Sunday, April 23, 2023

प्रातिनिधिक वैदिक देवता

 

प्रातिनिधिक वैदिक देवता

-  डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर

 

          परब्रह्म तत्त्व अद्वितीय असले, तरी त्याच्या नाना रूपांची स्तुती नाना प्रकारे केली जाते. एकं सत् विप्राः बहुधा वदन्ति | अर्थात एक सत्य विद्वान लोक अनेक प्रकारे सांगतात, असे ऋग्वेदाच्या प्रथम मंडलातील १६४ व्या सूक्तात ४६ व्या मंत्रात म्हटले आहे. बृहद्देवता सारख्या ग्रंथांत देवतांविषयीचे सविस्तर वर्णन येते. वैदिक देवतांचा विचार करताना त्यांच्या स्थानांचा विचार करणे महत्वाचे ठरते. द्युस्थानीय देवता, अंतरीक्ष स्थानीय देवता आणि पृथ्वीस्थानीय देवता असा विचार केला जातो. संस्कृतमध्ये कोटी या शब्दाचा अर्थ प्रकार असा होतो. एकूण ३३ प्रकारच्या देवता आहेत. त्यांचे द्युस्थानीय देवता, अंतरीक्ष स्थानीय देवता आणि पृथ्वीस्थानीय देवता असे वर्गीकरण केले जाते. असेही मत अभ्यासक मांडतात.

          काही उल्लेखानुसार ८ वसू, ११ रुद्र आणि १२ आदित्य आणि २ अश्विनीकुमार  मिळून ३३ ही देवतांची संख्या सांगितली जाते.

          वेदातील या बहुतेक देवतांच्या विषयीचे सविस्तर वर्णन आपल्याला पुराणांत देखील आढळून येते.

काही प्रातिनिधिक वैदिक देवता म्हणून आपल्याला पुढील देवतांचा विचार करता येईल:

अग्नी:

अग्नी ही पृथ्वीस्थानीय देवता आहे. ऋग्वेदात अनेक (जवळपास २००) सूक्तांत अग्नी देवतेचे वर्णन येते. सनातन संस्कृतीत यज्ञप्रधानत्व आहे. त्यामुळे अग्नी सूक्तांची संख्या आधिक्याने दिसून येते. वैदिक साहित्यात अग्नीचे सुद्धा विविध प्रकार किंवा नामे आढळतात. ऋत्विक, होता, कवी, पुरोहित, अशी विविध विशेषणे आपल्याला वैदिक वाङ्मयात दिसून येतात.

सवितृ:

सवितृ ही द्युस्थानीय देवता आहे.  सवितृ म्हणजे प्रकाशाची देवता. सवितृ ही गायत्री मंत्राची उपास्य देवता आहे. हिरण्यपाणि, स्वर्णपाद, स्वर्णहस्त, स्वर्णनेत्र, स्वर्णजिह्व आदी विशेषणे सवितृ देवतेची वैदिक वाङ्मयात दिसून येतात.

विष्णु:

विष्णु ही द्युस्थानीय देवता आहे. सर्वव्यापकता असे या देवतेचे प्रमुख विशेषण वेदात आढळते. उरुक्रम, विक्रम, त्रिविक्रम इत्यादी विशेषणे वेदात आढळतात.

इंद्र:

इंद्र ही अंतरीक्ष स्थानीय देवता आहे. ऋग्वेदातील जवळपास २५० सूक्तांत इंद्र देवतेचे वर्णन आले आहे. तसेच अन्य सूक्तांत देखील इंद्र देवतेचे उल्लेख आहेत. वृत्रहा, शक्र, वज्रबाहु इत्यादी विशेषणांनी इंद्र देवतेचे वर्णन आढळून येते. सर्वच देवतांच्या बाबतीत एक गोष्ट ध्यानी घेतली पाहिजे की, ही त्यांची विशेषणे असली, तरी त्यांतील व्यवच्छेदकता महत्वपूर्ण असल्याने ही विशेषणे त्या त्या देवतांच्या नामाच्या रूपांत सुद्धा प्रयुक्त झाल्याचे दिसून येते.

