Friday, March 31, 2023

|| श्रीरामचद्रं सततं नमामि ||

 


|| श्रीरामचद्रं सततं नमामि ||

डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर

 

राम कथा गिरिजा मैं बरनी। कलि मल समनि मनोमल हरनी॥
संसृति रोग सजीवन मूरी। राम कथा गावहिं श्रुति सूरी॥

अर्थात भगवान श्री शंकर पार्वतीमातेस म्हणतात की, “हे गिरिजे, कलियुगाच्या पापांचा नाश करणारी, मनाचे मळभ दूर करणारी अशी पतितपावनी रामकथा मी वर्णिली. ही रामकथा जन्म-जरा-मरण या रोगासाठी संजीवनी वनस्पतीप्रमाणे आहे, असे वेद आणि विद्वज्जन सांगतात.

         असे मनोरम वर्णन श्रीरामकथेचे करण्यात येते.

पुण्यं पापहरं सदा शिवकरं विज्ञानभक्तिप्रदं।
मायामोहमलापहं सुविमलं प्रेमाम्बुपूरं शुभम्‌।
श्रीमद्रामचरित्रमानसमिदं भक्त्यावगाहन्ति ये
ते संसारपतंगघोरकिरणैर्दह्यन्ति नो मानवाः॥

श्रीरामचरित्ररूपी मानसाची महती या नितांत सुंदर अशा श्लोकात सांगितली आहे. हे श्री रामचरितमानस पुण्यरूप आहे. पापांचे हरण करणारे आहे. नित्य कल्याणकारी आहे. विज्ञान आणि भक्ती देणारे आहे. माया-मोह-मल दूर करणारे आहे. परम निर्मलरूपी जलाने परिपूर्ण आणि मंगलमय असे आहे. जो मनुष्य भक्तिपूर्वक या मानससरोवरामध्ये निमज्जन करतो, त्याला संसाररूपी सूर्याची प्रचंड किरणे जाळीत नाहीत.

         असे थोर महात्म्य श्रीरामकथेचे आहे.

यावत् स्थास्यन्ति गिरयस्सरितश्च महीतले ।
तावद्रामायणकथा लोकेषु प्रचरिष्यति ॥
- वाल्मीकिरामायणम् १.२.३६

जो पर्यंत या भूतलावर पर्वत आहेत, नद्या आहेत, अर्थात जो पर्यंत ही सृष्टी आहे, तो पर्यंत या रामायणकथेचा लोकांमध्ये प्रचार होत राहील.

         असे वर्णन श्रीवाल्मीकीरामायणात देखील मिळते.

         संस्कृत, हिंदी, मराठी या भाषेतील अनेक काव्ये ही रामायणावर आधारित आहेत. रामायणाची साहित्यिक उपजीव्यता अद्वितीय अशा प्रकारची आहे.

         समर्थ श्री रामदास स्वामी, श्रीधरस्वामी, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अशा अनेक साधू संतांनी मराठीभाषेतून रामायणाची, रामनामाची महती सांगितली आहे. श्रीराम कथेतील तत्त्व हे नित्य अशा प्रकारचे आहे. त्याची मांडणी कालानुरूप होणे आवश्यक असते. आणि तशी ती प्रभू रामरायांच्या कृपेने झाल्याचे दिसून येते. संत तुलसीदास यांचे नंतर देखील हिंदीतही ती मालिका सुरूच राहिली. राष्ट्रकवी मैथिलीशरण यांनीही आधुनिक काळात काव्याच्या माध्यमातून राम कथा गायिली आहे.

        रामायणाच्या या मालिकेत आनंद रामायण देखील प्रसिद्ध आहे. प्रस्तुत रामायणात भगवान श्रीरामाचे नितांत सुंदर असे अष्टक येते.

॥ अथ रामाष्टकम् ॥

श्रीशिव उवाच ।

भगवान श्रीशिवजी म्हणतात-

सुग्रीवमित्रं परमं पवित्रं सीताकलत्रं नवमेघगात्रम् ।

कारुण्यपात्रं शतपत्रनेत्रं श्रीरामचन्द्रं सततं नमामि ॥१॥

सुग्रीवाचे मित्र, परम पवित्र, सीताकांत, नवमेघाप्रमाणे कांती असणारे, कारुण्यनिधी आणि कमलदलाप्रमाणे नेत्र असणारे अशा श्रीरामचंद्रांना मी सतत नमस्कार करतो.

संसारसारं निगमप्रचारं धर्मावतारं हृतभूमिभारम् ।

सदाविकारं सुखसिन्धुसारं श्रीरामचद्रं सततं नमामि ॥२॥

ज्यांनी भूमीचा भार हरण केला आहे, जे धर्माचे अवतार आहेत, जे अखिल विश्वाचे सार आहेत, ज्यांच्याविषयी वेद कथन करतात, जे सदैव अविकारी आहेत, जे सुखसिंधुचे म्हणजे आनंदसागराचे सार आहेत, अशा श्रीरामचंद्रांना मी सतत नमस्कार करतो.

