Friday, February 11, 2022

श्रीगुरुकृपेने माझी तुळशी माळ आज ३५ वर्षांची झाली.

 श्रीगुरुकृपेने माझी तुळशी माळ आज ३५ वर्षांची झाली.

🙏🙏🙏📿⛳⛳⛳🌷🌷🌷



माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपण चि देव होय गुरू ॥


आज माघ शुद्ध दशमी. खरं तर माघ महिना आला की, माझ्या अंगावर काटा येतो. १९८७ साली, माघ शुद्ध दशमीचे दिवशी, श्रीकृष्णजन्मनक्षत्र, वृषभराशीस्थित चंद्र, माझ्या जन्मनक्षत्रास उत्तम ग्रहबल अशा शुभ मुहूर्तावर सोलापूर येथील श्रीविठ्ठलरुक्मिणी मंदिरात श्रीगुरुंनी मला माळ घातली. आणि मला भरभरून आशीर्वाद दिले. पेढ्याचा प्रसाद भरवला. श्रीगुरुंचे अनेकानेक शिष्य, त्यात मी एक. श्रीगुरुंनी माळ घातली, त्यात माझा क्रमांक शेवटचा. कारण नंतर वद्य नवमी म्हणजे दासनवमीला श्रीगुरु...... 


९५ वर्षे वय, तप, ज्ञान आणि भक्ती, कर्म यांचेसमवेत काया देखील वृद्ध. पण छान उठून बसले. मांडी घालून बसले. मी, बालक त्यांच्या समोर बसलो. मला माळ घातली. मी नमस्कार केला. पेढ्याचा नैवेद्य दाखवला. श्रीगुरुंनी थोडासा पेढा खाल्ला. तोच पेढा मला भरवला. माझ्या सर्वांगावरून हात फिरवला. भरभरून आशीर्वाद दिले. त्यांच्या आवडत्या नावाने मला संबोधित करून आशीर्वाद दिले.😇


८ वर्षाच्या वयातच मला ते लाभले, जे अनेक वर्षे तपश्चर्या करूनही दुर्लभ आहे. खरंच सांगतो तेव्हापासून अनुभवतोय,

पढियें देहभावें पुरवितो वासना । अतीं तें आपणापाशीं न्यावें ॥


मी कोणत्याही माणसाकडे, अगदी जन्मदात्या मातापित्यांकडेही काही मागितले नाही. कोणत्या गोष्टीसाठी हट्ट केला नाही. माझे सर्व सर्व लाड आजही तेच पुरवितात.


मागें पुढें उभा राहे सांभाळीत । आलिया आघात निवारावे ॥


कोणत्याही संकट प्रसंगी मला सांभाळतात. दुष्ट दुर्जन, लबाड लोकांपासून वाचवतात.

योगक्षेम जाणे जडभारी । वाट दावी करीं धरूनियां ॥


माझ्या योगक्षेमाची काळजी घेतात. मी चुकत असेल, तर योग्य वाट दाखवितात. माझ्याकडून आजही त्यांची फार सेवा घडत नाही. पण अवतारी पुरुषांना आपल्या शिष्यांकडून कधी काही पाहिजे असते का?

या अभंगाच्या शेवटच्या चरणात जगद्गुरू संत श्री तुकोबाराय म्हणतात, 

तुका म्हणे नाहीं विश्वास ज्या मनीं । पाहावें पुराणीं विचारूनी ॥

मी त्यांना नेहमी सांगतो, तुकोबा, आपल्या शब्दावर माझा पूर्ण विश्वास तर आहेच. त्याच बरोबर आपल्या कृपेने माझ्या श्रीगुरुंबद्दलचा माझा अनुभव तसाच आहे. 


मला माळ घातल्यानंतर श्रीगुरुंनी पूर्वकथनानुसार दासनवमीला निरोप घेतला. ते वैकुंठाला गेले, पण मी त्यादिवसापासून आज पर्यंत, आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हाक मारत राहीन, "आजोबाऽ, आजोबाऽऽ, आजोबाऽऽऽ......"


हा अभंग ऐकत, आळवत श्रीगुरुंचे रूप आठवून त्यांच्या चरणी माझ्या अश्रूंचा अभिषेक होतो, हेच माझे खरे ऐश्वर्य आहे. ते माझे सर्वस्व आहेत. साष्टांग दंडवत!!! 


गोपालकृष्ण श्रीगुरु भगवानशास्त्री महाराज की जय!!!

माऊली की जय जय श्रीकृष्ण!!!


चन्द्रहास, माघ शुद्ध दशमी


🙏🙏🙏⛳⛳⛳🌸🌸🌸🌷🌷🌷

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...