 रुद्र:

त्र्यंबक, पशुपती, शिव, भव, शर्व इत्यादी विशेषणांनी किंवा नावांनी रुद्र देवतेचे वर्णन येते. महामृत्युंजय मंत्राचे हे उपास्य दैवत आहे. रुद्र सुद्धा अंतरीक्ष स्थानीय देवता होय. ऋग्वेद, यजुर्वेद यांत रुद्र देवतेचे वर्णन दिसून येते.

बृहस्पती:

बृहस्पती ही पृथ्वीस्थानीय देवता आहे. ऋग्वेदातील जवळपास ११ सूक्तांत बृहस्पती देवतेचे वर्णन आले आहे. सप्तरश्मी, सप्तजिह्व, ब्रह्मणस्पति आदी विशेषणे बृहस्पती देवतेसाठी प्रयुक्त आहेत. पौराणिक साहित्यात बृहस्पती हे देवराज इंद्राचे गुरु म्हणून वर्णित आहेत.

अश्विनीकुमार:

द्युस्थानीय देवता आहेत. युगल देवता म्हणून यांच्याकडे पाहिले जाते. सुंदर, युवक अशा या देवता आहेत. मधुयुवा, सुदानु इत्यादी नामे किंवा विशेषणे अश्विनीकुमारांची आढळून येतात.

वरुण:

वरुण ही द्युस्थानीय देवता आहे. ऋग्वेदात जवळपास १२ सूक्तांची देवता वरुण देवता आहे. ते जगताचे संचालन करतात. ते नियामक आहेत. असे वरुण देवतेचे वर्णन येते. धृतव्रत, ऋतगोपा, स्वराट् इत्यादी नामे किंवा विशेषणे वरुण देवतेची आढळून येतात.

उषस् किंवा उषा:

ही द्युस्थानीय देवता आहे. सुभगा, हिरण्यवर्णा, सुजाता, अमृता इत्यादी विशेषणे या देवतेची आढळून येतात. जवळपास २० सूक्ते या देवतेच्या विषयीची ऋग्वेदात आहेत. अत्यंत मनोरम असे वर्णन उषा देवतेचे आढळून येते.

सोम:

सोम ही पृथ्वीस्थानीय देवता आहे. ऋग्वेदातील जवळपास १५० सूक्तांत सोम देवतेचे वर्णन आले आहे. वनस्पतींमध्ये प्रमुख, इंद्रप्रिय, अमरत्व प्रदायक, रोग निवारक असे वर्णन सोम देवतेचे येते. अमर्त्य, सहस्रधार, शुद्ध आदी विशेषणे किंवा नामे यांच्या द्वारे सोम देवतेचे सुंदर वर्णन आले आहे. पुढील साहित्यात सोम देवतेचा समन्वय चंद्राशी वर्णित असल्याचे दिसून येते.

          वैदिक देवतांचा अभ्यास करताना शौनक ऋषी विरचित बृहद्देवता हा महत्वपूर्ण ग्रंथ आहे. यात १२०० श्लोक आणि ८ अध्याय आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायात ग्रंथाची भूमिका आहे. यात प्रत्येक देवतेचे रूप, स्थान आणि महिमा यांचे वर्णन आहे.

          वेद हे मूळ आहे. आणि यावर आपल्या संस्कृतीचा वृक्ष उभा आहे. या लेखात काही प्रातिनिधिक देवतांचा समावेश आहे. या देवतांचे स्वरूप पुढे पौराणिक कथांमधून सुंदर रीतीने वर्णित आहे. वैदिक संहितेच्या धावत्या विवेचनानंतर पुढील लेखांत आपण उपनिषदांचे वर्णन करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