लक्ष्मीविलासं जगतां निवासं लङ्काविनाशं भुवनप्रकाशम् ।

भूदेववासं शरदिन्दुहासं श्रीरामचन्द्रं सततं नमामि ॥३॥

लक्ष्मीपती, अखिल विश्वामध्ये भरून राहणारे, लंकेचा नाश करणारे, जगाला आनंदित करणारे, संतांच्या द्वारे ज्यांचे ध्यान केले जाते, शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे हास्य असणारे अशा श्रीरामचंद्रांना मी सतत नमस्कार करतो.

मन्दारमालं वचने रसालं गुणैर्विशालं हतसप्ततालम् ।

क्रव्यादकालं सुरलोकपालं श्रीरामचन्द्रं सततं नमामि ॥४॥

मंदार पुष्पांची माळा धारण करणारे, रसपूर्ण वाणीचे उच्चारण करणारे, गुणांनी विशाल असणारे, एका बाणात सप्त ताल वृक्ष छेदणारे अर्थात सर्वश्रेष्ठ धनुर्धर, असुरान्तक, देवांचे रक्षणकर्ते, अशा श्रीरामचंद्रांना मी सतत नमस्कार करतो.

वेदान्तगानं सकलैः समानं हृतारिमानं त्रिदशप्रधानम् ।

गजेन्द्रयानं विगतावसानं श्रीरामचन्द्रं सततं नमामि ॥५॥

उपनिषदे ज्यांची स्तुती गातात, जे सर्वांना समानतेने वागवितात, ज्यांनी शत्रूचे गर्वहरण केले आहे, देवांचे मुख्य असे, गजेंद्राधिरूढ, अभयदान देणारे, अशा श्रीरामचंद्रांना मी सतत नमस्कार करतो.

श्यामाभिरामं नयनाभिरामं गुणाभिरामं वचनाभिरामम् ।

विश्वप्रणामं कृतभक्तकामं श्रीरामचन्द्रं सततं नमामि ॥६॥

मेघ:श्यामल अशी सुंदर कांती असणारे, नयनरम्य रूप असणारे, गुणांचे निधान असणारे, सुंदर म्हणजे मधुर, रसाळ, पवित्र आणि सत्य वचन बोलणारे, ज्यांचेसमोर अखिल विश्व नतमस्तक होते, भक्तांची कामना पूर्ण करणारे, अशा श्रीरामचंद्रांना मी सतत नमस्कार करतो.

लीलाशरीरं रणरङ्गधीरं विश्वैकसारं रघुवंशहारम् ।

गम्भीरनादं जितसर्ववादं श्रीरामचन्द्रं सततं नमामि ॥७॥

लीलाशरीरधारी अर्थात अवतारी, युद्धात सदैव विजयी, विश्वाचे सार, रघुवंशाचे मेरुमणी, प्रगल्भ ध्वनी असणारे, सर्व युद्धात विजयश्री प्राप्त करणारे, अशा श्रीरामचंद्रांना मी सतत नमस्कार करतो.

खले कृतान्तं स्वजने विनीतं सामोपगीतं मनसा प्रतीतम् ।

रागेण गीतं वचनादतीतं श्रीरामचन्द्रं सततं नमामि ॥८॥

दुष्टनिर्दालक, स्वजनांप्रति विनयी, सामोपगीत असे मनाला प्रतीत होणारे, प्रेमाने ज्यांची स्तुती गायिली जाते असे वचनांच्या द्वारे अवर्णनीय असे ज्यांचे महात्म्य आहे, अशा श्रीरामचंद्रांना मी सतत नमस्कार करतो.

श्रीरामचन्द्रस्य वराष्टकं त्वां मयेरितं देवि मनोहरं ये ।

पठन्ति शृण्वन्ति गृणन्ति भक्त्या ते स्वीयकामान् प्रलभन्ति नित्यम् ॥९॥

हे देवी, श्रीरामचंद्रांचे श्रेष्ठ असे हे मनोहारी अष्टक मी तुला सांगितले आहे. जे लोक भक्तीपूर्वक हे अष्टक वाचतात, ऐकतात, गातात त्यांची सर्व मनोरथे नित्य सफल होतात.  

 

॥ इति शतकोटिरामचरितान्तर्गते श्रीमदानन्दरामायणे वाल्मीकीये सारकाण्डे युद्धचरिते द्वादशसर्गान्तर्गतं श्रीरामाष्टकं समाप्तम् ॥

अशा प्रकारे शतकोटीरामचरितामधील श्रीमद् आनंद रामायणातील वाल्मीकीय सारकांडातील युद्धचरितातील द्वादश सर्गातील श्रीरामाष्टक आहे.

