अशा तीनही तापांची शांती व्हावी, यासाठी “बुडत हे जन देखवेना डोळा |” किंवा “ऐसी कळवळ्याची जाती। करी लाभेविण प्रीती।।  या भूमिकेतून संतांनी लोकप्रबोधन केले आहे.  

          आज स्पर्धेचे युग आहे. यश किंवा अपयश पचवताना आबाल वृद्ध युवक असे सर्वांना अडचणीला सामोरे जावे लागू शकते. मोठ्या पदाच्या आणि पगाराच्या नोकऱ्या किंवा यशाच्या शिखरावर असताना देखील माणसांकडे मानसिक आरोग्य असेलच असे खात्रीने सांगता येत नाही. अशा प्रसंगी संत विचार हे माणसाला कोसळू देत नाहीत. संत विचार माणसाला अस्थिर होऊ देत नाहीत. स्थिर करतात. मन आरोग्य संपन्न करतात.

          शिक्षणशास्त्र-चर्चेत असे म्हटले जाते की, माणूस हा अधिकाधिक ज्ञान त्याच्या नेत्र या इंद्रियाद्वारे प्राप्त करतो. तद्वत माणसाचे मानसिक आरोग्य हे अनेकवेळा त्याची विचार करण्याची पद्धती आणि बोलण्याची, ऐकून घेण्याची रीत यावर देखील अवलंबून असते, असे म्हणता येणे शक्य आहे.

ü कसे बोलावे?

v या बद्दल कैवल्यसाम्राज्यचक्रवर्ती माऊली ज्ञानोबाराय फार सुंदर सांगतात –

तैसे साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे।।

खरे आणि मवाळ, कमी (नेमके) आणि रसाळ, माधुर्यपूर्ण असे अमृत कल्लोळासम  शब्द उच्चारावेत.

          अर्थात येथे माऊलींना खरे बोलणे, कमी बोलणे म्हणजे नेमके बोलणे आणि रसाळ म्हणजे रसांनी परिपुष्ट बोलणे अपेक्षित आहे.

v रामकथा : नल नील कथा : विचारल्याशिवाय सांगू नये.

          या बाबतीत रामकथेत एक प्रसंग सांगण्यात येतो की, नल आणि नील  या वानरांनी कोणतीही वस्तु फेकली, तर ती तरंगत असे. हे ते दोघेही जाणत होते. मात्र समुद्रावर राम सेतु उभारताना भगवान रामचंद्रांना ही गोष्ट साक्षात समुद्राने सांगितली. मात्र नल आणि नील यांनी स्वत:हून सांगितले नाही. पुढे त्यांना भगवान रामचंद्रांनी असे करण्याचे कारण विचारले, तेव्हा ते म्हणाले की, आपण विचारल्याशिवाय आम्ही आपल्याला कसे सांगणार?

          अर्थात आपण कमी बोललो, तर लोक आपले शब्द ऐकायला उत्सुक असतात. त्यामुळे लोक आपल्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत नाहीत. अन्यथा आज केवळ माझे कुणी ऐकून घेत नाही, ऐकत नाही या तक्रारीने मानसिक आरोग्यावर आघात होऊ शकतो.

ü कसे राहावे?

          जीवनात कसे राहावे, या विषयी जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांनी अनेक ठिकाणी नितांत सुंदर आणि हितकारी असा उपदेश केला आहे. एका अभंगात संत श्री तुकोबाराय म्हणतात की,

हेचि थोर भक्ति आवडते देवा । संकल्पावी माया संसाराची ॥ १ ॥

ठेविले अनंते तैसेचि राहावे । चित्ति असो द्यावें समाधान ॥ २ ॥

वाहिल्या उद्वेग दु:खची केवळ । भोगणें तें फळ संचिताचे ॥ ३ ॥

तुका म्हणे घालू तयावरी भार । वाहूं हा संसार देवा पायी ॥ ४ ॥

          अर्थात आपल्याला जी संसाराविषयी माया वाटते, प्रेम वाटते ते प्रेम भगवंतांना समर्पित करावे. ही थोर अशी भक्ती आहे. ती देवाला आवडते. पुढे तुकोबाराय म्हणतात की, अनंताने जसे ठेवले, तसे राहावे. आणि चित्तात समाधान असू द्यावे. (येथे एक गोष्ट ध्यानात ठेवावी की, सामान्य माणूस आपल्या जीवनातील सुख दु:खांचे कारण प्रारब्ध मानतो. तर वैष्णव आयुष्यातील सुख दु:खांचे कारण भगवंतांची इच्छा मानतो. त्यामुळे त्याचे समायोजन साधले जाते.) उद्वेगाचे वहन केल्याने दु:खच होणे. जे संचिताचे फळ आहे, ते भोगणे क्रमप्राप्त आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की, हा संसार भगवंतांच्या पायी अर्पण करू. सर्व भार भगवंतां सोपवू आणि आपण निवांत राहू. अर्थात फळाची चिंता न करता आपण आपले कर्तव्यकर्म करीत राहू.