          एक गोष्ट या ठिकाणी विशेषत्वाने नमूद करावी वाटते की, संस्कृत साहित्य परिचयाचा हा स्तंभ अनेक वाचकांना आवडला आहे. त्यांनी तसे अभिप्राय कळविले आहेत. संस्कृत साहित्य अथांग आहे. त्यातील काही अमृतकण दै. राष्ट्रसंचारच्या वाचकांपर्यंत पोचविण्याचा किंवा (आधुनिक भाषेत) शेअर करण्याचा हा एक प्रयत्न आहे. वैदिक संहिता हा उपविषयाचे समापन या लेखाने करीत आहोत. पुढील लेखांकात भारतीय तत्त्वज्ञानाच्या आधारभूत असे ज्यांना मानले जाते, ती उपनिषदे हा विषय असेल.

इति लेखनसीमा.

 

 

Saturday, April 15, 2023

वैविध्यपूर्ण अथर्ववेद डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर

 

लेखांक ६. वैविध्यपूर्ण अथर्ववेद

डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर

          अथर्ववेदाला ब्रह्मवेद असेही म्हणतात. यामध्ये देवतांच्या स्तुतीबरोबरच वैद्यक, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाचेही मंत्र आहेत. अथर्ववेदात वर्ण्य विषयांचे वैविध्य दृष्टिगोचर होते. वर्ण्य विषयांच्या नुसार अथर्ववेदाला विविध नामे प्राप्त झाल्याचे दिसून येते.

 

अथर्ववेदाची विविध नामे:

१) अथर्ववेद :

थुर्वी धातू हा हिंसा या अर्थी आहे. त्याच्यापासून थर्व शब्द मिळतो. अत: अहिंसा या अर्थी अथर्व हा शब्द सिद्ध होतो.

२) अथर्वाङ्गिरोवेद:

मुनी अथर्व आणि मुनी अंगिरस यांच्या नावावरून या वेदाला प्रस्तुत अभिधान प्राप्त झाल्याचे आख्यान प्राचीन संस्कृत साहित्यात (गोपथ ब्राह्मण ग्रंथात) आढळते.

३) ब्रह्मवेद:

यज्ञकर्मात ब्रह्मत्व प्रतिपादन, ब्रह्मविषयक तात्त्विक चिंतन आणि ब्रह्मा नामक मंत्रद्रष्टे ऋषी यांमुळे या वेदाला ब्रह्मवेद असे अभिधान प्राप्त झाले असण्याची शक्यता आहे.

४) भिषग्वेद:

अथर्ववेदात अनेक औषधींचा उल्लेख आहे. भिषग् म्हणजे औषधी होय. यासाठी प्रस्तुत नाम अथर्ववेदाला प्राप्त झाले आहे. आयुर्वेदाचे मूळ देखील अथर्ववेदात असल्याचे दिसून येते.

५) क्षत्रवेद:

अथर्ववेदात स्वराज्य रक्षणासाठी राजकर्मसंबंधित अनेक सूक्त आहेत. अत: क्षत्रवेद हे नामाभिधान अथर्ववेदाला प्राप्त झाले आहे.  

 

अथर्ववेदाच्या शाखा:

अथर्वसंहितेच्या नऊ शाखा उल्लिखित आहेत:

          १. पैप्पलाद, २. तौद, ३. मौद, ४. शौनक, ५. जाजल, ६. जलद, ७.ब्रह्मवद, ८. देवदर्श  ९. चारणवैद्य

          मात्र वर्तमान काळात अथर्ववेदाच्या पैप्पलाद आणि शौनक या दोनच शाखांची माहिती मिळते. यातही पैप्पलाद शाखा पूर्ण उपलब्ध नाही.

शौनक शाखा:

शौनक शाखेची संहिता उपलब्ध आहे. यात २० कांड, ७३० सूक्त, ३६ प्रपाठक आणि ६००० च्या जवळपास मंत्र अशी संख्यात्मक योजना आहे.