        एकूणच आनंद रामायणातील नितांत सुंदर असे हे श्रीरामाष्टक आहे. याचे काही पाठभेद देखील असण्याची शक्यता आहे. बहुतेक ठिकाणी हे अष्टक संस्कृतात उपलब्ध आहे. वाचकांसाठी मराठी अनुवाद देण्याचा प्रयत्न केला आहे. जर काही त्रुटी असतील, तर अभयदान आणि शरणदान देण्यासाठी ज्यांची विशेष ख्याती आहे, असे लोकप्रभू श्रीरामराय क्षमा करतील आणि झालेली सेवा गोड मानून घेतील, अशी श्रद्धा आहे.

इति लेखनसीमा |

Sunday, March 26, 2023

नितांत सुंदर सूक्तांनी युक्त ऋग्वेद

 

संस्कृत साहित्य परिचय लेखांक २

नितांत सुंदर सूक्तांनी युक्त ऋग्वेद

डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर

       

        पैल ऋषींपासून ऋग्वेद अध्ययनाची परंपरा सुरु होते. सनातन वैदिक परंपरेत ऋग्वेदास आद्य ग्रंथ मानले जाते. ऋग्भि: स्तुवन्ति | अर्थात ऋग्वेदात विविध देवतांची स्तुतीपरक सूक्ते येतात. अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् । होतारं रत्नधातमम् ॥ हा ऋग्वेदाचा प्रथम मंत्र मानण्यात येतो. तर समानी व आकूति: समाना ह्रदयानि : । समानमस्तु वो मनो यथा : सुसहासति ॥ हा ऋग्वेदाच्या शाकल शाखेनुसार ऋग्वेदाचा अंतिम मंत्र मानण्यात येतो.

 

ऋग्वेदाची संरचना (Structure):

        ऋग्वेदाची संरचना समजून घेताना मंडल क्रम किंवा अष्टक क्रम मानला जातो. यात १० मंडल, ८ अष्टक, ६४ अध्याय, २००६ वर्ग, १००० हून अधिक सूक्त, १०,४४४ ऋचा आहेत, असे ढोबळमानाने सांगितले जाते. प्रत्यक्ष संख्येबाबत विद्वानांत मतवैविध्य आढळते. मंडलातील सूक्तांची संख्या प्रथम मंडलात १९१, द्वितीय मंडलात ४३, तृतीय मंडलात ६२, चतुर्थ मंडलात ५८, पंचम मंडलात ८७, षष्ठ मंडलात ७५, सप्तम मंडलात १०४, अष्टम मंडलात  १०३, नवम मंडलात ११४ आणि दशम मंडलात १९१ अशी मिळते. या अतिरिक्त ११ सुक्तांना बालखिल्य म्हणून ओळखले जाते.

 

ऋग्वेदाच्या प्रमुख शाखा:

        ऋग्वेदाच्या एकूण २१ शाखा असल्याचे उल्लेख प्राचीन ग्रंथांत आढळतात. तथापि आज प्रमुख पाच शाखा उपलब्ध आणि प्रसिद्ध आहेत. त्या पुढीलप्रमाणे-

१. शाकल, २. वाष्कल, ३. आश्वलायन, ४. शांखायन ५. माण्डूकायन

 

 

ऋग्वेदाचे ऋषी:

        वैदिक मंत्रांचा ज्यांना साक्षात्कार झाला, त्यांना ऋषी असे म्हणतात. साक्षात्कृत धर्माण ऋषयो बभूवु: । किंवा मन्त्रद्रष्टार: ऋषयः | अशा ऋषी शब्दाच्या व्याख्या शास्त्र ग्रंथांत आढळतात. यस्य वाक्यं स ऋषि: | अशी देखील व्याख्या सांगण्यात येते. गृत्समद, विश्वामित्र, वसिष्ठ आदि ऋषी आणि लोपामुद्राघोषाशची आदि ऋषिका यांचा संबंध ऋग्वेदाशी आहे.

 

ऋग्वेदाचे भाष्यकार:

        आपल्या ज्ञान परंपरेत भाष्य ग्रंथांचे मोठे योगदान आहे. वेद मंत्रांचा अर्थ कसा करावा, शब्दांची व्युत्पत्ती कशी लक्षात घ्यावी, यासाठी यास्काचार्यांनी निरुक्त नामक ग्रंथाची रचना केली. वेद मंत्रांच्या अर्थाविषयी प्राचीन काळापासून विद्वानांत चर्चा होत असे. स्कंदस्वामी, माधवभट्ट, वेंकटमाधव, धानुष्कयज्वा, आनंदतीर्थ, सायणाचार्य, महर्षी दयानंद सरस्वती अशी ऋग्वेदभाष्यकरांची श्रेष्ठ परंपरा दिसून येते.

