Tuesday, April 27, 2021

गुणग्राहकेषु प्रथम: डॉ. संजय-मालपाणी- महोदय:! (भाग १)

 

गुणग्राहकेषु प्रथम: डॉ. संजय-मालपाणी- महोदय:! (भाग १)

- डाॅ. चन्द्रहास शास्त्री सोनपेठकर

मागच्या महिन्यातील गोष्ट. संस्कृतविषयी नितांत श्रद्धा, अचल निष्ठा आणि अपार अनुराग असलेल्या एका व्यक्तिमत्वाशी भेट झाली. किती मिनिटांची ही भेट होती? तर फक्त १० मिनिटांची. ते व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. संजय मालपाणी, एक बडं प्रस्थ. पण अत्यंत विनम्र व्यक्तित्व. (दि. २८ ऑगस्ट २०१८)

          निमित्त होते, डॉ. संजय भाऊ  कार्याध्यक्ष आहेत, त्या संस्थेच्या संगमनेर येथील बी. एड. महाविद्यालयातील मुलाखतीचे. विद्यापीठाच्या सूचनेनुसार मुलाखती घेण्यासाठी मला आमंत्रित करण्यात आले होते. उमेदवार आले. मुलाखती सुरु झाल्या. आणि मी संस्कृत विषयक एकेक प्रश्न विचारत होतो.  डॉ. संजय भाऊ लक्ष देऊन ऐकत होते. नंतर डॉ. संजय भाऊंसोबत संस्कृत विषयक मुद्द्यांची चर्चा झाली. मी त्यांना माझे कार्ड दिले. त्यांनी मला त्यांचे कार्ड दिले. फार काही बोलणे झाले नाही. आम्ही पुण्याकडे परतीच्या प्रवासाला निघालो. 

          संध्याकाळचे सहा वाजले असतील. डॉ. संजय भाऊंचा संदेश मोबाइलवर आला. तो संदेश खालील प्रमाणे,
"
आदरणीय सर, आपल्याला भेटून आज अत्यंत आनंल झाला. आपल्यासारखे संस्कृतचे विद्वान समाजाची श्रीमंती आणि गौरव वाढविणारे आहेत. आपणाशी आज अधिक बोलणे झाले नाही. परत कधीतरी नक्की भेटू.
संजय मालपाणी"

मीही त्यांना प्रतिसादासाठी संदेश पाठवला: 
"
आदरणीय महोदय, नमो नमः। आपल्या संस्कृत आणि संस्कृतीविषयक प्रेमाबद्दल खूप ऐकले होते. आज प्रत्यक्ष अनुभवता आले. नक्की भेटू या. जय श्रीकृष्ण!
चन्द्रहास-सोनपेठकरः।"

समत्वं योगमुच्यते अशी स्थिती मी अनुभवत होतो. 

त्यांनतर दोन ते तीन दिवसातच संगमनेर कला विज्ञान महाविद्यालयाचे संस्कृत विभागप्रमुख डॉ. अनिरुद्ध मंडलिक सरांचा मला फोन आला. आदरणीय डॉ. संजय भाऊंनी मला व्याख्यानासाठी आमंत्रित केले होते. संगमनेर कला विज्ञान महाविद्यालयातर्फे आयोजित संस्कृत शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी आयोजित संस्कृत संमेलन व कृतिसत्र यासाठी उदघाटक आणि प्रमुख वक्ता म्हणून मला आमंत्रित करण्यात आले होते. मी होकार कळवला. 

आणि मला प्रश्न पडला

वर्षभर मी कुठे ना कुठे व्याख्यान इत्यादी कार्यक्रमांना जातच असतो. पण या निमंत्रणाने मी इतका सुखावलो कसा गेलो? मी एका अवर्णनीय आनंदाची अनुभूती घेत होतो. याचे कारण डॉ. संजय भाऊंची गुणग्राहकता आणि त्यांचे संस्कृत विषयीचे निरतिशय प्रेम. १८ अध्याय गीता मुखोद्गत करणारं हे व्यक्तिमत्व. ज्ञानार्थी व्यक्तित्व. त्यांचा अधिकार, त्यांचा अनुभव खूप समृद्ध. पण 

बाल्यादपि सुभाषितं ग्राह्यम्।

या उक्तीप्रमाणे ते मला सन्मान देत होते. नंतर वाटलं, हा सन्मान माझा नाही. माझा त्यावर अधिकारही नाही. हा सन्मान संस्कृतचा. 

डॉ. संजय भाऊंसारखा संस्कृतवर नितांत प्रेम करणारा माणूस विरळा! इतकं मात्र निश्चित

तावदेषा देवभाषा देवी स्थास्यति भूतले।
यावच्च वंशोऽस्त्यार्याणां तावदेषा ध्रुवं ध्रुवा॥
अर्थात जो पर्यंत या भूमीवर आर्यांचा वंश आहे, तोपर्यंत ही देवभाषा संस्कृतरूपी देवी या भूमीवर अढळ राहणार आहे.

ही अनुभूती आपल्याला डॉ. संजय भाऊंसोबत असताना नक्की येते. 
"
गुणा गुणज्ञेषु गुणा भवन्ति।"
गुणज्ञ माणसाजवळ आपण गेलं की, आपले गुण वाढतात. आदरणीय डाॅ. संजय भाऊंच्या शब्दसुमनांस पात्र ठरण्यासाठी भगवती शारदामातेने मजवर कृपा करावी, ही तिच्या चरणी प्रार्थना.
गुणग्राहकजनांमध्ये अग्रगण्य अशा डाॅ. संजय भाऊंकडून संस्कृत शारदेची अखंड सेवा घडावी, ही भगवती शारदांबेच्या चरणी प्रार्थना.

संस्कृत संमेलनासाठी मी गेलो. तेथील अनुभव, डॉ. संजय भाऊंद्वारे संचलित ध्रुव अकादमीस भेट या विषयीचे अनुभव कथन पुढील ब्लॉगमध्ये...... 

जय श्रीकृष्ण! 

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...