प्रथम कांड ते सप्तम कांडपर्यंत लहान सूक्ते आहेत. कांड ८ ते कांड १२ यांत विविध विषयांवरील मोठी सूक्ते आहेत. कांड १३ ते २० यांत मोठी सूक्ते आहेत, मात्र त्यांच्या वर्ण्यविषयांत अनुधावन असल्याचे दिसून येते. अथर्ववेदाच्या शौनक शाखेतील १२ व्या कांडात पृथ्वी सूक्त आहे. ते प्रसिद्ध असे सूक्त आहे. माता भूमि पुत्रोहं पृथिव्या:। अर्थात भूमी ही आमची माता आहे, मी तिचा पुत्र आहे, असे वर्णन या सूक्तात येते. “भारतमाता” या संज्ञेची वैचारिक पृष्ठभूमी आपल्याला या सूक्तात दिसून येत नाही काय?

 

अथर्ववेदाचे वर्ण्य विषय:

भूगोल, खगोलशास्त्र, वनस्पतिशास्त्र, असंख्य वनौषधी, आयुर्वेद, रोगांचे निदान आणि उपचार, अर्थशास्त्राची मूलभूत तत्त्वे, राजकारणातील गुह्य विषय, राष्ट्रभूमी, राष्ट्रभाषा, शस्त्रक्रिया, विविध रोगांवरील उपचार इत्यादींचे वर्णन अथर्ववेदात आहे. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून अथर्ववेदाचे महत्त्व अत्यंत वाखाणण्याजोगे आहे. अथर्ववेदात शांती-पुष्टी कर्म आणि अभिचार कर्म या दोन्हींचे वर्णन आहे. अथर्ववेदात विविध विषयाचे वर्णन आले आहे. त्यांचा थोडक्यात परिचय पुढीलप्रमाणे:

१) ब्रह्म सिद्धांत:

अथर्ववेदात ब्रह्म म्हणजे काय? त्याचे स्वरूप कसे आहे? अशा अनेक आध्यात्मिक विषयांचे चिंतन आढळते. वैदिक वाङ्मयाच्या ज्ञानकांडाची पार्श्वभूमी जणू अथर्ववेदात सिद्ध झाल्याचे दिसून येते. परब्रह्मविषयक अत्यंत सूक्ष्म अशा प्रकारचे चिंतन अथर्ववेदात दिसून येते.

२) भैषज्य कर्म:

विविध रोगांच्या उपचारासाठी प्रयोग केले जाणारे भैषज्य सूक्त यांचे वर्णन अथर्ववेदात

 येते. या सूक्तांत विविध देवतांचे आवाहन, प्रार्थना तसेच रोगांची नावे आणि त्यांच्या निराकरणार्थ विविध औषधींची नावे येतात.

३) शांतिक पौष्टिक मंत्र:

विविध प्रकारच्या अवांछित गोष्टींपासून मुक्त होण्यासाठी शान्तिक मंत्र असतात. तर ऐश्वर्याच्या अभिसिद्ध्यर्थ पौष्टिक मंत्र असतात. त्यांचाही समावेश अथर्ववेदात आहे.

४) राजकर्म:

राजाची कर्तव्ये, दंडविधान, राजाचे अधिकार, राज्याभिषेक इत्यादी विषयांचे सविस्तर वर्णन अथर्ववेदात आहे.

५) सांमनस्य कर्म:

अथर्ववेदात राष्ट्रीय, सामाजिक, कौटुंबिक सामंजस्य राहावे, यासाठी विविध सूक्तांच्या स्मरणाचे विधान प्रतिपादन करण्यात आले आहे. परस्पर सामंजस्याला या वेदात विशेष महत्व प्रतिपादन करण्यात आल्याचे दिसून येते.

६) प्रायश्चित्त:

विविध कर्मातील ज्ञात अज्ञात त्रुटी, या दृष्टीने क्षमा प्रार्थना, प्रायश्चित्त इत्यादींचे वर्णन अथर्ववेदात दिसून येते.

७) आयुष्कर्म:

स्वास्थ्य, आरोग्य, दीर्घायू यांसाठी विविध सूक्त, विविध कर्म यांचे वर्णन अथर्ववेदात आहे.