 

ऋग्वेदातील छंद:

        ४४ अक्षरांचा त्रिष्टुप छंद, २४ अक्षरांचा गायत्री छंद आणि ४८ अक्षरांच्या जगती छंदांचे आधिक्य ऋग्वेदात दिसून येते. चार पाद, दोन पाद आणि तीन पादांनी युक्त मंत्र ऋग्वेदात आहेत.

 

ऋग्वेदीय सूक्तांचे विषय:

        ऋग्वेदात अनेकविध देवतांच्या स्तुतीसाठी विविध सूक्ते आहेत. त्याच प्रमाणे अन्य विषयांवर देखील सूक्ते आहेत. सवितृ, अग्नी, इंद्र, वरुण, उषा इत्यादी देवतांचे वर्णन करणारी सूक्ते आहेत. ऋग्वेदातील नासदीय सूक्त परब्रह्माचे तात्त्विक वर्णन करणारे आहे. भगवान विष्णूंच्या स्तुत्यर्थ ज्याचे पठन केले जाते, ते पुरुषसूक्त ऋग्वेदात आहे. श्रीसूक्त हा ऋग्वेदाच्या खिलसूक्ताचा भाग मानण्यात येतो. यात विश्वामित्र नदी इत्यादी संवाद सूक्ते देखील आहेत. श्रद्धा, मन्यु अशा भावात्मक देवतांचीही सूक्ते यात आहेत. एकंदर देवता स्तुती, संवाद, कथा, दानस्तुती, तत्त्वज्ञान, इत्यादी विषयवस्तू ऋग्वेद संहितेची आहे, असे म्हणता येईल.

 

यज्ञ आणि ऋग्वेद:

        होतृगण यज्ञप्रसंगी ऋग्वेदातील सूक्तांच्या द्वारे देवतांची स्तुती करतात. ऋग्वेदाच्या ऋत्विजास होता असे संबोधण्यात येते. होता, मैत्रावरूण, अच्छावाक आणि ग्राववस्तू हे चार ऋत्विज या संबंधित आहेत.

 

ऋग्वेदाच्या संबंधित ग्रंथ:

        संहिता, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यक आणि उपनिषद असे चार भाग वेदाचे विषयवस्तूस अनुसरून होतात. त्यांचे वर्णन मागील लेखात आले आहे. ऋग्वेदाच्या संहितेच्या संबंधित ब्राह्मण ग्रंथांत ऐतरेय आणि शांखायन ब्राह्मण ग्रंथांचा समावेश होतो. ऋग्वेदाच्या संबंधित आरण्यक ग्रंथांची नावे देखील ऐतरेय आणि शांखायन अशीच आहेत. ऐतरेय, कौषीतकी आणि बाष्कल ही ऋग्वेदाच्या संबंधित उपनिषदांची नावे आहेत. या शिवाय ऋग्वेदाच्या संबंधित शिक्षा ग्रंथांत पाणिनीय शिक्षा आणि ऋक् प्रातिशाख्य यांचा समावेश होतो.

 

ऋग्वेदाचे कालनिर्णय:

        यद्यपि श्रद्धावान आणि सनातन मतावलंबी वेद अपौरुषेय आणि नित्य सनातन असल्याचे मानतात तथापि काही पाश्चात्य किंवा आधुनिक विचारवंत यांनी ऋग्वेदाचा काळ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यात Max-Muller, Weber, Winternitz, Jacoby आणि लोकमान्य टिळक यांचे योगदान आहे. बहुतेक विचारवंतांनी ऋग्वेदाचा काळ हा इसवी सनाच्या पूर्वीचा आहे, हे मान्य केले आहे.

 

        एकंदरच ऋग्वेदास विश्वातील आद्य अक्षर वाङ्मय मानले जाते. यातील मंत्रांना ऋचा असे म्हणतात. यात विविध देवता, भावात्मक देवता यांच्या स्तुती करणाऱ्या सूक्तांचा समावेश होतो. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, स्तुती या शब्दाचा अर्थ “यथार्थ वर्णन” असा स्वीकारण्यात आला आहे. वेदक्रमांत ऋग्वेदानंतर यजुर्वेदाचा समावेश होतो. तर यजुर्वेदाची माहिती पुढील लेखात ......

               

Saturday, March 11, 2023

 


संस्कृत साहित्य परिचय

- डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर

 


संस्कृत साहित्य हे व्यापक आहे, सर्वस्पर्शी आहे, असे आपण म्हणतो. अनेकदा ऐकतो. त्याविषयी आदरभाव देखील व्यक्त करतो. संस्कृत साहित्य कसे व्यापक आहे किंवा कसे सर्वस्पर्शी आहे? हे जाणून घेणे म्हणूनच महत्वपूर्ण ठरते. या पार्श्वभूमीवर संस्कृत साहित्याचा धावता परिचय अभिव्यक्त करणारे सदर आजपासून दर रविवारी प्रकाशित करीत आहोत. हे सदर खास दै. राष्ट्रसंचारच्या वाचकांसाठी सुप्रसिद्ध प्रवचनकार, संस्कृत अभ्यासक डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर लिहिणार आहेत.

