Tuesday, April 27, 2021

महाकवी कालिदासाविषयी....................!

 

महाकवी कालिदासाविषयी....................!
    
डाॅ. चंद्रहासशास्त्री सोनपेठकर
कोणत्याही भाषेच्या श्रीमंतीचा विचार करताना त्या भाषेचे व्याकरण, उच्चारणशास्त्र, दर्शनादि तत्त्वज्ञानपरक ग्रंथ, काव्य-नाटकादि साहित्य ग्रंथ, समीक्षा ग्रंथ यांचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. या सर्वच क्षेत्रात संस्कृतशारदेने भव्यतेचे सिंहासन आणि दिव्यत्वाचे नितांत सुंदर रूप धारण केल्याचे दिसून येते. वाल्मिकी, व्यासादि ऋषी, महाकवी भास, बाणभट्टासारखे साहित्यिक, बादरायण, शंकराचार्य यांसारखे तत्त्वज्ञ, आर्य चाणक्य, चरक, भरतमुनी यांसारखे शास्त्रकार, पाणिनी सारखे व्याकरण व उच्चारशास्त्राचे ज्ञाते अशी या संस्कृत सारस्वतांची मांदियाळी आहे. यातीलच एक विश्वप्रसिद्ध अभिधान म्हणजे कविकुलगुरु महाकवी कालिदास.
महाकवी कालिदास कोणत्या प्रांतात हावून गेला? त्याचा नेमका कालखंड कोणता? अशा प्रकारच्या प्रश्नांना उत्तर देणे हे सनावळी आणि वंशावळीच्या ऐतिहासकि भाषेत देणे किंवा शोधणे आकाशाला गवसणी घालण्यासारखे आहे. पण भाव, अनुभाव आणि रसांची शिंपण करणा-या साहित्याच्या भाषेत या प्रश्नाचे उत्तर देणे अधिक सुलभ ठरते. महाकवी कालिदासाचा प्रांत साहित्य आणि त्याचा काळ अजरामर हाच होय.
इतिहास जेव्हा स्पष्ट बोलू शकत नाही, तेव्हा अनेक दंतकथा उदयास येतात. या नियमास कालिदासही अपवाद नाही. पण कालिदास कालजयी ठरला, यात या दंतकथांचे नव्हे, तर त्याच्या साहित्यकृतींचे योगदान आहे. मेघदूत व ऋतुसंहार ही दोन खंडकाव्ये, कुमारसंभव व रघुवंश ही दोन महाकाव्ये आणि मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय व अभिज्ञान शाकुतल ही तीन नाटके या आपल्या सप्तकृतींनी कालिदास साहित्यविश्वात चिरंजीवी ठरला आहे.
मेघदूत हे कालिदासाचे खंडकाव्य आहे. यात यक्षाची विरहकथा अनेक रम्य उपमा, सृष्टीचे मानवीकरण अशा माध्यमातून चितारले आहे. युरोपीय महाकवी गटे हा मेघदूत वाचल्यानंतर ते काव्य डोक्यावर घेवून नाचला. इतके हे खंडकाव्य रसपरिपुष्ट आहे. कुबेराच्या शापामुळे स्वर्गभ्रष्ट झालेला यक्ष महाराष्ट्रातील रामटेक येथे राहण्यास येतो, विरहतप्त असा तो यक्ष आपल्या प्रियतमेस मेघ म्हणजे ढगाच्यामार्फत संदेश पाठवितो. असे कथानक मेघदूतात आहे.
ऋतुसंहार या ख्ंाडकाव्यात मुख्यत्वे ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर आणि वसंत या  सहा ऋतूंचे वर्णन आले आहे. ‘सर्वं चारुतरं वसन्ते’ अशी वर्णने या काव्यात येतात. शेक्सपिअर शोकांतिकांचा बादशहा म्हणून ओळखला जातो, तर कालिदास सुखांतिकांचा सम्राट. ऋतुसंहारात वसंत ऋतूचा क्रम यामुळेच शेवटचा असण्याचा संभव आहे.
संस्कृतसाहित्यात पाच महाकाव्यांना विशेष महत्व आहे, त्यात दोन महाकाव्ये कालिदासाची आहेत. त्यातील एक कुमारसंभव. भगवान शिव पती म्हणून लाभावेत यासाठी हिमालयकन्या पार्वतीचे तपाचरण, कामदेवाचे शंकराच्या तिस-या नेत्राने भस्म होणे, शिवपार्वतीविवाह, कुमार कार्तिकेयाचा जन्म, पराक्रम असे कथानक यात येते. ‘‘शरीरमाद्यं खलुधर्मसाधनम्’’ अशा सुवचनांची शिंपण, कथाप्रसंगांची गुंफण आणि उपमावैविध्य यांनी या महाकाव्याच्या सौंदर्यात भर घातली आहे. अर्थात क्षेमेंद्रप्रभृती समीक्षकांना शिवपार्वतीश्रृुगाराचे वर्णन करणे मानवेलेले नाही.