८) अभिचार कर्म:

अथर्ववेदात काही मंत्र अभिचारविषयक आहेत. मात्र त्यांची संख्या कमी आहे. मारण, उच्चाटन आदींसाठी अभिचार ही संज्ञा प्रयुक्त केली जाते.

 

अथर्ववेद – संबंधित ग्रंथ:

गोपथ ब्राह्मण ग्रंथ अथर्ववेदाच्या पैप्पलाद शाखेशी संबंधित आहे. यात पूर्व आणि उत्तर असे दोन भाग आहेत.

वैतान सूत्र हे अथर्ववेदाच्या संबंधित श्रौत सूत्र आहे. ते शौनक शाखेशी समन्वित आहे.

संहिताविधि नामक गृह्य सूत्र अथर्ववेदाच्या संबंधित आहे. यात शौनक संहितेचे विनियोग प्रतिपादित आहेत.

मांडुकी शिक्षा हा अथर्ववेदाच्या संबंधित उच्चारणाचे मार्गदर्शन करणारा शिक्षा ग्रंथ आहेत.

याशिवाय नक्षत्रकल्प इत्यादी कल्पग्रंथ देखील अथर्ववेदाच्या संबंधित आहेत.

प्रश्न, मुंड, मांडुक्य ही उपनिषदे अथर्ववेदाच्या संबंधित आहेत. या उपनिषदांत परब्रह्म तत्त्वाचे निरूपण करण्यात आले आहे.

          एकंदरच अथर्ववेद हा वेदराशीचा चतुर्थ भाग आहे. यातील वर्ण्यविषय हे आध्यात्मिक आणि लौकिक असे दोन्ही दृष्टीने महत्वपूर्ण आहेत.

          वेदांमध्ये विविध देवतांचे वर्णन येते. त्या वैदिक देवताविषयक वर्णन पुढील लेखांकात......

इति लेखनसीमा.

Friday, April 14, 2023

|| डॉ. चंद्रहास शास्त्री यांची Shopizen द्वारे प्रकाशित पुस्तके ||



मनोज्ञा 

रं तर एक वय असं असतं की, तेव्हा बहुतेक माणसं कवी किंवा कवियत्री असतात. त्या वयात कविता होत जातात. त्यात निर्व्याजता असते. त्या वयातील ही सवय आयुष्यभर जपली, की कविता अकृत्रिम होतात. या काव्यसंग्रहातील अधिकाधिक कविता या अर्थाने अकृत्रिम आहेत. विशुद्ध प्रेम, मैत्री, अनुराग, स्नेह अशा भाव तरंगांना सामावून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या या कविता आहेत. या कवितेत ओढून ताणून आणलेले यमक नाहीत. तंत्र प्रधानता नाही. या कवितेत मनाचं प्राधान्य     

  आहे. ही कविता बुद्धीच्या फुटपट्टीने नव्हे, तर मनाने छान आस्वाद घेण्यासाठी आहे. म्हणून तर या काव्यसंग्रहाला मनोज्ञा  असे अभिधान दिले आहे.

प्रकाशन: मार्च २०२३

ISBN: 978-81-960586-9-2

https://shopizen.in/book-details?id=NjA0NDg=  

 

Reflection Of Values In Raghuvansham  

To study which moral values were accepted in our ancient society, We’ve to study our ancient literature. Sanskrit literature is one of the ancient literatures in the world. Kalidasa is the greatest poet in the world. He is known as Indian Shakespeare. So, it becomes important to study his devotion in the field of value-education.