- संपादक  

 

          संस्कृत साहित्य हे विश्वातील एक व्यापक आणि विस्तृत अशा प्रकारचे साहित्य आहे. या साहित्यात प्राचीन कालीन वेद, उपनिषद आहेत. या साहित्यात व्याकरणकार पाणिनी, महाभाश्याकार पतंजली आदींचे साहित्य आहे. वेदांत इत्यादी दर्शन साहित्य आहे. पौराणिक ग्रंथ आहेत. आदि शंकराचार्य, निम्बार्काचार्य इत्यादी आचार्यांचे भाष्य वाङ्मय आहे. शिल्पशास्त्र, नाट्यशास्त्र आहे. कालिदास, भास अशा अनेक सिद्धहस्त आणि प्रतिभासंपन्न कवींची नाटके, खंडकाव्ये, महाकाव्ये आहेत. एकंदरच संस्कृत साहित्याची व्याप्ती ही मानवी जीवनाचे आकाश भरून टाकणारी अशी आहे.

          काही अभ्यासक संस्कृत साहित्याचे वर्गीकरण यातील साहित्यप्रकारानुसार करतात. तर काही अभ्यासक वैदिक आणि लौकिक असे वर्गीकरण करतात. प्रस्तुत सदरात आपण क्रमश: वेद, उपनिषद, वेदांग, पुराण, दर्शन, विविध शास्त्र, काव्य असे विवेचन करणार आहोत.

          वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलों ।   असे महावैष्णव कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबाराय म्हणतात. अर्थात सर्व आस्तिक दर्शनांनी वेद प्रामाण्य मानले आहे. ऋग्वेद हा जगातील आद्य साहित्याचा भाग असल्याचे देखील बहुतेक विद्वान मानतात.

          वेदातील ज्ञान हे त्रिकालाबाधित असे आहे. अत: वेदांचा रचनाकार कोणी नाही. तर वेदातील ज्ञानाचा साक्षात्कार ऋषींना झाला. वेद हे अपौरुषेय आहेत. अशी मान्यता श्रद्धावंतांची आहे.

अनादिनिधना नित्या वागुत्सृष्टा स्वयम्भुवा ।
आदौ वेदमयी विद्या यतः सर्वा: प्रवृत्तयः ॥

अशा शब्दांत महाभारतकार व्यासमुनींनी वेदांचे नित्यत्व प्रतिपादन केले आहे.

          वेद शब्दाचा अर्थ ज्ञान असा होतो. ‘विद’ या ज्ञानार्थक धातूला घञ् प्रत्यय जोडून वेद हा शब्द सिद्ध होतो. त्याचा अर्थ ज्ञान असा होतो. विदलृ लाभे या धातूला घञ् प्रत्यय जोडून सुद्धा वेद शब्द तयार होतो. त्याचा अर्थधर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ प्राप्त करून देणारे ज्ञान असाही केला जातो. श्रीमद्भागवताच्या तृतीय स्कंधात सृष्टीरचनेच्या प्रसंगी विधाता वेदांच्या निर्देशानुसार सृष्टी रचना करतात, असे वर्णन येते.

          अर्थात वेद शब्दाचा समन्वय हा ज्ञान, नित्यता आणि पुरुषार्थसिद्धी यांचेशी असल्याचे दिसून येते. वेद राशीचे चार भाग त्यातील वर्ण्य विषयांनुसार केले जातात. ते असे,

१. संहिता - यज्ञनुष्ठानामध्ये उपयुक्त मंत्रांचा यात समावेश होतो.

२. ब्राह्मण-ग्रंथ – यज्ञनुष्ठानप्रसंगी प्रयुक्त मंत्रांच्या विधींचे गद्य स्पष्टीकरण यात येते. वैदिक मंत्रांना देखील ब्रह्म अशी संज्ञा आहे. म्हणून या मंत्रांविषयी अधिक माहिती सांगणारे जे वाङ्मय त्यास ब्राह्मण अशी संज्ञा आहे. शतपथ, ऐतरेय आदी ब्राह्मण ग्रंथ प्रसिद्ध आहेत.