रघुवंश हे कालिदासाचे दुसरे महाकाव्य. यात त्याची प्रगल्भता विशेषत्वाने जाणवते. रामायणातील दिलीप, रघु, अज, दशरथ, रामप्रभु इ. राजांची रसाळ चरित्रवर्णने यात आहेत. कालिदासाला ‘‘दीपशिखा कालिदास’’ असे नामाभिधान किंवा ओळख रघुवंशाने दिली. यात कालिदासाने ‘इंदुमतीस्वयंवर’-वर्णनात तिला दीपशिखा अशी सार्थ उपमा दिलेली आहे. या महाकाव्याद्वारे जणु कालिदासाने आदर्श राजा कसा असावा, याचा वस्तुपाठच घालून दिला आहे. काव्यातून जीवनमूल्यांचा अकृत्रिम उपदेश करण्याचे कालिदासाचे हे कौशल्य मम्मटाने सांगीतलेले ‘कांतासंमिततयोपदेशाचे प्रयोजन’ सार्थ करणारे आहे.
रसाळ ख्ंडकाव्ये, वेल्हाळ महाकाव्ये आणि मानवी मनाचा नेमका ठाव घेणारी नाटके कालिदासाच्या नावावर आहेत. राजकन्या मालविका, देवकन्या उर्वशी आणि ऋषीकन्या शकुंतला यांच्या व्यक्तिरेखा कालिदासाने क्रमशः मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय आणि शाकुंतलातून साकारल्या. ही नाटके अभ्यासल्यानंतर ‘‘स्त्रीहृदयं कालिदासेनैव ज्ञातम्’’ अशी अनुभूती सहृदय रसिक प्रेक्षकाला येतेच येते. या तीनही नाटकांत मुख्य रस श्रृंगार आहे. विरहामुळे प्रेमभावनेस दिव्यता प्राप्त होते. असा जणु संदेशच यातून कालिदासाने दिला आहे. तसेच अग्निमित्र, विक्रम आणि दुष्यंत असे धीरोदात्त नायक यांत आहेत. अर्धोक्ती, नकारोक्ती, पुनरुक्ती यांची सप्रयोजन रचना, कथानक पुढे नेणारे गद्य आणि रसपरिपोष साधणारे तसेच औचित्य सिद्धांतास बळ देणारे छन्दोबद्ध श्लोक ही कालिदासाच्या नाटकाची वैशिष्ट्ये आहेत.
कालिदासाच्या एकंदर साहित्यरचनेचे दोन विशेष आपल्याला दिसून येतात. एक तर त्याची शैली आणि दुसरे उपमा अलंकार. माधूर्यव्यंजक वर्णांनी युक्त, समासाचा अल्प प्रयोग अशा साहित्यशैलीस ‘वैदर्भीरीती’ म्हणतात. महाकवी कालिदास या शैलीचा आचार्य मानला जातो. ‘‘वैदर्भीरीतिसन्दर्भे कालिदासो विशिष्यते’ असे याचसाठी म्हणले जाते. कालिदासाच्या बाबतीत आणखी एक प्रसिद्ध उक्ती म्हणजे ‘उपमा कालिदासस्य’. संचारिणी दीपशिखा, अनाघ्रातं पुष्पम् इत्यादि असंख्य उपमा प्रसिद्ध आहेत. काव्याच्या प्रसाद, ओज आणि माधूर्य या तीनही गुणांचा प्रयोग कालिदासाच्या काव्यांत आढळतो. त्याच्या साहित्यात माणसांसोबत निसर्ग व त्यातील घटक देखील पात्राची भूमिका वठवतात. शाकुंतलातील भ्रमरप्रसंग याचेच उदाहरण आहे. भावना प्रकट न करता प्रकट करणे किंवा प्रकट करूनही प्रकट न करणे असे विलक्षण कौशल्य त्याचेकडे होते. ‘‘शैलाधिराजतनया न ययौ न तस्थौ।’’ अर्थात ती पर्वतराजकन्या पुढेही गेली नाही आणि थांबलीही नाही किंवा ‘‘मदनो न च संवृतः न च विवृतः।’’ अर्थात प्रेमभाव प्रकटही केला नाही आणि लपवलाही नाही अशी वर्णने याची साक्ष देण्यास पर्याप्त आहेत.
आपण भारतीयांनी तर कविकुलगुरु, कविताकामिनीचा विलास आदि शब्दांनी कादिासाला गौरविले आहेच. पण अन्यदेशस्थ विद्वांनाना देखील या भारतगौरव कालिदासाच्या प्रतिभेने भूरळ घातली आह
      