प्रकाशन: मार्च २०२३

ISBN: 978-81-19193-06-6

https://shopizen.in/book-details?id=NjA0NDc=

 


 चंद्रामृत

भाग १ व २ 

चंद्रामृत भाग १ व ही पुस्तकं आपल्या हाती देताना आनंदाची अनुभूती येत आहे. अनेक ठिकाणी व्याख्यान प्रवचन वृत्तपत्र लेख आदि निमित्तेकरून विविध विषयांवर चिंतन मांडण्याची संधी मिळते. मात्र अशा व्याख्यानांची लिखित टिपणं तयार करण्याची सवय मला नव्हती. मी वक्ता म्हणून चिंतन मांडतो. अनेकदा ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी पासून उपस्थित सर्व त्यांचे अभिप्राय देतात. आणि त्या संभाषणाची परिपूर्ती होते. असा प्रघात अनेक वर्षेसुरु आहे. मात्र या प्रवचन किंवा व्याख्यानांच्या निवडक विषयांचे लेख असावेत आणि त्या लेखांचा संग्रह असावा, जेणेकरून हे चिंतन अधिकाधिक लोकांपर्यंत पोचेल, यासाठी हा लेखन-प्रपंच!

प्रकाशन: फेब्रुवारी २०२३

ISBN: 978-93-5600-591-4

& 978-93-5600-611-9

चंद्रामृत भाग https://shopizen.in/book-details?id=NTg2MzM=

चंद्रामृत भाग https://shopizen.in/book-details?id=NTkzMDQ=

 


 नीतिशतक निरुपण

नीतिशतक निरुपण हा ग्रंथ प्रवचनकार, कीर्तनकार, व्याख्याते, नीति-साहित्याचे अभ्यासक, संस्कृत साहित्याचे अभ्यासक यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा असा ग्रंथ आहे. या ग्रंथात डॉ. चंद्रहास शास्त्री यांनी संस्कृत कवी भर्तृहरीविरचित नीतिशतकातील श्लोकांचे निरूपण प्रतिपादन केले  आहे. संस्कृत श्लोक आणि त्याचे मराठी निरूपण असे स्वरूप या पुस्तकाचे आहे.

प्रकाशन: मे २०२२

ISBN: 978-93-5600-300-2

https://shopizen.in/book-details?id=NTAyNzU=  

 

 


श्रीरेणुकाशरणम् 
                 

श्रीरेणुकामातेची हृद्य स्तुती डॉ. चंद्रहास शास्त्रींनी विविध छंदांत १०० हून अधिक संस्कृत श्लोकांत केली आहे. संस्कृतात आधुनिक काळात देखील सृजनात्मक लेखन झाले पाहिजे, या भूमिकेतून भक्तीरसोत्कट अशी ही रचना प्रस्तुती शास्त्रीजींनी केली आहे. संस्कृत श्लोक आणि मराठी अनुवाद असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. तसेच या पुस्तकात श्रीरेणुकामातेला उद्देशून असलेल्या शास्त्रीजींच्या भक्तीरसप्रधान मराठी राचानांचाही समावेश करण्यात आला आहे.  विशेष म्हणजे या पुस्तकाला सुप्रसिद्ध निरूपणकार श्री. विवेकजी घळसासी यांचे शब्दकुसुमांच्या रूपात अतिशय सुंदर असे आशीर्वचन लाभले आहे.  

प्रकाशन: एप्रिल २०२२

ISBN: 978-93-5600-191-6

https://shopizen.in/book-details?id=NDg4NjA=    

 


सार्थ श्रीदेवीस्तोत्रे 

क्ती उपासनेची एक समृद्ध परंपरा भारतवर्षाला लाभलेली आहे. अगदी प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक काळातही श्रीदेवीच्या नितांत सुंदर स्तोत्रांची रचना आपल्याला आढळते. सुप्रसिद्ध प्रवचनकार ह.भ.प. डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर यांच्या घराण्याला श्रीदेवीभक्तीची थोर परंपरा लाभली आहे. डॉ. शास्त्रीजींनी संकलित आणि अनुवादित केलेल्या नित्यपाठासाठी (मराठी अर्थासह) श्रीदेवीस्तोत्रे हे पुस्तक नवरात्री उत्सवाच्या मंगल समयी प्रकाशित करताना आम्हाला एका आध्यात्मिक आनंदाची अनुभूती होत आहे. असे मन्तव्य शॉपिज़न प्रकाशनाने या पुस्तकाविषयी अभिव्यक्त केले आहे.