३. आरण्यक – सृष्टीतत्त्वान्वेषण हा आरण्यकांचा मुख्य विषय मानला जातो. अरण्ये भवम् आरण्यकम् | असे म्हटले जाते. अर्थात आरण्यकांचे पाठ अरण्यात म्हणजे वानप्रस्थी जन करत असावेत. कर्मकांडीय यज्ञ म्हणजे संहिता आणि ब्राह्मण आणि ज्ञानयज्ञ म्हणजे उपनिषद यांच्यातील दुवा म्हणून अभ्यासक आरण्यक वाङ्मयाकडे पाहतात. यात वैदिक यज्ञांचे दार्शनिक, आध्यत्मिक वर्णन आहे. ऐतरेय, शांखायन, तैत्तिरीय, बृहदारण्यक, तवलकार इत्यादी आरण्यक प्रसिद्ध आहेत.  

४. उपनिषद – ब्रह्म, माया आणि ईश्वर, अविद्या, विद्या, आत्मा आणि जगत यांचे तात्त्विक वर्णन यात येते. उपनिषदे ही वेदाच्या अंती म्हणजे शेवटी येतात. म्हणून त्यांना वेदांत असेही म्हणतात. उपनिषदांचा फार मोठा प्रभाव हा भारतीय तत्त्वज्ञानावर दिसून येतो. वेदांताच्या प्रस्थानत्रयीमध्ये देखील उपनिषदांचा समावेश होतो. ईश, केन, कठ इत्यादी उपनिषदे प्रसिद्ध

आहेत.

          असे सांगितले जाते की, पूर्वी ही वेदराशी एकच होती. परंतु मानवाची परिमितता ध्यानी घेऊन व्यासांनी या वेदराशीचे चार भाग केले. आणि ते चार भाग आपल्या चार शिष्यांना शिकविले. पैल, वैशंपायन, जैमिनी आणि सुमन्तु हे ते चार शिष्य होत, असे वर्णन काही ठिकाणी आढळते.  ते चार भाग म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे होत. यांचा परिचय पुढील भागात......

क्रमश:

(दै. राष्ट्रसंचार, दि. १२/०३/२०२३)

Friday, March 10, 2023

“चंद्रामृत भाग २”

 


व्याख्याते, प्रवचनकार यांच्यासाठी उपयुक्त पुस्तक “चंद्रामृत भाग २”

सौ. रोहिणी पांडे, पुणे 

 

          सुप्रसिद्ध प्रवचनकार, कीर्तनकार ह.भ.प. डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर यांच्या सिद्धहस्त आणि चतुरस्त्र लेखणीतून साकारलेले एक निर्व्याज मनोरम पुस्तक म्हणजे चंद्रामृत भाग २. डॉ. शास्त्रींची अनेक व्याख्याने, प्रवचने सातत्याने होत असतात. तसेच अनेक वृत्तपत्रांमधून आणि समाज माध्यमात देखील ते सातत्याने लेखन करतात. या व्याख्याने, प्रवचने आणि लेख यांच्यावर आधारित पुस्तक म्हणजे चंद्रामृत भाग २ होय.

          या पुस्तकात विविध विषयांवरील शास्त्रीजींचे लेख आणि मुलाखत यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांचा थोडक्यात सारांश असा की,

श्रीगणेशवन्दनम्

         “कलौ चण्डीविनायकौ |” असे शास्त्रवचन आहे. अर्थात कलियुगात भगवान श्रीगणेश आणि भगवती चंडिकादेवी यांच्या उपासनेचे अत्यधिक महत्व आहे. अनेक प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक ग्रंथांमध्ये भगवान श्री गणपतीचे वंदन, स्तवन, स्तोत्र, अष्टक अनेक भाषांमध्ये आपल्याला आढळते. या पार्श्वभूमीवर आपण देखील गणरायाच्या चरणी आपली सेवा रुजू करावी, या हेतूने या वंदनात्मक स्तोत्राची रचना डॉ. शास्त्रींकडून  भगवंतांनी करवून घेतली आहे. त्या रचनेचा समावेश या लेखात आहे.

आनंद रामायणातील श्रीरामाष्टक

          संस्कृत, हिंदी, मराठी या भाषेतील अनेक काव्ये ही रामायणावर आधारित आहेत. रामायणाची साहित्यिक उपजीव्यता अद्वितीय अशा प्रकारची आहे. समर्थ श्री रामदास स्वामी, श्रीधरस्वामी, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अशा अनेक साधू संतांनी मराठीभाषेतून रामायणाची, रामनामाची महती सांगितली आहे. श्रीराम कथेतील तत्त्व हे नित्य अशा प्रकारचे आहे. त्याची मांडणी कालानुरूप होणे आवश्यक असते. आणि तशी ती प्रभू रामरायांच्या कृपेने झाल्याचे दिसून येते. संत तुलसीदास यांचे नंतर देखील हिंदीतही ती मालिका सुरूच राहिली. राष्ट्रकवी मैथिलीशरण यांनीही आधुनिक काळात काव्याच्या माध्यमातून राम कथा गायिली आहे. रामायणाच्या या मालिकेत आनंद रामायण देखील प्रसिद्ध आहे. प्रस्तुत रामायणात भगवान श्रीरामाचे नितांत सुंदर असे अष्टक येते. या अष्टकाचे निरुपण या लेखात आहे.