बाणभट्टाचा अपवाद वगळता बहुतेक संस्कृत कवींनी आत्मश्लाघा टाळण्यासाठी किंवा एक तत्कालीन परंपरा म्हणून स्वतःचा फारसा जुजबी असा परिचय दिलेला नाही. त्यामुळे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात.
वागर्थाविवसंपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये। जगतः पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ।। असे म्हणून शिवपार्वतीस वंदन करणारा कालिदास शैव होता काय? की पार्वतीप आणि रमेश्वर असा विग्रह करून येथे शिव आणि विष्णु असा अर्थ केल्यास तो हरिहराचा भक्त होता, असे सिद्ध होते? नावाप्रमाणेच कालिमातेचा भक्त असा कालिदास शाक्त होता काय? रघुवंश आणि मेघदूताचा रचनाकार म्हणून तो वैष्णव होता काय? मेघदूतात मेघाला थोडेसे वळण घ्यावे लागले, तरी चालेल पण उज्जयिनीस अवश्य जा; असे सांगणारा कालिदास उज्जयिनीचा की यक्षाला अलकानगरीस जावयास सांगणारा कालिदास काश्मीरचा? असे अनेक प्रश्न आपल्याला पडण्याची शक्यता आहे. तो नेमका कोणाच्या दरबारात राजकवी होता? विक्रमादित्याच्या की भोजाच्या दरबारात? त्याचे आईवडील, जन्म, मृत्यु याबाबत फार ठोस असे काही ऐतिहासिक तथ्ये प्राप्त होत नाहीत. मिळतात; त्या दंतकथा. पण या दंतकथांपेक्षाही सरस आहेत; त्या त्याच्या साहित्यकृती. या साहित्यकृतींवरून तो वेद, ज्योतिष्यादि वेदांगे, दर्शन, पुराण, आर्ष महाकाव्य यांचा अभ्यासक असावा, त्याच्या साहित्यकृतीत तपोवनांचे वर्णन विशेषकरून येते. म्हणून तो कोणत्यातरी गुरुकुलाचा विद्यार्थी असावा; असे अनुमान करणे तेवढे शक्य आहे.
इति लेखनसीमा. (Published article in News Paper by Chandrhas)

एकंदरच महाकवी कालिदास हा भारताचा अभिमान आहे. इ.स. पूर्व 150 ते इ.स. 475 या कालावधीत तो केव्हातरी झाला असावा, असे साररूपाने म्हणता येईल. आज सहस्रावधी लोटल्यानंतरही, मेघदूतातील ‘‘आषाढस्य प्रथमदिवसे.....’’ या वर्णनाचा धागा पकडून सर्वत्र कालिदासदिन आषाढमासी साजरा केला जातो.

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...