प्रकाशन: ऑक्टोबर २०२१

ISBN: 978-93-5600-049-0

https://shopizen.in/book-details?id=NDE5MzU= 

Saturday, April 8, 2023

संगीतशास्त्राशी संबंधित सामवेद

 संस्कृत साहित्य परिचय - लेखांक ४

संगीतशास्त्राशी संबंधित सामवेद

डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर

         सामवेदाची परंपरा जैमिनी ऋषींपासून सुरु होते. वेदाचा गीति भाग असे सामवेदाला मानण्यात येते. सहस्रवर्त्मा सामवेद:| अर्थात सामवेदाच्या १००० शाखा असाव्यात असे उल्लेख मिळतात.

या शाखांपैकी आज केवळ तीन शाखा आढळतात –

१. राणायन २. कौथुमीय आणि ३. जैमिनीय

राणायन शाखा विशेषत: दक्षिण प्रांतात प्रचलित आहे. कौथुमीय शाखा उत्तर भारतात आढळते. तर केरळ प्रांतात जैमिनीय शाखा प्रचलित आहे.

 

आचार्य:

सामवेदाच्या परंपरेत १३ आचार्यांचे उल्लेख आढळतात:

१. राणायन २. सात्यमुग्री – व्यास ३. भागुरी – औलुंडी ४. गौल्मुलवी ५. भानुमान ६. औपमन्यव

७. दाराल ८. गार्ग्य ९. सावर्णी १०. वार्षगणी ११. कुथुमी १२. शालिहोत्र १३. जैमिनी

 

सामवेदाची संरचना:

मंत्रभागात आर्चिक आणि गान असतात. आर्चिकाचे पूर्व आणि उत्तर असे दोन भाग असतात. दोहोंत एकूण २७ अध्याय १८७५ मंत्र आहेत. यापैकी ७५ मंत्र वगळता अन्य १८०० मंत्र ऋग्वेदातही येतात.

गान भागात तीन प्रकारचे साम असतात. केवळ ऋचेच्या पदात गायिलेला साम आवि: होय.

ऋक्पद आणि स्तोभ यांनी युक्त गायिलेला साम लेश होय.

अखिल स्तोभात गायिलेला साम छन्न होय. ऋक्पदातील अक्षरांहून भिन्न पदांना स्तोभ असे म्हणतात.

 

ब्राह्मण ग्रंथ:

सामवेदाच्या आठ ब्राह्मण ग्रंथांचा उल्लेख सायणाचार्य भाष्यात आढळतो. त्यानुसार त्यांची नावे पुढीलप्रमाणे –

१. प्रौढ (तांड्य) ब्राह्मण २. षड्विंश ब्राह्मण ३. सामविधान ब्राह्मण ४. आर्षेय ब्राह्मण ५. देवताध्याय ब्राह्मण ६. छांदोग्य ब्राह्मण ७. संहितोपनिषद ब्राह्मण ८. वंश ब्राह्मण

 तांड्य ब्राह्मण ग्रंथाला पंचविंश किंवा महाब्राह्मण असेही म्हणतात. यातील पंचविंश हे नाव अध्यायांच्या संख्येवरून आहे. तर महाब्राह्मण हे नाव आकारावरून आहे. याशिवाय जैमिनी शाखेशी संबद्ध असेही काही ब्राह्मण ग्रंथ आहेत.

या ब्राह्मण ग्रंथात यज्ञीय स्तोत्रांच्या गायनाचे वर्णन आहे. त्याला औदगात्र कर्म असे म्हणतात. उद्गाता, प्रस्तोता आणि प्रतिहर्ता नामक साम गायक यज्ञात विविध देवतांची स्तुती गातात.

तसेच या ग्रंथांत विविध आख्याने, कथानक यांचाही समावेश आहे.

षड्विंश ब्राह्मण ग्रंथात स्मार्त याग आणि साम यांचे विधी प्रतिपादित केले आहेत.