शरण शरण जी हनुमंता । तुज आलो रामदूता ॥

          जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून अगदी प्रासादिक शब्दांमध्ये मारुतीरायांच्या विषयीचा आपला आदरभाव व्यक्त केला आहे. या अभंगाचे निरुपण या लेखात आहे.

“सार्थ बोधवचने” प्रकाशन

          प्रा. डॉ. दत्तात्रय तापकीर यांच्या सार्थ बोधवचने या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. शास्त्रींच्या हस्ते पार पडले. त्या प्रसंगीच्या व्याख्यानाचा सारांश या लेखात आहे.

संस्कृत भाषा प्रचारिणी सभा: प्रज्ञाभारति पुरस्कारानिमित्त संबोधन

          नागपूर येथील प्रतिष्ठित अशा संस्कृत भाषा प्रचारिणी सभा यांचेकडून डॉ. शास्त्रींना प्रज्ञाभारति पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगीच्या व्याख्यानाचा सारांश या लेखात संस्कृत भाषेत आहे.

ला, माणूस होऊ या.

          "केवळ स्वतः नाही, आपल्या समवेतची प्रत्येक व्यक्ती आनंदी असायला हवी." असं ज्याला वाटतं तो माणूस. पण माणसाच्या या माझ्या व्याख्येत जगातील किती टक्के मनुष्याकृती प्राणी येतील, प्रश्नच आहे. खरं तर भगवंताची सर्वात सुंदर कलाकृती म्हणजे माणूस.

सुखाचं गणित

          गणित कितीही अवघड असो, सोपं असो किंवा लहान मोठं असो; ते फक्त ०१२३४५६७८९ या दहा अंकांभोवतीच भ्रमत असतं. माणसाचंही असंच असतं. या विषयीचे निरुपण या लेखात आहे.

परस्परावलंबित्व, माणूस आणि आनंदाचा मार्ग.

        मानवच काय, अगदी पशु पक्षी वनस्पती सर्वांचेच जीवन हे तसे कॉम्प्लेक्स असते. आणि याचे एक प्रमुख कारण परस्परावलंबित्व असण्याची शक्यता आहे. गरजा कितीही कमी असो किंवा अधिक; त्यांची पूर्तता करण्यासाठी अन्य कोणावर तरी अवलंबून रहावे लागते. माणसाच्या या सुंदर स्थितीचा मागोवा या लेखात आहे.

हसायला लावणारी माणसं...!

          एका सज्जन व्यक्तीच्या बाबतीत मी असे निरीक्षण केले की, हसायला लावणा-या प्रेमळ माणसांनी अशी काही साथ दिली की, वेळ फक्त हसण्यासाठीच राहीला. एखाद्या कुशल डॉक्टर सारखं हसत हसवत हृदय बाहेर काढलं. कॉर्बोरेटर ऑईलनं साफ करावं, तसं आशीर्वाद आणि शुभेच्छांच्या स्निग्धतेने हृदय स्वच्छ केले. आणि निखळ हास्य तेवढं हृदयात ठेवलं. अशा सकारात्मक माणसांविषयीचे चिंतन या लेखात आहे.

आधुनिक तंत्रज्ञान संस्कृत भाषेला पोषक!

          केवळ भारतीयच नव्हे, तर मॅक्समुलर, गटे, शोपेनहावर प्रभृती पाश्चात्य विचारवंतांना देखील संस्कृत साहित्याने प्रभावित केले होते. भारतातीलच नव्हे, तर जगातील एक प्राचीन भाषा म्हणून संस्कृत भाषेची ओळख आहे. श्रावण पौर्णिमेला सर्वत्र संस्कृतदिन साजरा केला जातो. त्या निमित्त संस्कृत भाषेचे अभ्यासक, कवी, आणि संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या भूमिकेचे पुरस्कर्ते प्रा. डॉ. चंद्रहास सोनपेठकर यांची विशेष मुलाखत या लेखात आहे.

भाषा विचार

सामान्यत: विचार अभिव्यक्त करण्याचे साधन अशी परिभाषा ‘भाषा’ या संज्ञेची केली जाते. “ भाषा-विचार” या लेखात आपल्याला भाषा, मराठी भाषा आणि त्यातील विविध शब्द तसेच त्यांचे व्युत्पत्यर्थ, शुद्धलेखन इत्यादी विषयांचा विचार या लेखात मांडला आहे..

