अंबाबाईचा उदो उदो।
मी त्या शक्तीला अनामिक म्हणू शकत
नाही। शक्ती हे सुद्धा तिचं एक नाव आहे। ती अनेक नावांनी प्रसिद्ध आहे। मी पाहतोय, एखाद्या हिंस्र (सिंहाला मी हिंस्र
मानत नाही।) पशु समोर लहान बालक अगदी रांगणारं बसलेलं असतं। आई येते। पटकन त्याला
ऊराशी घेते। तसंच काहीसं....। संकट येतंय असं दिसलं की, ती अंबाबाई आपल्याला बालकाचं रूप
(निरागस) देते. आणि मग ऊराशी घेते उचलून। संकटही सौम्य करते। एखादी रेल्वे कशी मंद
होत रेल्वेस्थानकात येते; अगदी तसं। कोणी म्हणेल संकट सौम्य का
करते? ते नाहीसं का करीत नाही? उत्तर अगदी सोप्पंय। आपली श्रद्धा कमी
पडते ना! आपल्याला वाटत असतं। मी केलं।मी करतो। एकदा हा अहंकार विगलित झाला की, मग लक्षात येतं, आपण कर्ते नाहीयेत. ती जगदंबाच
कर्त्री आणि नियन्त्री। आपण फक्त यंत्र। ती यंत्री।
अद्वितीय ती आणि तिची योजनाही। अकल्पित, कधी अल्पकल्पित असं ती क्षणात
देते।कल्पितही देते। तशी माणसं समोर येतात। आपणहून सहकार्य करतात।
संकटं नसतानाही ती आपल्यावर कृपा करत असते। आपल्याला जाणवत नाही।
संकटातून वाचवलं की श्रद्धा दृढ होते। म्हणून कुन्तीमातेने भगवन्ताला विपत्ती
मागीतली।
सर्वात छान गोष्ट काय, तर सुखाच्या प्रत्येक घासागणिक आपल्याला तिच्या कृपेचं वात्सल्याचं
स्मरण असावं। मग संकट येऊ शकत नाही।
मी हे लिहीतोय। का लिहीतोय माहीत नाही। सूचतंय म्हणजे तिची आज्ञा
आहे। लिहीता येतंय म्हणजे ती लिहून घेतेय। तुम्ही वाचतांय म्हणजे ती वाचवून घेतेय, तुमच्याकडून।
यशाची एकच व्याख्या होऊ शकते, प्रत्येक क्षणी म्हणण्याची पात्रता यावी, Thanks, आई।
जय श्रीकृष्ण।
चन्द्रहासः।
No comments:
Post a Comment