सामविधान ब्राह्मण ग्रंथात क्रुष्ट, प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ मंद्र, अतिस्वार या सात स्वरांनी देव, मानव. पशु, गंधर्व, अप्सरा, पितृ गण, पक्षी, असुर, सर्व स्थावर जंगम वस्तू यांची तृप्ती होते, असे वर्णन येते.

आर्षेय ब्राह्मण ग्रंथात सामांच्या नावांच्या संबंधित ऋषींचे नामोल्लेख आहेत. मंत्रद्रष्ट्याऋषींच्या वर्णनामुळे या ग्रंथाचे नाव आर्षेय असे रूढ झाले असावे.

देवताध्याय ब्राह्मण ग्रंथात साम संबंधित देवतांचे उल्लेख आहेत.

छांदोग्य उपनिषद ब्राह्मण ग्रंथात १० प्रपाठक आहेत. प्रपाठक १ आणि २ मध्ये विवाहादि मंत्रांचे उल्लेख आहेत. आणि उर्वरित ८ प्रपाठक उपनिषद आहे. यात सामाच्या सारतत्वाला स्वर असे म्हणले आहे. यात सामगानाचे महत्व प्रतिपादन करण्यात आले आहे.

संहितोपनिषद ब्राह्मण ग्रंथात सामसंहितेचे रहस्य सांगितले आहे. याचे पाच खंड आहेत.

वंश ब्राह्मण ग्रंथात तीन खंड आहेत. यात साम अध्ययन परंपरा प्रतिपादन करण्यात आली आहे.

 

 

सूत्र ग्रंथ :

द्राह्यायण, लाट्यायन हे दोन श्रौत सूत्र, खादिर, गोभील हे दोन गृह्य सूत्र आणि गौतम धर्म सूत्र प्रस्तुत वेदाशी संबंधित आहेत.  गौतम धर्म सूत्र यात २८ अध्याय आहेत. यात राजधर्म, नित्यकर्म इत्यादींचे वर्णन आहे.

शिक्षा ग्रंथ:

सामवेदाच्या उच्चारणाचे वर्णन करणारे काही शिक्षा ग्रंथ आहेत: यात नारदीय शिक्षा ग्रंथ, गौतम शिक्षा ग्रंथ आणि लोम शिक्षा ग्रंथ यांचा समावेश होतो. तीनही शिक्षा ग्रंथांत दोन प्रपाठक, १६ कंडिका, आहेत. सामवेदीय प्रातिशाख्य ग्रंथ सुद्धा साम वेदाच्या उच्चारणाचे मार्गदर्शक आहेत. तसेच यासाठी साम तंत्र, ऋक् तन्त्र इत्यादी ग्रंथ आहेत.

आरण्यक ग्रंथ:

तवलकार आरण्यक जे जैमिनीयोपनिषद म्हणून देखील प्रसिद्ध आहे. यात चार अध्याय आहेत.

 

उपनिषद ग्रंथ:

केनोपनिषद आणि छांदोग्य उपनिषद ही सामवेदाशी संबंधित अशी उपनिषदे आहेत. यात ब्रह्म विद्या निरूपण करण्यात आले आहे.

 

विशेष:

सामवेदापासून संगीताची उत्पत्ती मानण्यात येते. संगीतरत्नाकर या ग्रंथातही ब्रह्मदेवाने सामवेदापासून गीतांचा संग्रह केला, असे वर्णन येते. सामवेदादिदं गीतं संजग्राह पितामह: | असे म्हटले आहे. भरत मुनींनी देखील अशाच प्रकारचे प्रतिपादन केले आहे. भगवान श्रीकृष्णांनी गीतेतही साम वेदाचे महत्व प्रतिपादन केले आहे.

          चतुर्वेदात सामवेदानंतर अथर्ववेदाचा क्रमांक येतो. त्याचे वर्णन पुढील लेखांकात ......!

इति लेखनसीमा.

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...