ü मन तरल आणि शुद्ध ठेवणे आवश्यक:

चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती। व्याघ्रहि न खाती सर्प तया ।।

विष अमृत आघात ते हित। अकर्तव्य नीत होय त्यासी ।।

दु:ख ते देईल सर्व सुख फळ। होतील शीतळ अग्निज्वाळा।।

आवडेल जीवा जीवाचिये परी। सकळां अंतरी एक भाव।।

तुका म्हणे कृपा केली नारायणें। जाणिजे ते येणे अनुभवे।।

          मानसिक आरोग्यासाठी मन हे शरद ऋतूतील आकाशाप्रमाणे निरभ्र स्वच्छ शुद्ध असले पाहिजे. मनात कसलेही मळभ नसावे. हे सांगताना जगद्गुरू संत श्री तुकोबाराय म्हणतात की, चित्त शुद्ध असेल, तर शत्रू देखील मित्र होतात. सर्व दु:ख सुद्धा शांत होतील. ताप शांत होतील.

ü मैत्री जपणे आवश्यक:

आपण जेव्हा समवयस्कांसोबत असतो, तेव्हा आनंदी असतो. ही मैत्री टिकविण्यासाठी ऐकण्याची तयारी ठेवा. अनुभवजन्य ज्ञान खूप असतं पण कुणाला सांगावं हा प्रश्न असतो. म्हणून जो ऐकतो, त्याचे मित्र वाढतात आणि तो सुखी होतो. आनंदी राहतो.

          भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे” असे माऊली ज्ञानोबाराय देखील सांगतात.

ü वेळेचे महत्व आणि कार्याचे महत्व यांचा प्राधान्यक्रम लावणे:

आपल्याला एखादे कार्य करायचे आहे, करावे वाटते तर त्या कार्याला लागणारा वेळ आणि त्याची आवश्यकता यांचा प्राधान्यक्रम आपण लावला पाहिजे. समजा मला नामस्मरण करायचे आहे आणि कुणी तरी WHATSAPP ग्रुपवर क्रियाशील व्हा असे सांगत आहे, तर मला जास्त आनंद कशात आहे, याचा विचार करून मी माझे प्राधान्य निर्भीडपणे व्यक्त करावे.

ü नामस्मरण करा.

          जन वन आम्हा समानचि झाले । कामक्रोध केले पावटणी ।

षडउर्मी शत्रु जिंकिले अनंता । नामाचिया सत्ताबळे तुझ्या ।

          जगद्गुरू संत श्री तुकोबाराय सांगतात की, भगवंता, तुमच्या नामाच्या बलामुळे जन-वन हे सर्व आम्हाला समान झाले आहे. आम्ही कामक्रोधाच्या पायाखालील पायऱ्या केल्या आहेत. अर्थात त्यांवर जय मिळविला आहे क्षुधा, तृषा, शोक,मोह,जरा,मरण या सहा उर्मी आणि काम,क्रोध,लोभ,मोह,मद, मत्सर हे सहा शत्रू यांना सुद्धा जिंकले आहे.

          असे सामर्थ्य नामाचे आहे. म्हणून माणसाने नेहमी नामस्मरण करावे. शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज भगवंतांच्या चिंतनाचे महत्व प्रतिपादन करताना म्हणतात –

ऐसे चिंतनाचें महिमान । तारिले अधम खळ जन ।

चिंतने समाधान । प्राणिमात्रा होतसे ॥२॥

चिंतनें तुटे आधीव्याधी । चिंतने तुटतसे उपाधी ।

चिंतने होय सर्व सिद्धि । एका जनार्दनाचे चरणीं ॥३॥

 

         एकंदरच संतांनी सामान्य जनांच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने विपुल आणि महत्वपूर्ण असा उपदेश त्यांच्या अभंग, ओव्या या माध्यमातून केला आहे. या विषयावर एखादे मोठे पुस्तक, प्रकल्प होऊ शकेल इतके हे मार्गदर्शन व्यापक आहे.

इति लेखनसीमा !

 

(मातोश्री वृद्धाश्रम, पुणे येथील व्याख्यानाचा सारांश)

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...