भाषा विचार

          महर्षी पतंजलींना आपण योगसूत्रकार म्हणून ओळखतो. ते व्याकरणकार देखील होते. त्यांचा व्याकरणमहाभाष्य नामक ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यात त्यांनी भाषेची व्याख्या दिली आहे, ती पुढीलप्रमाणे,

“व्यक्ता वाचि वर्णा येषां त इमे व्यक्त वाच|”

अर्थात भाषा हे एक साधन आहे, ज्यामुळे माणूस आपले विचार अन्य लोकांसमक्ष स्पष्टपणे प्रकट करू शकतो आणि अन्य लोकांचे विचार स्पष्टपणे समजू शकतो. या व्याख्येचे निरूपण या लेखात आहे.

“विद्यार्थ्याला निर्भय वाटलं पाहीजे.”

          संस्कृत कवी, सुप्रसिद्ध व्याख्याते, आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक अशी ओळख असलेले डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर यांच्या अध्यापन कार्यास यावर्षी १६ वर्षे पूर्ण झाल्या निमित्तची विशेष मुलाखत येथे देण्यात आली आहे.

राष्ट्रकवि श्रद्धेय अटलजी

अटलजींना भारतरत्न मिळाले. खरं तर अटलजींच्या रूपाने भारतदेशाला रत्न मिळालेच होते. ते रत्न आहे, यास एक वैधानिक मान्यताच जणू भारतरत्न पुरस्काराने दिली आहे. श्रद्धेय अटलजींविषयीच्या डॉ. शास्त्रींचे भावविश्व या लेखात प्रकटले आहे.

ती शाबासकीची थाप......!

          नामवंत व्याख्याते, निरुपणकार असे आदरणीय विवेकजी घळसासी. शास्त्रींच्या हृदयात अक्षय अशा प्रकारचा आदर असणारं हे व्यक्तिमत्व. आदरणीय विवेकजी यांच्या विषयीचे डॉ. शास्त्रींचे भावविश्व या लेखात प्रकटले आहे.

संत साहित्यातील गीता महात्म्य

          वारकरी संप्रदाय हा जगाच्या पाठीवरील एक क्रांतिकारी असा संप्रदाय आहे. वेदांत संप्रदायाचे अधिष्ठान या संप्रदायाला आहे. ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि गीता अशी वेदांत तत्त्वज्ञानाची प्रस्थानत्रयी मानली जाते. वारकरी संप्रदायात देखील श्रीमद्भगवद्गीतेचे आत्यंतिक अशा प्रकारचे महत्व आहे. कैवल्यसाम्राज्यचक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी श्रीमद्भगवद्गीतेवर भावार्थदीपिका नावाची टीका लिहिली. तोच ग्रंथ पुढे ज्ञानेश्वरी म्हणून प्रसिद्ध झाला. अशा प्रकारे विविध संतांच्या अभंगांतून व्यक्त होणारे गीता महात्म्य या लेखात निरूपित करण्यात आले आहे.

अध्यक्षीय प्रास्ताविक

          संस्कृत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थान डॉ. शास्त्रींनी भूषविले. त्यावेळी केलेले प्रास्ताविकपर संस्कृत व्याख्यानाचा सारांश या लेखात आहे.

पहिले प्रवचन

          चंद्रहास शास्त्रींनी वयाच्या चौथ्या वर्षी संत श्री ज्ञानेश्वर माऊली जन्मस्थान, आपेगाव येथे पहिले प्रवचन केले. त्याची ही हृद्य आठवण आणि वै. गुरुवर्य श्री. विष्णूमहाराज गुरुजी कोल्हापूरकर यांच्या विषयीची कृतज्ञता या लेखात व्यक्त करण्यात आली आहे.  

आधुनिक केसरी परिवार: एक छान अनुभव

          डॉ. शास्त्री आधुनिक केसरी वृत्तपत्रातून सातत्याने लेखन करतात. या वृत्तपत्राच्या व्यवस्थापन आणि संपादन यांच्या बाबतीतील सकारात्मक अनुभवाचा आलेख या लेखात मांडण्यात आला आहे.

          अर्थातच हे पुस्तक वाचताना देखील आपण शास्त्रीजींचे व्याख्यान ऐकत आहोत, असे वाटते, इतके हे लिखाण प्रभावी आणि सहजतापूर्ण आहे. संस्कृत अध्यापिका आणि अभिज्ञान, पुणे च्या संचालिका सौ. मानसी चंद्रहास शास्त्री सोनपेठकर यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी सुप्रसिद्ध साहित्यिक ऋचा पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

          चंद्रहास शास्त्री यांच्या अमृततुल्य शब्दांनी ओथंबलेले हे चंद्रामृत रसिकांना नक्कीच आवडेल.

चंद्रामृत भाग २

शॉपिजेन प्रकाशन, अहमदाबाद

पृष्ठे ६५

किंमत १५०

 

 

 

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...